गेल्या काही वर्षांत म्युच्युअल फंड गुंतवणुकीचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर वाढले आहे आणि त्यातही इक्विटी म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचा ओघ सतत वाढताना दिसतो. पूर्वी तुरळकच दिसणारे ‘इंडेक्स फंड’ या श्रेणीतील फंडांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. वर्ष २००५ ते २०२० या पंधरा वर्षांच्या काळात जेवढ्या ‘इंडेक्स फंड’ योजना बाजारात दाखल झाल्या, त्यापेक्षा अधिक वेगाने गेल्या पाच वर्षात जवळपास सर्वच फंड घराण्यांनी आपल्या ‘इंडेक्स फंड’ योजना बाजारात आणल्या आहेत. त्यामुळेच नेमके हे फंड काय करतात? याची माहिती घेऊया.
‘ॲक्टिव्ह’ आणि ‘पॅसिव्ह’
‘इंडेक्स फंड’ एक प्रकारचे ‘पॅसिव्ह फंड’ असतात. ‘पॅसिव्ह फंड’ म्हणजेच ‘ट्रॅकर फंड’ असे म्हणता येईल. एखाद्या गोष्टीचा मागोवा घेणे, हे या फंडाचे वैशिष्ट्य असते. ‘इंडेक्स फंड’ अशाच प्रकारचे ‘पॅसिव्ह’ गुंतवणूक रणनीती अवलंबणारे फंड आहेत.
निर्देशांकाचा मागोवा घेणे म्हणजे काय?

‘पॅसिव्ह फंड’ ज्या निर्देशांकांचा मागोवा घेतात, त्यापेक्षा अधिक परतावा मिळावा अशी अपेक्षा त्यात नसते. उदाहरणार्थ ‘निफ्टी मिडकॅप १०० इंडेक्स फंड’ हा निफ्टी मिडकॅप १०० या निर्देशांकाचा मागोवा घेईल, म्हणजेच निफ्टी मिडकॅप १०० या निर्देशांकात असलेले १०० कंपन्यांचे समभाग या म्युच्युअल फंड योजनेच्या पोर्टफोलिओमध्ये असतील. या योजनेतील पोर्टफोलिओचा गुंतवणुकीसाठी वेगळा विचार करावाच लागणार नाही. निधी व्यवस्थापकाचे काम सोपे करणारी बाब आहे. दोन आठवड्यापूर्वी लिहिलेल्या लेखात ॲक्टिव्ह फंडाबद्दल लिहिले होते. यामध्ये निफ्टी आणि सेन्सेक्सपेक्षा आम्ही कसे सरस आहोत, हे दाखवण्याची तळमळ निधी व्यवस्थापकांमध्ये दिसते. मात्र या पॅसिव्ह किंवा इंडेक्स फंडांमध्ये तसे दिसत नाही. निफ्टी-फिफ्टी १६ टक्के परतावा देत असेल तर ‘निफ्टी फिफ्टी इंडेक्स फंड’नेसुद्धा १६ टक्के परतावा दिला पाहिजे, हे सोपे गणित आहे.

एनएसईचे निर्देशांक कोणकोणते ?

राष्ट्रीय शेअर बाजारात विविध निर्देशांक आहेत. यामध्ये निफ्टी ५०, निफ्टी नेक्स्ट ५०, निफ्टी मिडकॅप सिलेक्ट, निफ्टी लार्ज मिडकॅप २५०, निफ्टी ५००, मल्टी कॅप फिफ्टी, निफ्टी १०० इक्वल वेट, निफ्टी मिडकॅप १५०, मोमेंटम फिफ्टी निफ्टी ५०० याबरोबरच विविध क्षेत्रांतील निर्देशांक आहेतच. निफ्टी मेटल, निफ्टी फार्मा, निफ्टी प्रायव्हेट बँक, निफ्टी पीएसयू बँक, निफ्टी फिनसर्व्ह वगैरे.

‘इंडेक्स फंड’ कोणत्या प्रकारच्या गुंतवणूकदारांसाठी योग्य ठरतात?समभाग संलग्न गुंतवणूक साधनांमध्ये गुंतवणूक करायची आहे, मात्र बाजारातील जोखमीचा सामना करताना संभाव्य धोका मर्यादित ठेवायचा असेल, तर अशा वेळी ‘इंडेक्स फंड’ गुंतवणुकीस योग्य ठरतात. म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणारे अनेक गुंतवणूकदार निफ्टी किंवा एखाद्या निर्देशांकाबरोबर आपल्या परताव्याची तुलना करण्यात समाधान मानतात. त्यामुळे त्यांच्यासाठी ‘इंडेक्स फंड’ आदर्श ठरतात. जोखमीच्या संदर्भात विचार करायचा झाल्यास ‘इंडेक्स फंड‘ रिस्कोमीटरवर सर्वाधिक जोखीम हीच श्रेणी दाखवतात, पण ‘ॲक्टिव्ह फंड’मध्ये निधी व्यवस्थापकाच्या चुकीच्या निर्णयाचा परिणाम फंड योजनेच्या परताव्यावर होतो. याउलट, ‘इंडेक्स फंडा’मध्ये गुंतवणूक केली तर आपोआपच आघाडीच्या कंपन्यांच्या समभागांमध्ये त्याच प्रमाणात गुंतवणूक होते आणि परतावा सुद्धा समाधानकारक मिळतो. ज्यांना पंधरा-वीस वर्षं अशा दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करायची असेल त्यांनी संपत्ती निर्मितीसाठी ‘इंडेक्स फंडा’चा आवर्जून विचार करायला हवा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘इंडेक्स फंड’ आणि ‘पॅसिव्ह फंड’ यांच्यातील संबंध

सर्व प्रकारचे ‘इंडेक्स फंड’ हे ‘पॅसिव्ह फंड’ असतात, पण सगळेच ‘पॅसिव्ह फंड’ हे ‘इंडेक्स’ फंड असतीलच असे नाही. ‘पॅसिव्ह फंडां’मध्ये ‘इंडेक्स फंड एक्सचेंज ट्रेडेड फंड’ अर्थात ईटीएफ आणि फंड ऑफ फंड या योजनांचाही समावेश होतो. प्रातिनिधिक म्हणून फंडांची नावे देतो आहे. गुंतवणूक करताना काळजीपूर्वक विचार करून, जोखीम विचारात घेऊन आणि तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच गुंतवणूक करा.१ यूटीआय निफ्टी प्रायव्हेट बँक इंडेक्स फंड२ निप्पॉन इंडिया निफ्टी आयटी इंडेक्स फंड३ निप्पॉन इंडिया निफ्टी ऑटो इंडेक्स फंड४ कोटक निफ्टी फिफ्टी इंडेक्स फंड५ डीएसपी निफ्टी बँक इंडेक्स फंड