Share Market News: भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावाचे वातावरण आणि इतर जागतिक घडामोडींमध्ये गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात मोठे चढ-उतार येताना पाहायला मिळत आहेत. दरम्यान आज जागतिक बाजारातील कमकुवत संकेत आणि एफआयआयची विक्री यासारख्या घटकांमुळे भारतीय शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण झाल्याचे पाहायला मिळाले.
आज सकाळच्या सुरुवातीच्या उच्चांकावरून घसरत सेन्सेक्स ८७२.९८ अंकांनी किंवा १.०६ टक्क्यांनी घसरून ८१,१८६.४४ वर बंद झाला आहे. तर, निफ्टी ५० निर्देशांक २६१.५५ अंकांनी किंवा १.०५ टक्क्यांनी घसरून २४,६८३.९० वर बंद झाला.
बाजारातील घसरणीमागील प्रमुख घटक
कमकुवत जागतिक संकेत
वॉल स्ट्रीट फ्युचर्समधील कमकुवतपणा लक्षात घेता बहुतेक आशियाई बाजार आज नकारात्मक होते. दक्षिण कोरियाचा कोस्पी लाल रंगात होता, तर यूएस फ्युचर्सने देखील फेडच्या आक्रमक भाष्यामुळे संथ सुरुवात दर्शविली होती.
एफआयआय कडून विक्री
सोमवारी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (एफआयआय) ५२५.९५ कोटी रुपयांचे शेअर्स विकले होते. यावर जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे मुख्य गुंतवणूक धोरणकार व्हीके विजयकुमार म्हणाले की, “मूल्यांकन आधीच वाढल्याने बाजार एकत्रीकरणाच्या टप्प्यात प्रवेश करू शकतात. उच्च मूल्यांकनांमुळे संस्थात्मक विक्री वाढल्याने बाजारातील तेजीवर मर्यादा येईल.” याबाबत मनी कंट्रोलने वृत्त दिले आहे.
जपानी बाँड्समध्ये घसरण
मंगळवारी झालेल्या कमकुवत लिलावानंतर जपानी सरकारी बाँडच्या उत्पन्नात वाढ झाली, ज्यामुळे देशाच्या आर्थिक परिस्थितीबद्दल नवीन चिंता निर्माण झाली आहे. २० वर्षांच्या बाँडच्या उत्पन्नात २००० नंतरची ही सर्वोच्च पातळी आहे, तर ३० वर्षांच्या उत्पन्नात ही विक्रमी वाढ आहे. विश्लेषकांनी सांगितले की जपानी बाँड्सच्या विक्रीमुळे कर्ज घेण्याचा खर्च वाढला असून, जागतिक अनिश्चिततेत भर पडली आहे.
भारत-अमेरिका व्यापार चर्चेबाबत अनिश्चितता
वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांचा चार दिवसांचा अमेरिका दौरा मंगळवारी संपला, दोन्ही बाजूंनी या महिन्याच्या अखेरीस अमेरिकन टॅरिफ लागू होण्यापूर्वी व्यापार करार करण्याचा प्रयत्न सुरू आहे. “बाजार पुढील प्रमुख ट्रिगरची वाट पाहत आहे. हा ट्रिगर भारत-अमेरिका व्यापार करार असू शकतो. तो कधी जाहीर होईल हे पाहणे आवश्यक आहे”, असे चोलामंडलम सिक्युरिटीजचे इक्विटी रिसर्च प्रमुख धर्मेश कांत यांनी रॉयटर्सला सांगितले.
जागतिक व्यापारात वाढता तणाव
अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसेंट यांनी अलिकडेच प्रमुख व्यापारी भागीदरा देशांववर कर वाढवण्याचा इशारा दिला होता. बाजारातील तज्ज्ञांनी असे उपाय जागतिक मंदीची भीती आणि अस्थिरता पुन्हा निर्माण करू शकतात असे म्हटले आहे.
कमकुवत रुपया
देशांतर्गत शेअर बाजार आणि सतत परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी गुंतवणूक कमी केल्याने आज सुरुवातीच्या व्यापारात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया १३ पैशांनी घसरून ८५.५५ वर आला होता.
मूडीजने कमी केला अमेरिकेच्या कर्जावरील अंदाज
जागतिक रेटिंग एजन्सी मूडीजने दीर्घकालीन वित्तीय शिस्तीबद्दलच्या चिंतेचा हवाला देत अमेरिकेच्या सार्वभौम कर्जावरील अंदाज कमी केला आहे. हा तात्काळ धोका नसला तरी, या निर्णयामुळे जागतिक स्तरावर जोखीम कमी करण्याच्या भावना वाढल्या आहेत. “या घसरणीमुळे वित्तीय बाजारपेठांमध्ये अस्वस्थतेचा एक प्रवाह निर्माण झाला आहे. वाढत्या अनिश्चिततेमुळे गुंतवणूकदार सावध होत आहेत”, असे जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे मुख्य गुंतवणूक धोरणकार व्हीके विजयकुमार यांनी म्हटले आहे.
कोविड रुग्णांमध्ये वाढ
काही देशांमध्ये कोविड-१९ रुग्ण पुन्हा आढळत असल्याने, विशेषतः हाँगकाँग आणि सिंगापूर सारख्या प्रमुख आशियाई शहरांमध्ये गुंतवणूकदार सावध झाले आहेत. भारतातही हळूहळू रुग्णांमध्ये वाढ होऊ लागली आहे, देशात १२ मे पासून १६४ नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत. देशात आता कोव्हिडचे २५७ सक्रिय रुग्ण आहेत, ज्यामध्ये केरळ, महाराष्ट्र आणि तामिळनाडूमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत.