मुंबई: भारत-अमेरिका दरम्यान व्यापार करार १ ऑगस्टच्या अंतिम मुदतीपूर्वी मार्गी लागण्याची शक्यता कठीण बनल्याच्या चिंतेने भांडवली बाजारात गुंतवणूकदारांना नकारात्मकतेने घेरले असून, सलग तिसऱ्या सत्रात सेन्सेक्स-निफ्टी या प्रमुख निर्देशांकांत परिणामी घसरण झाली. अमेरिकी प्रशासनाने रविवारी, १ ऑगस्टची अंतिम मुदत आणखी वाढवली जाणार नसल्याचे संकेत दिल्याने गुंतवणूकदारांवरील ताण वाढला.

आठवड्याची सुरुवात बाजारातील नकारात्मक भावना, उच्च पातळीवर समभागांमध्ये विक्रीचा दबाव कायम राहिला. परिणामी सोमवारी दिवसअखेरीस, सेन्सेक्स ५७२.०७ अंशांनी म्हणजेच ०.७० टक्क्यांनी घसरून ८०,८९१.०२ अंशांवर बंद झाला. तर निफ्टी १५६.१० अंशांनी किंवा ०.६३ टक्क्यांनी घसरून २४,६८०.९० अंशांवर दिवसअखेर स्थिरावला.

मंदीची भावना दर्शविणारा कल

जिओजित इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडचे संशोधन प्रमुख विनोद नायर म्हणाले की, पहिल्या तिमाहीतील निराशाजनक कामगिरी, भारत-अमेरिका व्यापार कराराला अपेक्षेपेक्षा अधिक विलंब आणि विदेशी गुंतवणुकीने निरंतर धरलेला बाहेरचा रस्ता यामुळे देशांतर्गत बाजाराने एकंदर गुंतवणुकीचे चैतन्य गमावले, बाजार भावना सावध बनल्या आहेत.

येत्या काही दिवसांत अमेरिकेच्या फेड आणि बँक ऑफ जपान या सारख्या प्रमुख मध्यवर्ती बँकांचे येऊ घातलेले पतविषयक धोरण आणि त्यांचा निर्णय, देशांतर्गत स्तरावर कंपन्यांच्या तिमाही मिळकत कामगिरीचा खडतर मार्ग हे घटक नजीकच्या काळात बाजाराची दिशा निश्चित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील अशी नायर यांची अपेक्षा आहे. त्यांच्या मते, तूर्त तरी व्यापक बाजाराचा कल हा मंदीची भावना दर्शविणारा आहे.

घसरण कुठे, आधार कुणाचा?

केवळ औषधनिर्माण (फार्मा) क्षेत्रातील समभागांनी बाजाराला सापेक्ष ताकदीसह काही आधार दिला, त्या उलट, रिॲल्टी, मीडिया, बँका, धातू आणि ग्राहकोपयोगी वस्तू ही उद्योग क्षेत्रे संपूर्ण सत्रात दबावाखाली होती. बजाज फायनान्स, भारती एअरटेल, टायटन, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, एचसीएल टेक आणि स्टेट बँक हे सेन्सेक्समधील अग्रणी समभाग आपटले. त्या उलट हिंदुस्तान युनिलिव्हर, एशियन पेंट्स, आयसीआयसीआय बँक, पॉवर ग्रिड, एचडीएफसी बँक आणि आयटीसी हे समभाग वाढले.

व्यापक पातळीवर, भारताच्या अर्थव्यवस्थेचे मजबूत मूलभूत घटक हे गुंत‌वणूकदारांसाठी आश्वासक ठरले आहेत. रिझर्व्ह बँकेची महागाई नियंत्रण आणि रोकड तरलतेसाठी दिसून आलेली तत्परता आणि चांगली मान्सूनची परिस्थिती ही बाजाराला आधार देणारी ठरली आहे. आगामी काळात भारतातील चलनवाढीचा कमालीचा नरमलेला आकडा हा खूपच सकारात्मक घटक आहे. भारत आणि ब्रिटनने गुरुवारी ऐतिहासिक मुक्त व्यापार करार केला, जो पुढील वर्षापासून सुरू होईल, ज्यामुळे ९९ टक्के भारतीय निर्यात ब्रिटनमध्ये शुल्कमुक्त होईल, तर वाहने आणि व्हिस्कीसारख्या ब्रिटिश उत्पादनांवरील शुल्क कमी होईल. जास्त कर लावण्यावरील अमेरिकेच्या स्थगितीच्या काही दिवस आधी झालेल्या या कराराचे उद्दिष्ट २०३० पर्यंत जगातील पाचव्या आणि सहाव्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थांमधील ५६ अब्ज डॉलरचा व्यापार दुप्पट करण्याचे आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गुंतवणूकदारांना ११ लाख कोटींचा तडाखा

शेअर बाजारात झालेल्या सलग तिसऱ्या मोठ्या घसरणीतून गुंतवणूकदारांना एकंदर सुमारे ११ लाख कोटींचा फटका बसला असण्याचा अंदाज आहे. आधीच्या दोन दिवसांच्या तीव्र घसरणीने गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ८.६७ लाख कोटी रुपयांची घट झाली आहे. या तीन सत्रात सेन्सेक्स २.२७ टक्क्यांनी घसरला आहे. सतत होणारे परदेशी निधीचे निर्गमन आणि समभाग विक्रीच्या माऱ्यामुळे बाजारातील घसरण वाढली आहे. सेन्सेक्सने दोन सत्रात १,८३६ अंश गमावले आहेत. सरलेल्या शुक्रवारी सेन्सेक्स ७२१.०८ अंशांनी घसरून ८१,४६३.०९, तर निफ्टी २२५.१० अंशांनी गडगडून २४,८३७ वर बंद झाला होता. दोन्ही निर्देशांक आता महिन्याच्या नीचांकी पातळीवर घरंगळले आहेत.