बँक ऑफ मद्रास आणि इम्पिरियल बँक मिळून स्टेट बँक ऑफ इंडिया कशी निर्माण झाली हे आपण मागील एका लेखात पाहिले. भारतातही बँकेचा इतिहास बघता स्टेट बँक अर्थात एसबीआय ही भारतातील सर्वात जुनी बँक आहे आणि ती आजही तेवढ्याच ताकदीने कार्यरत आहे. केवळ कार्यरत नसून तिचा विस्तार सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील इतर बँकांपेक्षा खूप मोठा आहे. स्टेट बँकेत भारत सरकारची सर्वाधिक हिस्सेदारी आहे आणि तसेच काही वित्तीय संस्था आणि किरकोळ गुंतवणूकदारांकडेदेखील त्यांचे काही समभाग आहेत. ही बँक केवळ मुंबई शेअर बाजार (बीएसई) आणि राष्ट्रीय शेअर बाजारात (एनएसई) सूचिबद्ध नसून ज्या भारतातील मोजक्या बँका लंडन स्टॉक एक्स्चेंजवर सूचिबद्ध आहेत त्यात तिचादेखील समावेश आहे.

स्टेट बँकेच्या काही उपकंपन्या आहेत. सरलेल्या आर्थिक वर्षामध्ये बँकेचा करमुक्त नफा तब्बल ५० हजार कोटींच्या पुढे पोहोचला आहे. यावरून बँकेचे एकंदर बँकिंग क्षेत्रातील योगदान दिसून येते. हा कारभार हाकायला तब्बल अडीच लाख कर्मचारी कार्यरत असतात. बँकेच्या तब्बल २२,००० शाखा देशात आहेत आणि ६५,००० एटीएम आहेत. त्याव्यतिरिक्त बँकेच्या सुमारे तीसहून अधिक देशांमध्ये २३५ शाखा आहेत. बँकेची ताकत ओळखायची असेल तर बँकेच्या संकेतस्थळाला भेट द्या.

हेही वाचा – हृदयी वसंत फुलताना!’

बँकेच्या व्यतिरिक्त एसबीआय इन्शुरन्स, म्युच्युअल फंड क्षेत्रातदेखील आपली ओळख बनवून आहे. बँकेचे पहिले अध्यक्ष म्हणून भारताचे अर्थमंत्री जॉन मथाई यांनी काम बघितले. दिनेश कुमार खारा हे सध्याचे विद्यमान अध्यक्ष आहेत. तर अरुंधती भट्टाचार्य या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या. एच.व्ही.आर अय्यंगार आणि पी.सी भट्टाचार्य हेदेखील बँकेचे अध्यक्ष होऊन गेले, ज्यांनी नंतर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणूनदेखील काम बघितले आहे. स्टेट बँकेचे बोध चिन्ह (लोगो) हे अहमदाबादच्या कानाकिया तलावावरून घेतले अशी वदंता आहे. पण त्या बोध चिन्हाचा खरा अर्थ रुपयांमध्ये जाणारी चावी असा आहे. त्याच्या पूर्वीच्या बोध चिन्हावरदेखील रुपयात असणारे खोलवर मुळे पसरलेले वडाचे झाड होते.            

हेही वाचा – बाजारातील माणसं : वाहन उद्योगाचा अनभिषिक्त प्रवक्ता : आर. सी. भार्गव

बँकेने देशाच्या जडणघडणीत अत्यंत महत्त्वाचे योगदान दिले आहे. १९५९ मध्ये बँकेचे विकेंद्रीकरण किंवा उपशाखा उघडून मोठ्या प्रमाणात त्याचा विस्तार करण्यात आला. त्यामुळे देशातील औद्योगिक क्रांतीला पैसे पुरवण्यास मदत झाली. २००८ नंतर आणि विशेषतः २०१७ मध्ये या सर्व उपशाखा बँका पुन्हा मुख्य स्टेट बँकेत विलीन करण्यात आल्या. त्यामध्ये स्टेट बँक ऑफ हैद्राबाद, स्टेट बँक ऑफ म्हैसूर, स्टेट बँक ऑफ त्रावणकोर, स्टेट बँक ऑफ बिकानेर व स्टेट बँक ऑफ जयपूर यांचा समावेश आहे. या विलीनीकरणानंतर स्टेट बँक खऱ्या अर्थाने खूप मोठी बँक बनली. बँकेचे मध्यवर्ती कार्यालय मुंबईमध्ये आहे. मुंबईला देशाची आर्थिक राजधानी बनवण्यामध्ये हा अजून एक मैलाचा दगड!

@AshishThatte

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(ashishpthatte@gmail.com)