Why Invest in Fixed Deposit कोणताही माणूस त्याच्या नोकरी -व्यवसायामध्ये स्थिरावला , त्याला नियमित उत्पन्न मिळू लागलं की, गुंतवणुकीचा विचार करू लागतो. त्यावेळी त्याच्यासाठी पहिला उत्तम पर्याय असतो तो त्याच्या जवळचे पैसे फिक्स्ड डिपॉझिटमध्ये गुंतवण्याचा. त्याचबरोबर, मध्यमवर्गीय नोकरदार निवृत्त होतो तेव्हा त्याला मिळालेला प्रोव्हिडंट फंड आणि इतर पैसे गुंतवण्यासाठी त्याच्यासमोरसुद्धा, फिक्स्ड डिपॉझिट हा पर्याय उत्तम आणि सोयीस्कर असतो. फिक्स्ड डिपॉझिट्स हे करिअरच्या सुरुवातीला आणि अखेरीस सुद्धा, निश्चित आणि नियमित परतावा देणारं गुंतवणुकीचं उत्तम साधन आहे. फिक्स्ड डिपॉझिट हा गुंतवणुकीचा सर्वात सोपा आणि सुरक्षित मार्ग मानला जातो.

फिक्स्ड डिपॉझिट किती काळासाठी?

फिक्स्ड डिपॉझिट योजनेमध्ये आपण ठराविक रक्कम बँकेमध्ये किंवा तत्सम वित्तीय संस्थेकडे, ठराविक काळासाठी देतो. ही रक्कम बँकेकडे देण्याचा कालावधी , म्हणजे फिक्स्ड डिपॉझिटचा कालावधी, दहा दिवसांपासून दहा वर्षे किंवा त्यापेक्षा अधिकसुद्धा असू शकतो. फिक्स्ड डिपॉझिट किती काळासाठी करायचं ते आपण , आपल्या सोयीनुसार ठरवू शकतो.

कालावधी जितका जास्त, तितका व्याजदर अधिक

गुंतवलेल्या रकमेवर बँक आपल्याला एका ठरविक दराने व्याज देते. हा व्याजदर बँकेकडे रक्कम देतानाच निश्चित केला जातो. बँक देत असेलला व्याजदर फिक्स्ड डिपॉझिटच्या कालावधीवर अवलंबून असतो. सर्वसामान्यपणे फिक्स डिपॉझिटचा कालावधी जितका जास्त असतो तितका बँक देत असलेल्या व्याजाचा दर सुद्धा जास्त असतो. बँकेकडून व्याजाची रक्कम घेण्याचा कालावधी ठरवण्याची आपल्याला मुभा असते . फिक्स्ड डिपॉझिटवर मिळणाऱ्या व्याजाचा दर हा प्रत्येक बँक किंवा वित्तीय संस्थेनुसार बदलतो. पण फिक्स डिपॉझिटमध्ये गुंतवलेल्या पैशांवर मिळणारा व्याजदर, त्या बँकेच्या सेव्हिंग अकाउंट मध्ये ठेवलेल्या पैशांवर मिळणाऱ्या व्याजदरापेक्षा, नेहमीच जास्त असतो.

money
अधिकचे पैसे सर्वांनाच हवे असतात

वेळप्रसंगी, आपल्याला काही कामासाठी कर्ज घेण्याची गरज पडल्यास त्या कर्जासाठी आपण आपलं फिक्स्ड डिपॉझिट तारण ठेवू शकतो. सर्व बँका आणि वित्तीय संस्था फिक्स्ड डिपॉझिट तारण म्हणून स्वीकारतात. ‘ट्रेझरी बिल्स किंवा ‘गव्हर्मेंट बॉण्ड्स’ मध्ये केली गुंतवणूकसुद्धा सुरक्षित असते पण फिक्स्ड डिपॉझिटवर मिळणारा व्याजदर ट्रेझरी बिल्स किंवा गव्हर्मेंट बॉण्ड्सवर मिळणाऱ्या व्याजदरापेक्षा अधिक असतो. त्याच बरोबर फिक्स्ड डिपॉझिटमध्ये पैसे गुंतवणं आणि परत घेणं हे इतर दोन पर्यांयांच्या तुलनेत अधिक सोपं असतं.

सर्व वयोगटातील भारतीय नागरिक, अनिवासी भारतीय, कॉर्पोरेट कंपन्या , निरनिराळ्या संस्था आणि क्लब्ज , हे सर्व फिक्स्ड डिपॉझिटमध्ये गुंतवणूक करू शकतात. त्यासाठी स्वतःच ओळखपत्र आणि घराचा पत्ता द्यावा लागतो. आधार कार्ड, पॅन कार्ड, लाईट बिल किंवा टेलिफोन बिल एवढी कागदपत्रं पुरेशी असतात. फिक्स्ड डिपॉझिट करण्यासाठी त्या बँकेमध्ये खाते असण्याची आवश्यकता नसते.

फिक्स्ड डिपॉझिट्सचे प्रकार:

फिक्स्ड डिपॉझिटचे एकूण सात प्रमुख प्रकार आहेत . प्रत्येक प्रकारामधून मिळणारे लाभ वेगवेगळे असतात तसेच त्यांच्या अटी आणि नियमसुद्धा वेगवेगळे असतात . या सर्व प्रकारांमधून स्वतःच्या वैयक्तिक गरजा सहजतेने पूर्ण करणारा प्रकार निवडावा.

फिक्सड डिपॉझिटचे एकूण सात प्रमुख प्रकार पुढील प्रमाणे :

१. कॉर्पोरेट फिक्स्ड डिपॉझिट्स :

काही कॉर्पोरेट कंपन्या आणि व्यापारी संस्था स्वतःच्या फिक्स्ड डिपॉझिट स्कीम्स चालवतात . यापैकी बहुतेक कंपन्या बँकांपेक्षा अधिक व्याजदर देतात . पण या कंपन्यांच्या फिक्स्ड डिपॉझिटमध्ये पैसे गुंतवण्यापूर्वी त्या कंपन्यांची पत, त्यांची आर्थिक क्षमता आणि व्यवहार करण्याची पद्धत नीट पासून घ्यावी.

२. स्टँडर्ड फिक्स्ड डिपॉझिट्स:

हा फिक्स्ड डिपॉझिटचा मूलभूत आणि सर्वाधिक वापरला जाणारा प्रकार आहे. यामध्ये बँक किंवा आर्थिक संस्थेकडे ठराविक मुदती साठी पैसे गुंतवले जातात . मुदत संपल्यावर आपण गुंतवलेली रक्कम ठरलेल्या व्याजासहित परत मिळते.

३. सिनिअर सिटीझन फिक्स्ड डिपॉझिट्स :

साठ वर्षां पेक्षा जास्त वय असणाऱ्या सिनिअर सिटिझन्सना फिक्स्ड डिपॉझिट मध्ये पैसे गुंतवायचे असतील तर त्यांच्यासाठी बँकांच्या वेगळ्या स्कीम्स असतात. त्यांना फिक्स्ड डिपॉझिटच्या मुदतीसाठी, सामान्य फिक्स्ड डिपॉझिटच्या मुदतीच्या तुलनेत, खूप जास्त पर्याय दिले जातात. त्यांना मिळणारा व्याजदरसुद्धा इतरांना मिळणाऱ्या व्याजदरापेक्षा जास्त असतो.

४. करात सवलत देणारी फिक्स्ड डिपॉझिट :

काही वेळा करात सवलत मिळवणे हा गुंतवणूक करण्यामागचा मुख्य उद्देश असतो. दीड लाख रुपयां पर्यंतच्या फिक्स्ड डिपॉझिटवर कर सवलत मिळू शकते. त्याच बरोबर, सवलत मिळवण्यासाठी फिक्स्ड डिपॉझिटची मुदत किमान पाच वर्ष असावी लागते.

५. क्युम्युलेटिव्ह फिक्स्ड डिपॉझिट :

यामध्ये आपण गुंतवलेल्या रकमेवर तीन, सहा किंवा बारा महिन्यांनी मिळालेलं व्याज पुन्हा गुंतवलं जातं व त्यावर सुद्धा व्याज मिळू लागतं. यामुळे आपण गुंतवलेली एकूण गंगाजळी वाढत जाते. आपण फिक्स्ड डिपॉझिटमध्ये गुंतवलेली रक्कम आणि आपल्याला त्यावर मिळत गेलेलं व्याज आणि ते व्याज गुंतवल्यामुळे त्यावर मिळालेलं ‘संयुक्त’ किंवा ‘चक्रवाढ व्याज’ हे सर्व आपल्याला फिक्स्ड डिपॉझिटची मुदत संपल्यावर एकाच वेळी मिळतं .

६. नॉन क्युम्युलेटिव्ह फिक्स्ड डिपॉझिट:

या प्रकारच्या फिक्स्ड डिपॉझिटमध्ये गुंतवलेल्या रकमेवर मिळणाऱ्या व्याजापोटी जमा होत असलेली रक्कम आपण प्रत्येक एक महिन्यानंतर, तीन महिन्यां नंतर फिक्स्डकिंवा सहा महिन्यां नंतर काढून घेऊ शकतो. जेव्हा नियमित उत्पन्नाची गरज असते तेव्हा या प्रकारच्या फिक्स्ड डिपॉझिटचा वापर केला जातो . निवृत्त लोकांसाठी या प्रकारचं फिक्स्ड डिपॉझिट अतिशय लाभासायक ठरतं .

७. फ्लेक्सिबल फिक्स्ड डिपॉझिट :

फिक्स्ड डिपॉझिटच्या या योजने मध्ये आपलं बँकेतील खातं ‘सामान्य बँक खातं’ आणि ‘फिक्स्ड डिपॉझिट’ असं बदलत रहातं. ज्या बँके मध्ये आपलं खातं आहे त्या बँकेला आपल्या खात्याचं ‘फ्लेक्सिबल फिक्स्ड डिपॉझिट’ मध्ये रूपांतर करण्याची सूचना द्यावी लागते. फिक्स्ड डिपॉझिटमध्ये ठेवण्याची रक्कम सांगावी लागते. त्यानंतर आपल्याला ते खातं नेहमीच्या सामान्य बँक खात्याप्रमाणे वापरता येतं . त्यातून वापरासाठी पैसे काढता सुद्धा येतात . पैसे काढल्यानंतर, खात्यातील रक्कम जर फिक्स्ड डिपॉझिटसाठी सांगितलेल्या रकमेच्या च्या खाली गेली, तर ते अकाउंट पुनः सामान्य खातं होतं व त्याला सामान्य खात्याचे व्याजदर लागू होतात . त्यानंतर पुनः आपण खात्यात पैसे भरले आणि आणि खात्यातील रक्कम सांगितलेल्या फिक्स्ड डिपॉझिटच्या रकमेपेक्षा जास्त झाली कि ते खातं पुनः फिक्स्ड डिपॉझिटमध्ये परिवर्तित होतं आणि त्याला पुनः फिक्स्ड डिपॉझिटचे व्याज दर लागू होतात . तरुण नोकरदारांमध्ये फ्लेक्सिबल फिक्सड डिपॉझिट विशेष लोकप्रिय आहे.

फिक्स्ड डिपॉझिट मध्ये पैसे गुंतवण्याचे तोटे :

1. कमी परतावा:

फिक्स्ड डिपॉझिट मध्ये केलेल्या गुंतवणुकीवर मिळणारा परतावा, शेअर बाजरामध्ये केलेल्या गुंतवणुकीवर मिळणाऱ्या परताव्याच्या तुलनेत, फार कमी असतो . पण शेअर बाजारामध्ये गुंतवलेले पैसे बुडण्याची शक्यता असते . फिक्स्ड डिपॉझिट मध्ये गुंतवलेले पैसे सुरक्षित असतातच त्याच बरोबर त्या पैशांवर ठराविक परतावा मिळणार हे सुद्धा निश्चित असते.

२. व्याजावर कर :

फिक्स्ड डिपॉझिट मधील गुंतवणुकीवर परतावा व्याजाच्या स्वरूपात मिळतो. या उत्पन्नाची ‘ इन्कम फ्रॉम आदर सोअर्स ‘ मध्ये गणना होते व त्यावर पूर्ण कर आकारला जातो . करात सवलत देणारी फिक्स्ड डिपॉझिट्स आहेत पण त्यातून मिळणारी सवलत अल्प असते. मध्यम आणि मोठ्या गुंवणूकदारांना त्याचा विशेष फायदा होत नाही .

३. ठराविक व्याजदर :

फिक्स्ड डिपॉझिट करताना जो व्याजदर ठरवलं जातो तोच व्याजदर त्या फिक्स्ड डिपॉझिटची मुदत संपेपर्यंत कायम ठेवला जातो. त्यामुळे मधल्या काळात जरी बाजारातील व्याजदर वाढले तरी गुंतवणूकदाराला त्याचा फायदा मिळत नाही. अर्थात , जर व्याजदर कमी झाले तर त्याच नुकसान गुंतवणूकदाराला सोसावं लागत नाही हे सुद्धा तितकंच खरं .

४. दंड आकारणी

फिक्स्ड डिपॉझिट मध्ये गुंतवलेले पैसे मुदत पूर्ण होण्यापूर्वी काढायचे असतील तर बँक त्यासाठी दंड आकारते. दंडाची रक्कम तो पर्यंत मिळालेल्या व्याजाच्या रकमेच्या १ ते ३% इतकी असते.

फिक्स्ड डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करण्याचे हे काही लहान-मोठे तोटे असले तरीही आज भारतातील सर्वात जास्त लोक फिक्स्ड डिपॉझिट मध्येच गुंतवणूक करतात. अधिक पण अनिश्चित परतावा देणाऱ्या साधनां प्रमाणेच थोडा कमी पण निश्चित आणि नियमित परतावा देणाऱ्या साधनांमध्ये गुंवणूक करणं प्रत्येक गुंतवणूकदारच्या हिताचं असतं. त्यामुळेच विविध कंपन्यांचे समभाग किंवा मालमत्ता यामध्ये गुंतवणूक करणारे मोठे आणि मध्यम गुंतवणूकदार सुद्धा आपल्या भांडवलातील काही भाग ‘फिक्स्ड डिपॉझिट ‘ मध्ये सुद्धा गुंतवून ठेवतात.

फिक्स्ड डिपॉझिट मध्ये पैसे गुंतवल्यावर आपल्यावर दडपण येत नाही . आपले पैसे सुरक्षित राहणार याची खात्री असते. गुंतवलेल्या पैशांवर किती नफा मिळणार आणि कधी मिळणार हे आपल्याला नेमकं माहीत असतं . त्यामुळे फिक्स्ड डिपॉझिट मधील गुंतवणूक आरामदायक आणि सुखकारक असते. जी गुंतवणूक सुखकारक असते ती गुंतवणूक सर्वोत्तम असते! त्यामुळेच फिक्स्ड डिपॉझिट मधील गुंतवणूक आपल्यापैकी बहुतेकांसाठी सर्वोत्तम गुंतवणूक आहे!