Stock Market News Updates: आयटी, आर्थिक आणि इतर विविध क्षेत्रांमधील कमकुवतपणामुळे सेन्सेक्स आणि निफ्टी ५० हे बेंचमार्क निर्देशांक मंगळवारी नकारात्मक अंकात बंद झाले आहेत. आरबीआयच्या धोरणात्मक निर्णयापूर्वी आणि जागतिक व्यापार तणाव व अमेरिकेतील राजकोषीय जोखमींबद्दल वाढती चिंता यांच्या पार्श्वभूमीवर ही घसरण झाली आहे.
बीएसई सेन्सेक्स ६३६ अंकांनी किंवा ०.७८% ने घसरून ८०,७३७ वर बंद झाला, तर एनएसई निफ्टी १७४ अंकांनी किंवा ०.७% ने घसरून २४,५४२ वर बंद झाला. दरम्यान आज बाजार उघडताच, सेन्सेक्स ७९८ अंकांनी घसरून ८०,५७५ वर पोहचला होता, तर निफ्टीने २४,५०२ चा नीचांक गाठला होता.
आज झालेल्या या घसरणीमुळे मुंबई शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या सर्व कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल २.५ लाख कोटी रुपयांनी घसरून ४४३ लाख कोटी रुपयांवर आले आहे. दरम्यान, या घसरणीमागची प्रमुख कारणे काय आहेत हे पाहुया.
१. जागतिक व्यापार तणाव
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ४ जून २०२५ पासून स्टील आणि ॲल्युमिनियमवरील आयात शुल्क दुप्पट करून ५०% करण्याची योजना जाहीर केल्यानंतर गुंतवणूकदारांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या निर्णयामुळे टाटा स्टील, हिंडाल्को आणि जेएसडब्ल्यू स्टील सारख्या भारतीय धातू निर्यातदारांची चिंता वाढली आहे. दरम्यान आर्थिक वर्ष २५ मध्ये भारताने आतापर्यंत ४.५ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त किमतीचे हे धातू अमेरिकेला निर्यात केले.
यावर बोलताना जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे मुख्य गुंतवणूक धोरणकार डॉ. व्ही.के. विजयकुमार म्हणाले की, “डोनाल्ड ट्रम्प यांनी स्टील आणि ॲल्युमिनियमवर ५०% कर लादण्याच्या निर्णयातून हे स्पष्टपणे दिसत आहे की, कर व व्यापार परिस्थिती अनिश्चित आणि अशांत राहील.” दरम्यान, इकोनॉमिक टाइम्सने हे वृत्त दिले आहे.
२. रेपो रेटच्या निर्णयापूर्वी गुंतवणूकदार सावध
येत्या शुक्रवारी आरबीआयचे चलनविषयक धोरण जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी सावधपणे पाऊले उचलण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे बँका, वित्तीय, वाहन आणि ग्राहक क्षेत्रातील शेअर्सवर दबाव आला आहे. आरबीआयकडून व्याजदरात २५-बेसिस-पॉइंट दर कपातीची अपेक्षा असली तरी यातील अनिश्चिततेमुळे मोठ्या प्रमाणात नफा-वसुली झाली आहे, परिणामी बाजारात घसरण झाली.
३. कमकुवत जागतिक आकडेवारी
अलीकडील आकडेवारीमध्ये अमेरिकेतील उत्पादनात सलग तिसऱ्या महिन्यात घट दिसून आली. चीनमधील, कारखान्यांमध्ये होणाऱ्या विविध उत्पादनांमध्येही आठ महिन्यांत प्रथमच घट झाली, ज्यामुळे असे दिसून येते की अमेरिकेतील शुल्क जागतिक मागणी आणि पुरवठा साखळींवर परिणाम करू लागले आहेत. या घडामोडींचा परिणाम अमेरिका आणि आशियाई बाजारपेठांवर झाला आहे, नॅस्डॅक आणि एस अँड पी ५०० फ्युचर्समध्ये ०.३% पेक्षा जास्त घसरण झाली आहे.