Swiggy Delivery Charges: सणासुदीच्या काळाचा फायदा घेण्यासाठी फूड डिलिव्हरी कंपनी स्विगीने जोरदार तयारी केली असून, कंपनीने प्रत्येक फूड डिलिव्हरी ऑर्डरवर आकारण्यात येणारे प्लॅटफॉर्म शुल्क १४ रुपये केला आहे. पूर्वी ते १२ रुपये होते. स्विगी प्रत्येक ऑर्डरमधून अधिक नफा मिळवण्याचा आणि नफा वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. स्विगीने एप्रिल २०२३ पासून प्लॅटफॉर्म शुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे. त्यावेळी प्लॅटफॉर्म शुल्क फक्त २ रुपये होते. कंपनी तेव्हापासून ते हळूहळू हे शुल्क वाढवत आहे.
अतिरिक्त खर्च असूनही, स्विगी प्लॅटफॉर्मवरील ऑर्डरच्या प्रमाणात कोणताही परिणाम झालेला नाही. प्रत्येक ऑर्डरवर प्लॅटफॉर्म शुल्कात २ रुपयांची वाढ युजर्सना किरकोळ वाटू शकते, परंतु स्विगीसारख्या कंपन्यांसाठी दररोजच्या ऑर्डरची संख्या लक्षात घेता आर्थिक परिस्थिती सुधारण्यास ते उपयुक्त ठरते.
स्विगी दररोज २० लाखांहून अधिक ऑर्डर्सची डिलिव्हरी करते. सध्याच्या पातळीवर, प्लॅटफॉर्म शुल्कामुळे कंपनीला दररोज २.८ कोटी रुपये किंवा प्रत्येक तिमाहीत ८.४ कोटी रुपये आणि वर्षाला ३३.६ कोटी रुपये अतिरिक्त उत्पन्न मिळेल. आता हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे की, स्विगी सणासुदीच्या हंगामानंतरही प्लॅटफॉर्म शुल्कातील ही वाढ कायम ठेवते की पुन्हा १२ रुपये करते.
१२०० कोटींचा तोटा
एप्रिल-जून २०२५ या तिमाहीत स्विगीला एकत्रित ११९७ कोटी रुपयांचा निव्वळ तोटा झाला होता. गेल्या वर्षीच्या ६११ कोटी रुपयांच्या तोट्यापेक्षा हा ९६ टक्के जास्त आहे. पण, कंपनीचा एकत्रित महसूल वर्षानुवर्षे ५४ टक्क्यांनी वाढून ४९६१ कोटी रुपये झाला. जून २०२४ च्या तिमाहीत तो ३२२२ कोटी रुपये होता. जून २०२५ च्या तिमाहीत स्विगीचा एकूण खर्च ६२४४ कोटी रुपये होता. गेल्या वर्षी हा खर्च ३९०८ कोटी रुपये होता.
फूड डिलिव्हरी व्यवसायात वर्षानुवर्षे १९% वाढ होत आहे, तर क्विक कॉमर्समध्ये १०८% वाढ झाली आहे. प्लॅटफॉर्मचे एकूण ऑर्डर मूल्य गेल्या वर्षीच्या तुलनेत ४५% वाढून १४,७९७ कोटी रुपये झाले.