भारताच्या अर्थव्यवस्थेचा विचार केल्यास रसायन तंत्रज्ञान उद्योग सकल देशांतर्गत उत्पादनाच्या अर्थात ‘जीडीपी’तील सात टक्के हिस्सा व्यापतो. देशाच्या एकंदरीत औद्योगिक उत्पादनापैकी १५ टक्के उत्पादन रसायन कंपन्या करतात. म्हणूनच आजच्या क्षेत्र अभ्यासाचा विषय आहे, भारतातील केमिकल अर्थात रसायन बनवणाऱ्या कंपन्या आणि रसायन उद्योग.

आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये प्रमुख रसायनांची एकूण निर्मिती ३१ लाख टन इतकी होती, पेट्रोलियम रसायनांचा वाटा यामध्ये वाढताना दिसतो आहे.भारतातून परदेशात निर्यात होणाऱ्या रसायन उत्पादनांमध्ये सतत वाढ होते आहे. भारताच्या एकूण निर्यातीपैकी दहा टक्के हिस्सा अशा रसायनांचाच आहे. (यामध्ये फार्मा उद्योगाशी संबंधित आणि खतनिर्मिती संबंधित रसायने नाहीत.)

रसायनांचा विचार करायचा झाल्यास मूलभूत रसायने, खतनिर्मितीसाठी वापरली जाणारी रसायने, कीटकनाशके आणि शेतीमध्ये उपयुक्त असणारी रसायने, घरगुती आणि व्यापारी वापरासाठीचे रंग, कापड रंगवण्यासाठी वापरण्यात येणारे ‘डायस्टफ’, मुलामा देण्यासाठी वापरण्यात येणारे रसायन, कृत्रिम धाग्यांच्या निर्मितीमध्ये वापरली जाणारी रसायने, ‘स्पेशालिटी केमिकल’, खाद्य पदार्थ, वेष्टनांकित खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी लागणारी रसायने, कॉस्टिक सोडा, धुलाईसाठी लागणारा साबण, सुगंधी द्रव्य, सौंदर्य प्रसाधने, खनिज तेल शुद्ध करताना त्यात निर्माण होणारी रसायने, शाई, कार्बनचा समावेश होणारी आणि न होणारी रसायने यांचा समावेश होतो.

हेही वाचा…बाजाराचा तंत्र-कल : शेअर बाजाराला बाळसं की सूज?

एखाद्या ठिकाणी मानवी वस्ती वाढायला लागली, लोकसंख्या वाढू लागली की, आपोआपच अनेक क्षेत्रांत रसायनांच्या वापराची आवश्यकता निर्माण होते. पूर्वी युरोपीय राष्ट्रांमध्ये आणि अन्य प्रगत राष्ट्रात कार्यरत असलेल्या बलाढ्य रसायन निर्मिती कंपन्या आता आशिया खंडात प्रामुख्याने दक्षिण आशियामध्ये येऊ लागल्या आहेत. यामध्ये पेट्रोलियम उत्पादनांपासून निर्माण होणाऱ्या रसायनांचाही समावेश आहे. भारतासारख्या देशाला वाढत्या औद्योगिकीकरणामुळे रसायन निर्मितीची गरज भासणार हे निश्चितच.
वाढता वाढता वाढे!

एकूण रसायन तंत्रज्ञान क्षेत्रापैकी फक्त पेट्रोकेमिकल या क्षेत्राचाच विचार करायचा झाल्यास हे क्षेत्र २०४० पर्यंत एक अब्ज डॉलर एवढ्या मूल्याचे वाढलेले असेल. भारतातील रसायन उद्योगाचा आवाका नुसताच वाढत नसून जागतिक स्तरावर भारत रसायन निर्मिती उद्योगात अग्रेसर देश म्हणून पुढे येत आहे. गेल्या २५ वर्षांत या क्षेत्रात २१ अब्ज डॉलर एवढ्या रकमेची प्रत्यक्ष परदेशी गुंतवणूक झाली आहे. भारतातील या क्षेत्रात कार्यरत असलेल्या अनेक कंपन्या गुंतवणूकदारांसाठी गुंतवणूक संधी म्हणून विचारात घेता येतील. या कंपन्यांची थोडक्यात यादी करायला गेल्यास प्रत्यक्ष रसायन बनवणे आणि त्याचबरोबरीने रसायनांच्या मदतीने वेगवेगळी ग्राहक उपयोगी आणि औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाची उत्पादने बनवणे या दोन्ही प्रकारच्या व्यवसायांचा समावेश होतो हे आपल्याला लक्षात येईल.

फक्त रसायने बनवणाऱ्याच १५० पेक्षा जास्त कंपन्या शेअर बाजारामध्ये सूचिबद्ध आहेत. ‘डाय पिगमेंट’, खते, रसायने, रंग, कृषी उद्योगाशी संबंधित रसायने अशा कंपन्या एकत्र केल्यास अडीचशेपेक्षा जास्त कंपन्या आपल्याला अभ्यासायला मिळतील.
‘ ’
टाटा केमिकल, यूपील, एशियन पेंट, बर्जर पेंट, नेरोलॅक, पिडिलाइट इंडस्ट्रीज, प्राज इंडस्ट्रीज, कोरोमंडल इंटरनॅशनल, राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर्स (आरसीएफ), चंबल फर्टिलायझर्स, दीपक नाइट्रेट, गोदरेज इंडस्ट्रीज, गोदरेज ॲग्रोवेट, बायर क्रॉप सायन्स, अतुल, विनती ऑरगॅनिक, आरती इंडस्ट्रीज, गुजरात नर्मदा व्हॅली फर्टिलायझर, लक्ष्मी ऑरगॅनिक इंडस्ट्रीज, रॅलीज इंडिया, अस्टेक लाइफ सायन्स अशा अनेक कंपन्या या व्यवसायात कार्यरत आहेत. सगळ्यांचे व्यवसाय वेगवेगळे आहेत पण समान दुवा रसायने निर्मिती किंवा रसायनाचा वापर करून उत्पादन हा आहे. आयसीआयसीआय प्रुडेन्शियल कमॉडिटी फंड, एचडीएफसी डिफेन्स फंड, टाटा नॅचरल रिसोर्सेस फंड या योजनांमध्ये केमिकल कंपन्यांचा समावेश पोर्टफोलिओमध्ये केलेला ठळकपणे दिसून येतो.

हेही वाचा…Money Mantra: हयातीचा दाखला ऑनलाईन मिळवण्यासाठी जीवन प्रमाण सुविधा काय आहे?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भविष्याचा वेध

भारत सरकारने उत्पादनाशी निगडित प्रोत्साहन योजना अर्थात ‘पीएलआय’अंतर्गत रसायन निर्मितीसाठीही भक्कम पाठबळ दिले आहे. या वर्षी जाहीर झालेल्या अंतरिम अर्थसंकल्पात रसायने आणि पेट्रोलियम रसायने या विभागासाठी वेगळी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली होती. भारत तंत्रज्ञानाच्या बाबतीत जर्मनी ,चीन यांसारख्या देशांच्या तुलनेत अजूनही प्रगतिपथावर आलेला नाही. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात स्पर्धात्मक किमतीत रसायने निर्माण करणे आणि त्याची निर्यात करणे यामध्ये आपल्याला अजून बरीच मजल गाठायची आहे. रसायन निर्मिती या उद्योगाशी संबंधित मोठी व्यावसायिक जोखीम म्हणजे या उद्योगात होणारे प्रदूषण. कितीही दावे केले तरी रसायन निर्मिती करणाऱ्या कंपन्या आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या प्रदूषणाच्या समस्या याकडे आपल्यासारख्या तिसऱ्या जगातील देश म्हणवल्या जाणाऱ्या व्यवस्थेत फारसे लक्ष दिले जात नाही. मात्र शाश्वत विकास आणि फायदेशीर व्यवसाय यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाला पर्याय नाही. एकमेका साहाय्य करू या उक्तीनुसार ‘लॉजिस्टिक्स कॉरिडॉर’, निर्यातीसाठी तयार होणाऱ्या बंदरातील व्यावसायिक संधी आणि परदेशी कंपन्यांना भारतात उत्पादन करण्यासाठी आकर्षित करणाऱ्या योजना, यामुळे या क्षेत्राचा विकास होणार आहे.