Changes In BSE Sensex: मुंबई शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक सेन्सेक्समध्ये दोन नव्या शेअर्सचा समावेश होणार आहे. टाटा ग्रुपची ट्रेंट आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड पुढील महिन्यापासून स्टॉक इंडसइंड बँक आणि नेस्ले इंडियाची जागा घेतील. बीएसई लिमिटेडची उपकंपनी असलेल्या एशिया इंडेक्स प्रायव्हेट लिमिटेडने याबाबत माहिती दिली आहे. दरम्यान निर्देशांकातील हे बदल अॅसेट अलोकेशनचे प्रमाण राखण्यासाठी किंवा निर्देशांकाची जोखीम पातळी सुसंगत ठेवण्यासाठी केले जातात.

सेन्सेक्समधील हे बदल पुढील महिन्यात २३ जून २०२५ रोजी लागू होतील. सेन्सेक्समधील या बदलाचा गुंतवणूकदाराच्या गुतंवणुकीवर मोठा परिणाम होत असतो. कारण एक्सचेंज ट्रेडेड फंड (ETF) आणि सेन्सेक्सचा मागोवा घेणारे म्युच्युअल फंड त्यानुसार त्यांचे पोर्टफोलिओ नियोजित करत असतात. बीएसईच्या मते, निर्देशांकातील बदल ही बाजारासाठी एक महत्त्वाची घटना असते, कारण त्यामुळे गुंतवणूकदारांना बाजारातील निधी कोणत्या दिशेने जात आहे हे कळते.

या बदलामुळे सेन्सेक्समध्ये समावेश होणाऱ्या शेअर्समध्ये गुंतवणूक वाढणार असून, त्यातून बाहेर पडणाऱ्या शेअर्समधून गुंतवणूकदार पैसे काढून घेतील. आयआयएफएल अल्टरनेट डेस्कच्या गणनेनुसार, सेन्सेक्समध्ये ट्रेंटचा समावेश सुमारे २,४०० कोटी किमतीची गुंतवणूक आकर्षित करू शकतो, जो त्याच्या सरासरी दैनंदिन व्हॉल्यूमच्या सुमारे २.५ पट आहे. याशिवाय, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्येही मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येऊ शकते.

दुसरीकडे, सेन्सेक्समधून बाहेर पडल्यामुळे, नेस्ले इंडियातून सुमारे ८०० कोटी रुपयांची गुंतवणूक कमी होण्याची शक्यता आहे. याशिवाय, इंडसइंड बँकेतून १,१५५ कोटी रुपये गुंतवणूक कमी होऊ शकते.

निर्देशांकातील इतर बदल

पुढील महिन्यात, ट्रेंट आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स सेन्सेक्समध्ये इंडसइंड बँक आणि नेस्ले इंडियाची जागा घेतील. सेन्सेक्स व्यतिरिक्त, बीएसईच्या इतर निर्देशांकांमध्येही बदल झाले आहेत. बीएसई १०० निर्देशांकात भारत फोर्ज, डाबर इंडिया आणि सीमेन्सची जागा डिक्सन टेक, कोफोर्ज, इंडस टॉवर्स घेतील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सेन्सेक्स ५० निर्देशांकात, इंडिगोची मूळ कंपनी इंटरग्लोब एव्हिएशन ब्रिटानियाची जागा घेईल. तर श्रीराम फायनान्स हीरो मोटोकॉर्पची जागा घेईल. सेन्सेक्स नेक्स्ट ५० मध्ये इंटरग्लोब एव्हिएशन, श्रीराम फायनान्स, भारत फोर्ज, डाबर इंडिया आणि सीमेन्सची जागा ब्रिटानिया इंडस्ट्रीज, डिक्सन टेक्नॉलॉजीज, कोफोर्ज, हिरो मोटोकॉर्प आणि इंडस टॉवर्स घेतील.