इन्फोसिसच्या नारायण मूर्तींवर अनेक माध्यमांनी अनेक प्रकारे लिहिले आहे. अनेक पुस्तकेही प्रकाशित झालेली आहेत. परंतु बाजारामुळे संपत्तीची निर्मिती कशी होते याचे स्पष्टीकरण इन्फोसिसची आकडेवारी वापरून स्पष्ट करण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे.

इन्फोसिसच्या शेअर्सची प्रारंभिक विक्री (आयपीओ) फेब्रुवारी १९९३ ला झाली. १० रुपये दर्शनी किमतीचा शेअर ८५ रुपये अधिमूल्य घेऊन ९५ रुपयाला देण्यात आला. शेअरची नोंदणी बाजारात झाल्यानंतर शेअर १४५ रुपयांवर उघडला. जेमतेम प्रतिसाद मिळाला होता. कारण त्या वेळी बाजाराला ही कंपनी समजलीच नव्हती. एक टेबल, दोन खुर्च्या, एक टेलिफोन आणि एक कॉम्प्युटर एवढी साधने असली की कंपनी स्थापन होते असा बाजाराचा गैरसमज होता. १४ जून २०१८ ला या कंपनीच्या बाजारातल्या शेअर्स नोंदणीला २५ वर्षे पूर्ण झाली. पण इन्फोसिसची स्थापना ७ जुलै १९८१ची आहे. कंपनीचे स्थापनेसमयी सात संस्थापक-प्रवर्तक होते. परंतु २० ऑगस्ट १९४६ ला जन्मलेले नारायण मूर्ती यांच्याच नावाने आजसुद्धा ही कंपनी ओळखली जाते.

हेही वाचा – शेअर बाजार, माझा पोर्टफोलियो: बाजार संरचनेतील अत्यावश्यक ‘कोठार’- सीडीएसएल!

बाजाराला कंपनी समजली नव्हती. तशी नारायण मूर्तींच्या नातेवाईकांनासुद्धा नारायण मूर्ती आणि त्यांचे स्वप्न काय होते हे समजले नव्हते. नारायण मूर्तींचे एक भाऊ तत्कालीन बीएसएनएलमध्ये बेंगळुरुला नोकरीला होते. काही वर्षांपूर्वी एका मराठी वर्तमानपत्रात त्यांची मुलाखत वाचल्याचे आठवते. त्यांनी शेअर्स विक्रीला अर्ज केला नव्हता. कोणी तरी आम्हाला शेअर बाजार समजून सांगायला पाहिजे होता हे त्यांचे उपरतीसूचक उद्गार अजूनही डोक्यात पक्के बसलेले आहेत.

नारायण मूर्ती १९९२-९३ ला पुण्याला शिवाजी नगरला एशियाड बसमध्ये बसायचे नाशिकला सीबीएस थांब्यावर उतरायचे. सीबीएसपासून जवळ असलेल्या पंचवटी हॉटेलमध्ये राहायचे आणि त्यानंतर मग रिक्षाने सातपूरला असलेल्या त्यावेळच्या मायको आताची बॉश या कंपनीत प्रशिक्षण देण्यासाठी यायचे. इन्फोसिसच्या विकासात मायको नाशिक, मायको बेंगळुरु या दोन्ही संस्थांचे योगदान आहे. कारण सुरुवातीला बेंगळुरुला जागा नव्हती. म्हणून मायको बेंगळुरुच्या कारखान्यात एका जागेत त्यांनी व्यवसाय सुरू केला होता. इन्फोसिसला वित्त पुरवठा करणाऱ्या बँकेने त्यांना शेअर्सची बाजारात नोंदणी करा असे सांगितले. सुरुवातीला मॉर्गन स्टॅनलेने शेअर्सची विक्री करण्यात मदत केली.

त्यानंतर कंपनीचा विकास कसा झाला. बाजारातल्या नोंदणीनंतर अमेरिकेत नासडॅक या ठिकाणी एडीएसची नोंदणी, पुढे त्यानंतर न्यूयाॅर्क शेअर बाजार, लंडन आणि पॅरिस येथे शेअरची नोंदणी असे अनेक विक्रम त्यांनी करून दाखवले. सुरुवातीच्या १० हजार रुपयांच्या भांडवलासाठी सुधा मूर्ती यांनी दागिने गहाण ठेवून भांडवल उपलब्ध करून दिले आणि आज इन्फोसिस ८ लाख कोटी रुपये बाजार मूल्य असलेली कंपनी निर्माण झाली आहे.

नारायण मूर्ती, नंदन निलेकणी, एस. डी. शिबुलाल यांच्या संबंधाने अनेक माहिती प्रसिद्ध झालेली आहे. प्रत्येकाविषयी स्वतंत्रपणे लिहिता येईल. परंतु आजचा विषय फक्त आणि फक्त संपत्तीची निर्मिती कशी होते, यावरच केंद्रित आहे. शिबुलाल यांनी आपल्याकडे असलेल्या कंपनीच्या शेअर्सची विक्री करून अमेरिकेत मायक्रोसॉफ्टसमोर अनेक फ्लॅट्स खरेदी करून ते फ्लॅट्स भाड्याने देणे हा व्यवसाय सुरु केला. नंदन निलेकणी यांचेही मोठे योगदान आहे. आधार कार्ड ही त्यांचीच निर्मिती. फक्त लोकसभेच्या निवडणुकीला उभे राहण्याचा त्यांचा निर्णय चुकला. त्याचप्रमाणे नारायण मूर्ती यांनी आपल्या मुलाला इन्फोसिसचा वारसदार बनवले नाही. हा निर्णय चुकला अशी जाहीर कबुली देण्याचा मोठेपणा त्यांच्याकडे आहे. वेळोवेळी त्यांनी अनेक महत्त्वाची विधाने केली आहेत. ज्यावरून अर्थातच वाद-प्रवादही झाले आहेत. पण या सर्वांपैकी पक्के डोक्यात बसलेले एक वाक्य म्हणजे – भारतात कंपन्या आजारी पडतात प्रवर्तक नाहीत.

बाजारात कंपन्यांची विभागणी फक्त दोनच गटांत होऊ शकते. १) सतत भागधारकांकडून पैसे मागणाऱ्या कंपन्या (घेणाऱ्या कंपन्या) २) सतत भागधारकांना देणाऱ्या कंपन्या. इन्फोसिस ही सतत देणारी कंपनी आहे. इन्फोसिसने आतापर्यंत ५ वेळा बोनस शेअर्सचे वाटप केले आहे. १) १ जुलै २००४ ला एका शेअरला ३ बोनस शेअर्स २) १३ जुलै २००६ ला एकास एक ३) ४ सप्टेंबर २०१८ एकास एक ४) १५ जून २०१५ एकास एक ५) २ डिसेंबर २०१४ एकास एक याप्रमाणे तिने भागधारकांना मोठा नजराणा कायम दिला आहे. कंपनीने भागधारकांकडून एकदाही पैसे मागितलेले नाहीत. हक्काच्या शेअर्सची विक्री केलेली नाही. २४ जानेवारी २००० ला शेअर्सची विभागणी करून १० रुपये दर्शनी किमतीच्या शेअर्सचे ५ रुपये मूल्य करण्यात आले. शिवाय दरवर्षी लाभांशाचे वाटप केलेले आहे. त्यामुळे लाभांशाद्वारेदेखील भागधारकांना पैसा मिळालेला आहे. त्यात पुन्हा पूर्वी लाभांश करमुक्त होता. हा मुद्दासुद्धा महत्त्वाचा आहे. लाभांश वाटपाशिवाय ४ वेळा शेअर्सची पुनर्खरेदी (बायबॅक) योजना राबवून नोव्हेंबर २०१७ मध्ये १३ हजार कोटी रुपये, मार्च २०१९ मध्ये ८२६० कोटी रुपये, जून २०२१ मध्ये ९२०० कोटी रुपये, १३ ऑक्टोबर २२ मध्ये ९३०० कोटी रुपये कंपनीने यावर खर्च केले आहेत. यामुळे भागधारकांचा पैसा भागधारकांना परत करण्यात आला आहे.

हेही वाचा – बाजारातली माणसं: रसायनशास्त्र ते निधी व्यवस्थापनाचे संयुग!- प्रमोद पुराणिक

मागील एका लेखात वॉरेन बफे भागधारकांना लाभांश मागू नका असे सांगतो. मात्र त्यांची कंपनी बर्कशायर हॅथवेज लाभांश वाटप करणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करायला लावते. हा विरोधाभास आहे असे लिहिले होते (अर्थ वृत्तान्त, २ सप्टेंबर २०२४). नारायण मूर्ती यांनी शेअरची विभागणी फक्त एकदाच केली. कोणते धोरण चांगले याचा निर्णय घेण्याचा अधिकार अर्थातच व्यवस्थापनाचा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आजसुद्धा शेअर बाजारापासून बाजूला राहणारे अनेक जण आहेत. माझा मुलगा, माझा जावई, माझी सून इन्फोसिसमध्ये नोकरी करतात. हे अभिमानाने सांगितले जाते, परंतु पुढचा प्रश्न विचारला त्यांनी इन्फोसिसचे शेअर्स घेतले आहे का? या प्रश्नाला नाही असे उत्तर मिळते.
बाजार कशासाठी तर संपत्तीची निर्मिती करण्यासाठी, संपत्तीचा नाश करण्यासाठी नाही आणि म्हणून नवीन नवीन उद्योजक ज्यांच्याकडे संकल्पना आहे पण भांडवलाची उपलब्धता नाही त्यांनी बाजारात यायलाच पाहिजे. १०० नारायण मूर्ती निर्माण झाले पाहिजेत असे वाटते.