लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

केंद्र सरकारने सार्वभौम सुवर्ण रोख्यांच्या विक्रीच्या आगामी दोन टप्प्यांची घोषणा केली असून, या रोख्यांमध्ये गुंतवणुकीचा २०२२-२३ या वर्षातील तिसरा टप्पा १९ डिसेंबरपासून खुला होणार असून गुंतवणूकदारांना २३ डिसेंबपर्यंत अर्ज करता येणार आहे. तर चौथा टप्पा पुढील वर्षात ६ ते १० मार्च २०२३ रोजी खुला होईल.

भांडवली बाजारातील वाढती अस्थिरता आणि अनिश्चिततेमुळे, सुरक्षित गुंतवणूक पर्याय म्हणून गुंतवणूकदारांचा सुवर्ण रोख्यांकडे ओढा राहण्याची शक्यता आहे. यंदाच्या टप्प्यात सुवर्ण रोख्यांची किंमत लवकरच निश्चित करण्यात येणार आहे. शिवाय यंदा देखील जे गुंतवणूकदार ‘डिजिटल’ माध्यमातून खरेदी रक्कम भरतील, त्यांना रोख्याच्या खरेदीवर प्रतिग्रॅम ५० रुपयांची सवलत मिळणार आहे. सरकारच्या वतीने रिझव्र्ह बँकेकडून ही रोखे विक्री व्यवस्थापित केली जाते आणि सामान्य ग्राहकांना यासाठी निर्धारित बँकांच्या इंटरनेट बँकिंग अथवा प्रत्यक्ष शाखेतून आणि टपाल कार्यालयातून हे रोखे खरेदी करता येतील.

केंद्र सरकारची हमी असणारे या सुवर्ण रोख्यांमध्ये व्यक्ती आणि अविभक्त हिंदू कुटुंबांना (एचयूएफ) किमान १ ग्रॅम ते कमाल चार हजार ग्रॅम; तर ट्रस्ट व तत्सम संस्थांसाठी वीस हजार ग्रॅम वजनाचे सुवर्ण रोखे एका आर्थिक वर्षांत खरेदी करता येतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

गुंतवणूकदारांना फायदे काय?

  • भौतिक सोने खरेदी केल्यास त्यावर कोणतेही व्याज मिळत नाही. मात्र गुंतवणूकदारांना सुवर्णरोख्यांतील गुंतवणुकीवर दरसाल २.५ टक्के व्याज दिले जाणार असून ते करपात्र आहे. मुदतपूर्तीनंतर व्यक्तींना मिळणारा दीर्घकालीन भांडवली नफा पूर्णत: करमुक्त करण्यात आला आहे.
  • सुवर्ण रोखे कर्ज घेण्यासाठी तारण ठेवता येतात.
  • सुवर्ण रोखे आठ वर्षे मुदतीचे असून पाच वर्षांनंतर बाहेर पडण्याचा पर्यायही उपलब्ध आहे.
  • सुवर्णरोखे खरेदी करण्यास उत्सुक असलेल्या ग्राहकाने ‘डिजिटल’ माध्यमातून खरेदी केल्यास ग्राहकाला द्याव्या लागणाऱ्या किमतीवर सरकार ५० रुपये सवलत देत आहे.
  • सुवर्ण रोखे सर्व शेडय़ुल्ड बँका, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, ठरावीक निर्देशित पोस्ट ऑफिस आणि मुंबई व राष्ट्रीय शेअर बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत.

लक्षात घ्यावयाच्या ठळक बाबी

रोखे विक्री सुरू होण्याची तारीख : १९ डिसेंबर २०२२

रोखे विक्री बंद होण्याची तारीख : २३ डिसेंबर २०२२

किमान गुंतवणूक : एक ग्रॅम

कमाल गुंतवणूक : चार किलो

सुवर्ण रोख्यांचा कालावधी : ८ वर्षे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वार्षिक व्याज : २.५० टक्के (सहामाही देय)