लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या विप्रोचे संस्थापक अझीम प्रेमजी यांनी त्यांच्याकडे असलेले विप्रोचे १.०२ कोटी समभाग रिशाद प्रेमजी आणि तारिक प्रेमजी या दोन्ही पुत्रांना भेट म्हणून दिले आहेत, अशी माहिती कंपनीने बुधवारी बाजार मंचाला दिली. विप्रोच्या समभागाचे सध्याचे मूल्य ४७२.९ रुपये आहे. या मूल्यानुसार प्रेमजींनी सुमारे ४८३ कोटी रुपये मूल्याची संपत्ती हस्तांतरित केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अझीम प्रेमजी यांनी कंपनीच्या भागभांडवलाच्या ०.२० टक्के हिस्सा भेटरूपात हस्तांतरित केला आहे. या व्यवहारामुळे कंपनीतील एकूण प्रवर्तक आणि प्रवर्तक गटाच्या भागधारणेत कोणताही बदल होणार नाही आणि प्रस्तावित व्यवहारानंतरही तो तसाच राहील. ज्येष्ठ पुत्र रिशाद प्रेमजी हे सध्या विप्रोचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत आणि ते माहिती-तंत्रज्ञान उद्योगातील एक प्रमुख चेहरा आहेत. राष्ट्रीय शेअर बाजारात गुरुवारच्या सत्रात विप्रोचा समभाग १.६८ टक्के घसरणीसह ४७० रुपयांवर बंद झाला. सध्याच्या बाजारभावानुसार कंपनीचे बाजार भांडवल २,४५,५४६ कोटी रुपये झाले आहे.