जागतिक बाजारातील कमकुवत संकेत आणि सलग चार सत्रात तेजीनंतर गुंतवणूकदारांनी बँकिंग, ऊर्जा आणि धातू कंपन्यांच्या समभागांमध्ये विक्रीचा मारा करत नफावसुलीला प्राधान्य दिले. परिणामी बुधवारच्या सत्रात प्रमुख निर्देशांक अर्ध्या टक्क्यांनी घसरले. बुधवारच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ३४६.८९ अंशांनी घसरून ६२,६२२.२४ पातळीवर बंद झाला.
दिवसभरात त्याने ५६८.११ अंश गमावत ६२,४०१.०२ अंशांची सत्रातील नीचांकी पातळी गाठली. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये ९९.४५ अंशांची घसरण झाली आणि तो १८,५३४.४० पातळीवर स्थिरावला. मंगळवारपर्यंतच्या चार सत्रात सेन्सेक्सने १,१९५ अंशांची कमाई केली तर निफ्टीने २.२६ टक्के म्हणजेच ३४८ अंशांची भर घातली.




देशांतर्गत पातळीवर अर्थव्यवस्थेविषयक सकारात्मक आकडेवारी अर्थव्यवस्था विस्तारत असल्याचे दर्शविते आहे. त्यापरिणामी भांडवली बाजारात देखील उत्साही वातावरण आहे. मात्र जागतिक पातळीवरून मिळणाऱ्या नकारात्मक संकेतांमुळे भांडवली बाजारातील तेजीला अडसर निर्माण करत आहेत. संभाव्य मंदी आणि जागतिक पातळीवर प्रमुख मध्यवर्ती बँकांकडून व्याजदरवाढीच्या धोरणामुळे देशांतर्गत बाजारपेठेवर प्रतिकूल परिणाम होत आहे. मात्र अशा वातावरणातदेखील भारतीय भांडवली बाजाराची तेजीच्या दिशेने वाटचाल कायम आहे, असे निरीक्षण जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले.
सेन्सेक्समध्ये अॅक्सिस बँक, स्टेट बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी, एचडीएफसी बँक, एनटीपीसी, टाटा स्टील आणि अल्ट्राटेक सिमेंटच्या समभागात मोठी घसरण झाली. तर भारती एअरटेल, टेक महिंद्र, एशियन पेंट्स, सन फार्मा, टाटा मोटर्स आणि कोटक महिंद्र बँक यांचे समभाग सर्वाधिक तेजीत राहिले. मुंबई शेअर बाजाराने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारच्या सत्रात मुंबई शेअर बाजारात परदेशी गुंतवणूकदारांनी २०८५.६२ कोटी रुपये मूल्याचे समभाग खरेदी केली.
सेन्सेक्स ६२,६२२.२४ -३४६.८९ (-०.५५)
निफ्टी १८,५३४.४० -९९.४५ (-०.५३)
डॉलर ८२.७४ +७
तेल ७२.५३ -१.३३