अमर, अकबर, अँथनीने २४,४००च्या स्तरावर तेजीचं बियाणं पेरलं, त्या तेजीच्या बियाणांना आता हिरवे अंकुर फुटले आणि अंकुरित बियाणांची आता चांगल्या रोपांच्या स्वरूपात वाढ होताना दिसत आहे. येणाऱ्या दिवसात या कोवळ्या रोपांचे झाड बनेल आणि झाडांना तेजीचं फळ लागू शकेल? अर्थात निफ्टी निर्देशांकाचे वरचे लक्ष्य काय असेल आणि ते कधी दृष्टिपथात येईल याचा आज आढावा घेऊया.
आताच्या घडीला निफ्टी निर्देशांकावर २४,४०४ ते २५,४४१ अशी १,०३७ अंशांची तेजी झाली आहे. निफ्टी निर्देशांक सातत्याने पंधरा दिवस २५,५००च्या स्तरावर न टिकल्यास एक हलकीफुलकी घसरण ही २५,१५०… २४,९२० ते २४,५०० पर्यंत संभवते. या स्तरावरून निफ्टी निर्देशांकावर तेजीची पालवी अपेक्षित आहे. निफ्टी निर्देशांकाचे भविष्यकालीन इच्छित वरचे लक्ष्य हे किमतीच्या आणि तारखेच्या स्वरूपात काय असेल त्याचा आज आढावा घेऊया.
भविष्यातील निर्देशांकाच्या उच्चांकाची तारीख काढण्यासाठी आपण एक वर्ष मागे जाऊया. २७ सप्टेंबर २०२४ ला निफ्टी निर्देशांकाने २६,२७७चा सार्वकालिक उच्चांक नोंदविला आणि ७ एप्रिल २०२५ ला २१,७४३ चा नीचांक नोंदवला. या मंदीच्या आवर्तनाला १३० दिवसांचा कालावधी लागला होता. आता हाच १३० दिवसांचा कालावधी गृहीत धरून तो ७ एप्रिलच्या नीचांकात मिळविल्यास १५ ऑक्टोबर तारीख येत आहे. आता १५ ऑक्टोबरपर्यंत, निफ्टी निर्देशांकाचा उच्चांक हा किमती स्वरूपात काय असेल त्याचा आढावा घेऊया.
यासाठी आपण तांत्रिक विश्लेषणातील आता विकसित होणाऱ्या ‘इनव्हर्स हेड अँड शोल्डर’ प्रमेयाचा आधार घेऊया.इनव्हर्स हेड अँड शोल्डरची नेक लाइन ही २५,००३ येत आहे. ही नेक लाइन काढण्यासाठी, ३० जून २०२५ चा उच्चांक २५,६६९ आणि ८ ऑगस्टचा २४,३३७ चा नीचांक या दोहोंमधील फरक (२५,६६९ – २४,३३७ = १,३३२) १,३३२ अंशांचा येतो. आता १,३३२ चे ५० टक्के हे ६६६ अंश येत आहे. आता २४,३३७ च्या नीचांकात ६६६ मिळविले असता २५,००३ हे उत्तर येते. इतके दिवस आपण २५,०००च्या स्तरावरच शाश्वत तेजी सुरू होईल हे अधोरेखित करत होतो त्याचे कारण देखीच हेच. आता वरच्या लक्ष्यासाठी २५,००३ मध्ये १,३३२ (उच्चांक, नीचांकामधील फरक) मिळवता २६,३३५ हा नवीन उच्चांक आपल्या दृष्टिपथात येत आहे. ऑक्टोबरमधील तेजीच्या वादळवाऱ्यात १५ ते ३१ ऑक्टोबरपर्यंत आपल्याला निफ्टी निर्देशांक २६,०००… २६,३३५… २६,५००… २६,८०० पर्यंत झेपावेल.
सरलेल्या ऑगस्टमधील ‘ट्रम्प टॅरिफ टेरर’ परिणामी आलेल्या मंदीत तेजीचा ‘त’ शब्द उच्चारताना ‘त त प प’ व्हायचं. इतक्या दाहक मंदीच्या गर्तेत आपण होतो. अमर (चलत सरासरी), अकबर (फेबुनासी रिट्रेसमेंट) , आणि अँथनी (गॅन अँगल) यांना हाताशी घेत, ‘आता बस झाली मंदी!’ असे आपण म्हटले. तेजीच बियाणं पेरून, तेजीची वाटचाल सुरू केली. त्या वेळेला पेरलेल्या तेजीच बियाण, फळ देणाऱ्या झाडात रूपांतर होऊन, त्या झाडाला लागलेली फळ चाखायची वेळ येत आहे. निफ्टी निर्देशांकाचं वरचं लक्ष दृष्टिपथात येते तेव्हा या शास्त्राबद्दल आदर ठेवत, अल्प मुदतीची गुंतवणूक धारणा असलेल्या गुंतवणूकदारांनी समभाग विकणं, फायदा पदरात पाडून घेणं हेदेखील गरजेचं आहे.
निसर्गनियमाप्रमाणे सूर्योदयानंतर सूर्यास्त, भरतीनंतर ओहोटी तद्वत आता चालू असलेल्या तेजीनंतर मंदी. वरील लक्ष्य साध्य झाल्यावर जी काही मंदी येईल त्यात निफ्टी निर्देशांकावर १,५०० ते २,५०० अंशांची घसरण संभवते. या मंदीत निफ्टी निर्देशांकाने काळाच्या कसोटीवर उतरलेले २५,००० व २४,००० चे ‘धारणा निर्देशक’ (ट्रेंड डिसायडर लेव्हल्स) राखल्या तर या अंकुरित तेजीच्या बियाणांचा २७,५००, २८,००० ते ३३,०००चा वटवृक्षदेखील २०२६-२७ पर्यंत होईल. वरील लेखाचा आशय एका ओळीत मांडायचा झाल्यास संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची रचना ‘इवलेंसें रोप लाविलें द्वारीं त्याचा वेलू गेला गगनावरी’ असं म्हणायला हरकत नाही.
आशीष ठाकूर लेखक भांडवली बाजार विश्लेषक आहेत.
ashishthakur1966@gmail.com
अस्वीकृती:- शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टाॅप लाॅस’ आणि इच्छित लक्ष्य या संकल्पनांचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.