IPO Open This Week in Indian Stock Market : इस्रायल-इराण युद्धामुळे भारतीय भांडवली बाजार गडगडला आहे. आज (१६ जून) बाजार काही प्रमाणात सावरला असला तरी गेल्या काही दिवसांत गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे. मात्र, या आठवड्यात गुंतवणूकदारांकडे पैसे कमावण्याची संधी आहे. कारण, या आठवड्यात सहा नवे आयपीओ भारतीय भांडवली बाजारात दाखल होत आहेत. यापैकी पाच कंपन्यांचा एनएसई सेगमेंट, तर एका कंपनीचा मेनबोर्ड आयपीओ आहे.

या सहा कंपन्यांमध्ये पाटील ऑटोमेशन लिमिटेड, मायाशील व्हेंचर्स, इन्फक्स हेल्थटेक, एपेलटोन इंजिनिअर्स, समय प्रोजेक्ट सर्व्हिसेस व अरिसिन्फ्रा सोल्यूशन्सचा समावेश आहे.

१. पाटील ऑटोमेशन आयपीओ (Patil Automation IPO)

वेल्डिंग व लाइन ऑटोमेशन सोल्यूशन प्रदान करणाऱ्या पाटील ऑटोमेशन कंपनीला ६९.६१ कोटी रुपये जमवायचे आहेत. यासाठी कंपनीने ५८.०१ लाख नवे शेअर जारी केले आहेत. आज हा आयपीओ दाखल झाला असून १८ जून रोजी बंद होईल. या कंपनीच्या समभागांची किंमत ११४ ते १२० रुपयांच्या दरम्यान असून गुंतवणूकदारांना १.३६ लाख रुपये गुंतवावे लागतील.

२. मायाशील व्हेंचर्स आयपीओ (Mayasheel Ventures IPO)

हा आयपीओ २० जून रोजी दाखल होईल आणि २४ जून रोजी बंद होईल. या कंपनीच्या शेअरची किंमत ४४ रुपयांच्या आसपास असेल. या कंपनीचे ५५.१४ लाख नवे शेअर्स जारी केले जाणार आहेत. गुंतवणूकदारांना या कंपनीचे किमान ३,००० शेअर खरेदी करावे लागतील. त्यासाठी १.३२ लाख रुपये मोजावे लागतील.

३. इन्फक्स हेल्थटेक आयपीओ (Influx Healthtech IPO)

हा आयपीओ १८ जून रोजी दाखल होणार असून २० जून रोजी बंद होईल. याद्वारे ५० लाख नवे शेअर जारी केले जणार आहेत. कारण कंपनीला ५८.५७ कोटी रुपयांचं भांडवल उभं करायचं आहे. हा आयपीओ खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांना १२०० शेअर्सचा लॉट खरेदी करावा लागेल. त्यासाठी १.०९ लाख मोजण्याची तयारी ठेवावी लागेल.

४. एपेलटोन इंजिनिअर्स आयपीओ (Eppeltone Engineers IPO)

एपेलटोन इंजिनिअर्स आयपीओ १७ जून रोजी उघडणार असून १९ जून रोजी बंद होईल. ४३.९६ कोटी रुपयांचं भांडवल उभं करण्यासाठी कंपनी ३४.३४ लाख नवे शेअर जारी करणार आहे. या कंपनीच्या एका लॉटमध्ये १००० शेअर्स असतील. एका शेअरची किंमत १२५ रुपयांच्या आसपास असेल. त्यासाठी गुंतवणूकदारांना १.२५ लाख रुपये गुंतवावे लागतील.

५. समय प्रोजेक्ट सर्व्हिसेस आयपीओ (Samay Project Services IPO)

समय प्रोजेक्ट सर्व्हिसेसच्या आयपीओमधील प्रत्येक शेअरची किंमत ३२ रुपये इतकी असेल. ही एक इंजिनिअरिंग, निर्मिती व विक्री करणारी कंपनी आहे. कंपनीला १४.६९ कोटी रुपये उभे करायचे आहेत. यासाठी ४३.२० लाख नवे शेअर्स बाजारात दाखल होत आहेत. या आयपीओच्या एका लॉटमध्ये ४,००० शेअर असतील. त्यासाठी गुंतवणूकदारांना १.२८ लाख रुपये मोजावे लागतील. हा आयपीओ १६ जूनला उघडला असून १८ जूनला बंद होईल.

मेनबोर्ड आयपीओ

६. अरिसिन्फ्रा सोल्यूशन्स (Arisinfra Solutions IPO)

अरिसिन्फ्रा सोल्यूशन्स ही बांधकाम क्षेत्र, पायाभूत सुविधा, विकासक व कंत्राटदारांना निर्मिती क्षेत्रात लागणाऱ्या साहित्याचा पुरवठा करणारी कंपनी आहे. ही कंपनी प्रामुख्याने तारा, टीएमटी बार, माती, स्टील, लोखंडी पाइप्स, वाळू, सीमेंट, वॉल पुट्टीसारख्या वस्तू विकते. अरिसिन्फ्रा सोल्यूशन्स या कंपनीला ४९९.६० कोटी रुपयांचं नवं भांडवल उभं करायचं आहे. त्यासाठी २१० ते २२२ रुपये प्रति शेअर या दराने कंपनी बाजारात आयपीओ आणत आहे. केवळ ६७ शेअर्सचा एक लॉट अशा पद्धतीने आयपीओ उघडणार असून यासाठी गुंतवणूकदारांना १४,०७० रुपये गुंतवावे लागतील. हा आयपीओ १८ जूनला उघडला जाणार असून २० जूनला बंद होईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महत्त्वाची सूचना : वरील माहिती केवळ एक बातमी अथवा आगाऊ सूचना म्हणून देण्यात आली आहे. ‘लोकसत्ता डॉट कॉम’ कोणताही शेअर खरेदी करण्याचा, ठराविक ठिकाणी गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. बाजारातील गुंतवणूक ही जोखमींच्या आधीन असते. त्यामुळे गुंतवणूकदारांनी कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.