एलटीआय- माइंडट्री ही एक जागतिक तंत्रज्ञान सल्लागार आणि डिजिटल सोल्यूशन्स कंपनी आहे. जी विविध उद्योगांना डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून व्यवसाय प्रारूपाची पुनर्कल्पना करण्यास आणि नवोपक्रमाला गती देण्यास आणि वेगात वाढ करण्यास सक्षम करते. कंपनी आपल्या सातशेहून अधिक ग्राहकांसाठी ‘डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन’ भागीदार म्हणून, एका अभिसरणशील जगात ग्राहक अनुभव आणि व्यवसाय परिणामांना चालना देण्यासाठी व्यापक तंत्रज्ञान कौशल्य आणते. लार्सन अँड टुब्रो समूहातील ही कंपनी जगभरातील ४० हून अधिक देशांमध्ये डोमेन आणि तंत्रज्ञान, ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट, मेंटेनन्स, एंटरप्राइझ सोल्यूशन्स, इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेंट, टेस्टिंग, ॲनालिटिक्स, आर्टिफिशियल इंटेलिजेंस, कॉग्निटिव्ह सोल्यूशन्स, डिजिटल सोल्यूशन्स आणि प्लॅटफॉर्म-आधारित सोल्यूशन्स यासारख्या विस्तृत आयटी सेवा देते. या सेवा पुरवण्यासाठी कंपनीच्या जगभरात सुमारे २३ उपकंपन्या आहेत. कंपनीकडे जागतिक स्तरावर ८४,००० हून अधिक कर्मचारी असून कंपनी ३८ देशांमध्ये ७०० हून अधिक ग्राहकांना सेवा देते.
महसूल मिश्रण

अ) उद्योगानुसार: आर्थिक वर्ष २५

बँकिंग, वित्तीय सेवा आणि विमा: ३६.१ टक्के
तंत्रज्ञान, माध्यमे आणि संप्रेषण: २४.५ टक्के
उत्पादन आणि संसाधने: १९ टक्के
ग्राहक व्यवसाय: १४.३ टक्के
आरोग्य, जीवन विज्ञान आणि सार्वजनिक सेवा: ६.१ टक्के
ब) भूगोलानुसार: आर्थिक वर्ष २५
उत्तर अमेरिका: ७४.८ टक्के
युरोप: १४.१ टक्के
उर्वरित : ११.१ टक्के

कंपनीची मुंबई, पुणे, बेंगळूरु आणि चेन्नई येथे ‘ऑफशोअर डिलिव्हरी सेंटर’ आहेत. तसेच अमेरिका, कॅनडा, युरोप, दक्षिण आफ्रिका, मध्य पूर्व आणि सिंगापूर येथे जागतिक विकास केंद्रे आणि विविध विक्री कार्यालये आहेत. डिसेंबर २०२४ मध्ये, कंपनीने ‘एआय’-चालित सायबर धोक्याच्या संरक्षणासह जागतिक ग्राहकांना समर्थन देण्यासाठी बेंगळूरुमध्ये त्यांचे ‘सायबर डिफेन्स रेझिलियन्सी सेंटर’ (सीडीआरसी) सुरू केले आहे. कंपनीने गेल्या आर्थिक वर्षांत जागतिक उत्पादक आणि दैनंदिन कार्यासाठी कृत्रिम प्रज्ञा (एआय) वापरणाऱ्या अणुऊर्जा कंपनीसाठी आयटी लँडस्केप व्यवस्थापनासह प्रमुख कार्यादेश प्राप्त केले आहेत.

कंपनीची सिस्को, डेटाब्रिक्स, आयबीएम, एसएपी, डेल, मायक्रोसॉफ्ट, ओरॅकल, सर्व्हिसनाऊ, गूगल क्लाऊड इत्यादींशी धोरणात्मक भागीदारी आहे. फेब्रुवारी २०२५ मध्ये, त्यांनी बँकिंग आणि आयटी सेवा सुधारण्यासाठी ‘युरोबँक एसए’सोबत सहकार्य केले. फेअरफॅक्स डिजिटल सर्व्हिसेससाठी भारतात जागतिक वितरण केंद्र स्थापन केले. एलटीआयमाइंडट्री आणि गूगलने ‘एजंटिक एआय’च्या साह्याने व्यवसाय परिवर्तन घडवून आणण्यासाठी धोरणात्मक भागीदारीची घोषणा केली आहे. जगभरातील ग्राहकांसाठी ‘एजंटिक एआय’ वापरून गूगल क्लाऊड तंत्रज्ञानाचा फायदा होईल.

मार्च २०२५ अखेर सरलेल्या आर्थिक वर्षात कंपनीने ३८,००८ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ४,६०२ कोटी रुपयांचा नक्त नफा कामावला आहे. तर मार्च २०२४ साठी अखेर सरलेल्या तिमाहीत, कंपनीने ९,७७२ कोटी रुपयांच्या उलाढालीवर १,१२९ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. कंपनीकडे यंदा अनेक चांगले प्रकल्प आहेत. अमेरिकेतील एका आघाडीच्या आयुर्विमा कंपनीचे कामकाज सुधारण्यासाठी ‘एआय’ वापरून त्यांच्या गुणवत्ता प्रक्रिया वाढवण्यासाठी एलटीआयमाइंडट्रीशी करार केला आहे, ज्यामुळे ‘एंटरप्राइझ’ गुणवत्ता अभियांत्रिकी परिपक्वता वाढेल. हा एक बहु-वर्षीय करार आहे, जो दर्जेदार अभियांत्रिकी पद्धती निर्मितीवर आणि कार्यात परिवर्तन करण्यासाठी ‘एआय’चा वापर करण्यावर लक्ष केंद्रित करेल. तसेच एका आघाडीच्या जागतिक वित्तीय संस्थेने त्यांच्या ‘डेटा सेंटर मायग्रेशन’ प्रकल्पासाठी एलटीआयमाइंडट्रीची निवड केली आहे. या करारात कामकाजाचा एकूण खर्च कमी करताना कामगिरी जास्तीत जास्त करण्याच्या उद्देशाने व्यापक पायाभूत सुविधा डिझाइन आणि आर्किटेक्चरचा विकास समाविष्ट आहे. कंपनीने एका आघाडीच्या उत्तर अमेरिकन युटिलिटी कंपनीकडून कंत्राट मिळवले असून एलटीआयमाइंडट्रीचा ‘बिझनेस-फर्स्ट’ दृष्टिकोन ग्राहकांना खर्च कार्यक्षमता आणि उत्पादकता सुधारताना मोठ्या प्रमाणात गुणवत्ता प्राप्त करण्यास मदत करेल.

गेल्या महिनाभरत हा शेअर सुमारे ७०० रुपयांनी वाढून सध्या ५,२०० रुपयांच्या आसपास उपलब्ध आहे. प्रत्येक घसरणीत हा शेअर एक प्रदीर्घ गुंतवणूक म्हणून पोर्टफोलियोमध्ये ठेवावा. शेअरबाजारातील अनिश्चितता पाहता हा शेअर सध्याच्या किमतीपेक्षा कमी भावात मिळू शकतो, म्हणून प्रत्येक मंदीत तसेच टप्प्यप्प्प्याने शेअर खरेदीचे धोरण ठेवावे.

एलटीआय-माइंडट्री लिमिटेड (बीएसई कोड ५४०००५)

संकेतस्थळ: http://www.lntinfotech.com

प्रवर्तक: लार्सन अँड टुब्रो समूह

बाजारभाव: रु. ५,२१५/-

प्रमुख उत्पादन/ व्यवसाय: माहिती तंत्रज्ञान

भरणा झालेले भाग भांडवल: रु. २९.६० कोटी

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)

प्रवर्तक ३५.९७

परदेशी गुंतवणूकदार १०.००

बँक/ म्युच्युअल फंड/ सरकार ९.८४

इतर/ जनता ४४.१९

पुस्तकी मूल्य: रु. ७६६

दर्शनी मूल्य: रु. १/-

लाभांश: ४५००%

प्रति समभाग उत्पन्न: रु. १५५.२१

किंमत उत्पन्न गुणोत्तर: ३३.६

समग्र किंमत उत्पन्न गुणोत्तर: २८.१

डेट इक्विटी गुणोत्तर: ०.१०

इंटरेस्ट कवरेज गुणोत्तर: २३.३

रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉइड (आरओसीई): २७.६

बीटा : १.२

बाजार भांडवल: रु. १,५४,५९७ कोटी (लार्ज कॅप)

वर्षभरातील उच्चांक/ नीचांक: ६,७६८/३,८०२

गुंतवणूक कालावधी : २४ महिने

Stocksandwealth@gmail.com

वरील लेख केवळ विश्लेषणात्मक संशोधन असून तो गुंतवणूक सल्ला नाही.

प्रस्तुत लेखामध्ये सुचवलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या ०.१% पेक्षा कमी आहे. तसेच सुचवलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लेखात सुचवलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, शेअर मधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर अथवा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.