Nvidia Market Cap : एआय क्षेत्रातील आघाडीची कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एनव्हीडिया कंपनीने इतिहास रचला आहे. बाजार मूल्याच्या बाबतीत जगातील महाकाय कंपन्या ॲपल, मायक्रोसॉफ्टला मागे टाकत पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे. अमेरिकी भांडवली बाजारात सूचिबद्ध असलेल्या कंपन्यांच्या समभागांमध्ये वाढ झाल्यानंतर एनव्हिडियाने अमेरिकी शेअर बाजारात विक्रमी कामगिरी केलीय.
एनव्हिडियाने इतिहास रचत ५ ट्रिलियन अमेरिकन डॉलर्सचं बाजारमूल्य गाठणारी पहिली कंपनी बनली आहे. एनव्हीडिया कंपनीचं बाजार मूल्य ५ ट्रिलियन डॉलरच्या पुढे गेलं आहे. खरं तर भारताच्या अर्थव्यवस्थेपेक्षा एनव्हीडिया कंपनीचं बाजार भांडवल मोठं असल्याचं यावरून दिसत आहे. एनव्हीडिया कंपनीच्या पाठोपाठ ॲपल असल्याची माहिती समोर आली आहे.
खरं तर ही कामगिरी जागतिक तंत्रज्ञान आणि बाजारपेठांना चालना देण्यासाठीच्या कामगिरी प्रकाश टाकते. दरम्यान, २०२२ मध्ये ChatGPT लाँच झाल्यापासून एनव्हिडियाच्या शेअर्समध्ये बारा पटीने वाढ झाली. एनव्हिडिया कंपनीने USD ४ ट्रिलियन ओलांडल्यानंतर अवघ्या तीन महिन्यांत ही कामगिरी केली आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
‘एन्व्हिडिआ’ कंपनी काय करते?
एन्व्हिडिआ ही १९९३ साली जेन्सन ह्युआंग या तैवानी वंशाच्या अमेरिकी अभियंत्यासह त्याच्या दोन मित्रांनी स्थापन केलेली कंपनी सुरुवातीला व्हिडीओ गेमचा दृश्यात्मक प्रभाव वाढवणाऱ्या ग्राफिक्सना बळकटी देणारे सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर विकसित करत असे. त्या काळातील अनेक उच्च दर्जाच्या संगणकीय आणि व्हिडीओ गेमना एन्व्हिडिआच्या ग्राफिक्स मेमरी कार्ड किंवा अन्य हार्डवेअरचे पाठबळ असे. कालांतराने या कंपनीने जीपीयू अर्थात ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट्सची निर्मिती करण्यास सुरुवात केली. त्याद्वारे संगणकाची दृकचित्र प्रक्रिया क्षमता वाढवण्यात येते. या ‘जीपीयू’चा वापर पुढे व्हच्र्युअल रिअॅलिटी तंत्रज्ञानासाठी वाढू लागला. त्यापाठोपाठ आलेल्या कृत्रिम प्रज्ञा तंत्रज्ञानाकरिता ‘प्रोसेसिंग चिप’ तयार करण्याचे कामही एन्व्हिडिआने सुरू केले. यातूनच गेल्या काही वर्षांतच या कंपनीची कैक पटींनी प्रगती झाली.
‘एआय’च्या प्रसाराचा लाभ कसा झाला?
कृत्रिम प्रज्ञा तंत्रज्ञानामध्ये ‘जीपीयू’चा वापर सर्वाधिक महत्त्वाचा मानला जातो. या ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट्सच्या माध्यमातून कृत्रिम प्रज्ञा तंत्रज्ञानाचे किचकट अल्गोरिदम जलद सोडवले जातात आणि त्यातून अपेक्षित परिणाम मांडले जातात. विशेषत: बायोमेट्रिकशी संबंधित ‘एआय’ किंवा आरोग्यविषयक निदान करणाऱ्या ‘एआय’मध्ये ‘जीपीयू’ अतिशय महत्त्वाचे ठरतात. आजघडीला या उद्योग क्षेत्रात एन्व्हिडिआचे ‘जीपीयू’ प्रभावी मानले जातात. त्यामुळे गेल्या काही वर्षांत या कंपनीच्या चिपच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे.
