Effect Of Trump Tariffs On Indian Share Market: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत रशियाकडून कच्चे तेल खरेदी करतो आणि त्यामुळे रशियाच्या युद्धयंत्रणेला युक्रेनविरोधा युद्ध करण्यास मदत होत असल्याचा आरोप करत, भारतावर अतिरिक्त २५ टक्के आणि एकूण ५० टक्के टॅरिफ लादले आहे. आजपासून (२७ ऑगस्ट २०२५) भारतावर २५ टक्के अतिरिक्त टॅरिफ लागू झाले आहे. याचा भारतातील विविध क्षेत्रांवर परिणाम व्हायला सुरूवात झाली आहे. अशात ट्रम्प यांच्या या टॅरिफचा भारतीय शेअर बाजारावरही परिणाम होण्याची शक्यता शेअर बाजारातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
ट्रम्प टॅरिफचा शेअर बाजारावर काय परिणाम?
गणेश चतुर्थीसाठी आज बाजार बंद असल्याने, गुरुवारी बाजार पुन्हा सुरू होईल. गुरुवारी निफ्टीची मंथली एक्सपायरी असल्यामुळे पुरवठ्यावर दबाव वाढू शकतो. अॅक्सिस सिक्युरिटीजचे टेक्निकल आणि डेरिव्हेटिव्ह्ज संशोधन प्रमुख राजेश पालवीय यांनी न्यूज१८ ला सांगितले की, “भारतातील बाजारातील भावना सध्या कमकुवत आहे.”
बाजारातील चढ-उतारासाठी तयारी करा
पीएल कॅपिटलचे सल्लागार प्रमुख विक्रम कासट म्हणाले की, “गुंतवणूकदारांनी बाजारातील चढ-उतारासाठी दीर्घ कालावधीसाठी तयारी करावी कारण भारतावर अमेरिकेचे अतिरिक्त टॅरिफ लागू झाले आहे. त्यामुळे द्विपक्षीय चर्चा मंदावू शकतात आणि सर्वसाधारणपणे, सध्या यावर कोणताही तोडगा निघू शकत नाही.”
कासट पुढे असेही म्हणाले की, “व्यापार करार झाल्यास टॅरिफ काही प्रमाणात कमी होऊ शकतात, परंतु जागतिक पुरवठा साखळीतील अस्थिरता आणि बदल चालू राहू शकतात, जोपर्यंत गंभीरपणे पुन्हा वाटाघाटी सुरू होत नाहीत तोपर्यंत टॅरिफचा मुद्दा सामान्य बनू शकतो.”
कापड आणि वस्त्र उत्पादकांनी उत्पादन थांबवले
ट्रम्प यांनी भारतावर लादलेल्या एकूण ५० टक्के टॅरिफचा भारतातील अनेक क्षेत्रांवर वाईट परिणाम होण्याची शक्यता आहे. कापड, दागिने, कोळंबी, कार्पेट आणि फर्निचर उद्योगांना याचा सर्वाधिक फटका बसेल. दरम्यान, फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशनने मंगळवारी सांगितले की ट्रम्प यांच्या निर्णयामुळे तिरुपूर, नोएडा आणि सुरतमधील कापड आणि वस्त्र उत्पादकांनी उत्पादन थांबवले आहे.
मच्छीमारांना फटका बसण्याची भीती
“तिरुपूर, नोएडा आणि सुरतमधील कापड आणि वस्त्र उत्पादकांनी उत्पादन थांबवले आहे. टॅरिफमुळे व्हिएतनाम आणि बांगलादेश सारख्या कमी किमतीच्या स्पर्धकांपुढे हे क्षेत्र मागे पडत आहे. सीफूड, विशेषतः कोळंबीच्या बाबतीत, जगभरातून अमेरिकेत होणाऱ्या कोळंबीच्या निर्यातीमध्ये भारताचा वाटा सुमारे ४० टक्के आहे. टॅरिफ वाढीमुळे साठा कमी होण्याची, पुरवठा साखळी विस्कळीत होण्याची आणि मच्छीमारांना फटका बसण्याची भीती आहे”, असे फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष एससी राल्हन यांनी एका निवेदनात म्हटले आहे.