प्रमोद पुराणिक

बाजार हा समाजातल्या वेगवेगळ्या व्यक्ती तसेच त्यांच्या विचारसरणींचा आरसा असतो. झटपट श्रीमंत होण्याचे स्वप्न पाहणारे, नियम मोडणारे, नियम पाळणारे, नायक – खलनायक या बाजारात असतात. त्यांच्याकडून बाजाराला प्राण्यांची नावे दिली जातात. पण या बाजारात काम करणारे मनुष्य प्राणी, बैल, अस्वल, साप, नाग अशा प्राण्यापेक्षा वेगळे असतात. हे वेगळेपण लाभ आणि लोभ यात जो फक्त एका मात्रेचा फरक आहे, तसेच आहे.

शेअर बाजारात सर्व नियम गुंडाळून ठेवणारा एक सटोडिया अमेरिकेत ६ मार्च १९३७ ला डेट्रॉइट मिशिगन येथे जन्माला आला. इव्हान बोस्की त्याचे नाव. १९६५ ला पदवी प्राप्त केल्यानंतर डेट्रॉईटला त्याने शिक्षण घेतले. १९६२ ला बोस्कीचे लग्न झाले. त्यांचे सासरे कॅलिफोर्नियातील बिवर्ली हिल्स हॉटेलचे मालक होते. आपला जावई पुढे काय प्रताप करून दाखवणार आहे याची त्यांना तेव्हा कल्पनाच करता आली नाही. बोस्कीने आपला सासरा, मेव्हणा व मेव्हणी यांच्याविरुद्ध हॉटेलची मालकी मिळवण्यासाठी कोर्ट-कचेऱ्या केल्या.

आणखी वाचा-बाजारातील माणसं : व्यक्ती नव्हे तर प्रवृत्ती!

वर्ष १९६६ ला हे महाशय आपल्या पत्नीला बरोबर घेऊन न्यूयार्कला आले. अनेक शेअर दलालांकडे नोकऱ्या केल्या. नंतर मग त्यांनी १९७५ ला स्वतःची शेअर दलाली पेढी सुरू केली. अर्थातच बायकोला मिळालेल्या संपत्तीच्या वाट्यामधून. १९८६ पर्यंत त्याने उलटेपालटे व्यवहार करून एवढा पैसा कमावला की डिसेंबर १९८६ ला जगप्रसिद्ध टाइम मासिकात पहिल्या पानावर त्याचा फोटो प्रसिद्ध झाला.

अमेरिकेत कंपन्या ताब्यात घेण्याचे खूळ त्या काळात प्रचंड वाढलेले होते. एखादा उद्योग समूह दुसऱ्या कंपनीवर हल्ला करणार याचा सुगावा बोस्कीला लागत असे. त्याने अनेक ठिकाणी त्यांची माणसे पेरून ठेवलेली होती या माणसांकडून त्या कंपनी संबंधीच्या अंतर्गत माहितीचा खजिना बोस्कीच्या हातात येत असे. जी माहिती बाजाराला उपलब्ध नाही अशी माहिती पैसे खर्च करून मिळवली की त्याचे बाजारात शेअर्स खरेदी करण्याचे काम सुरू व्हायचे. एखाद्या कंपनीच्या बाबतीत असे प्रयत्न सुरू झाले की त्या कंपनीचे शेअर्स मोठ्या प्रमाणात गोळा करणे असे उद्योग बोस्की सुरू करायचा. यामुळे कंपनीच्या प्रवर्तकांनासुद्धा आपली कंपनी आपल्या हातातून निसटू नये म्हणून प्रयत्न सुरू करावे लागत. कंपनीला शेअर्सची खरेदी करण्यासाठी पैसा लागायचा मग हा पैसा कंपनीची मालमत्ता तारण ठेवून जास्त व्याजाचे कर्जरोखे विकले जायचे. व्यवहार यशस्वी झाला नाही तर बाजारात कर्जरोख्यांच्या किमती कोसळायच्या. कर्जरोख्याचे बाजारभाव कोसळले की त्यावर मिळणारा उत्पन्नाचा दर आकर्षक व्हायचा. काही वेळा हे प्रयत्न अयशस्वी व्हायचे. आणि मग कर्जरोखे कमी किमतीत विकले जायचे काही वेळा कंपन्यांचे प्रवर्तक कंपनी आपल्या हातातून जाऊ नये म्हणून प्रयत्न सुरू करायचे. शेअर खरेदीसाठी पैसा कसा उभा करायचा तर कंपनीची मालमत्ता तारण ठेऊन जास्त व्याजाचे कर्जरोखे विक्रीस काढले जात असत. व्यवहार जर अयशस्वी झाला तर मग बाजारात कर्जरोख्याच्या किमती कोसळायच्या. किमती कोसळल्या की उत्पन्न दर आणखी आकर्षक व्हायचे अशा बॉण्ड्सना ‘जंक बॉण्ड्स’ असे म्हटले जात . या सगळ्या प्रकारात बोस्की अग्रेसर होता.

आणखी वाचा-बाजारातील माणसं : वेगवान बदलांचा सांगाती…दिनेश खारा

वर्ष १९८७ मध्ये आलेला ‘वॉलस्ट्रीट’ हा अमेरिकन चित्रपट. या चित्रपटातले प्रमुख पात्र गार्डन गिको हे पात्र इव्हान बोस्की डोळ्यासमोर ठेवूनच निर्माण करण्यात आले होते. मे १९८६ ला बोस्कीने लालसा वाईट नसते उलट त्याने बाजाराची प्रगती होते असे भाषण स्कूल ऑफ बिझनेस बर्कले या ठिकाणी केले होते. सैतानाने बायबलचा आधार घ्यावा असे हे झाले होते.

शेवटी पापाचा अंत हा असतोच ‘इन्सायडर ट्रेडिंग’ संबंधातले अमेरिकन कायदे अतिशय कडक आहेत. बोस्कीला तीन वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागला. बोस्कीबरोबर आणखी कोण कोण होते त्यांनी काय काय केले त्या सर्वांची नावे आणि त्यांची कामगिरी यासंबंधी लिहायचे ठरवले तर मारुतीच्या शेपटासारखी ही कहाणी लांबत जाईल. बाजारात अखंड नंदादिपासारखे राहायचे की दिवाळीतली लवकर विझते तडतडी फुलबाजी व्हायचे, याचा निर्णय अर्थातच प्रत्येकाने स्वतः घ्यायचा असतो. बाजाराकडून अवास्तव अपेक्षा ठेवल्या नाही तर बाजार कधीच कोणाला नाराज करत नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बोस्कीने जे केले ते तर चुकीचेच होतेच, पण त्यावेळेस व्यवस्थेत काय दोष होते याचाही विचार करायला हवा. ‘जंक बॉण्ड्स’ अस्तित्वात का आले? एलबीओ यांची गरज का भासली? या प्रश्नांना उत्तर आहे त्या काळची परिस्थिती आणि त्याचबरोबर त्या काळातले इन्व्हेस्टमेंट बँकर्स हेसुद्धा दोषी होते. मायकेल मिल्कन यांचा उल्लेख करावाच लागेल. १९७० ला त्याची एक संस्था म्हणून ‘डेस्कल’ काम करीत होती. १९८७ पर्यत सर्वात जास्त नफा कमावणारी संस्था म्हणून वॉलस्ट्रीटवर या संस्थेचे नाव घेतले गेले. १९८३ ते १९८७ या चार वर्षात मिल्कनने जबरदस्त फी मिळवली. ‘जंक बॉण्ड्स’ अंडररायटिंगसाठी २ टक्के फी घेता यायची परंतु दर्जेदार बॉण्ड्स असले तर त्यावरचे कमिशन फक्त अर्धा टक्कासुद्धा नसायचे. अति लोभामुळे शेवटी १९९० ला डेस्कलचे दिवाळे निघाले. या सर्व नाट्यात पुन्हा काही वजनदार संस्था सरकारला हाताशी धरून आपले आर्थिक आणि राजकीय वजन वापरून कायदे सरकारला करायला लावतात किंवा असलेल्या कायद्यात पळवाटा शोधून काढतात म्हणून बाजारात मधूनमधून इवान बोस्कीसारखी माणसे येत राहणार हे नक्की.