अजय वाळिंबे
माझा पोर्टफोलियो
एसबीआय कार्ड्स अँड पेमेंट सर्व्हिसेस लिमिटेड
(एसबीआय कार्ड)
(बीएसई कोड ५४३०६६)
प्रवर्तक: स्टेट बँक ऑफ इंडिया
बाजारभाव: रु. ८६६/-
प्रमुख उत्पादन/ व्यवसाय : एनबीएफसी
भरणा झालेले भाग भांडवल: रु. ९४६.१२ कोटी
शेअर होल्डिंग पॅटर्न (%)
प्रवर्तक ६९.०२
परदेशी गुंतवणूकदार ८.४५
बॅंक्स/ म्युच्युअल फंडस्/ सरकार १७.४७
इतर/ जनता ५.०६
पुस्तकी मूल्य: रु.१०४/-
दर्शनी मूल्य: रु. १० /-
गतवर्षीचा लाभांश: २५ %
प्रति समभाग उत्पन्न: रु. २३.९
किंमत उत्पन्न गुणोत्तर: ३६.२
समग्र किंमत उत्पन्न गुणोत्तर: २४.४
रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लोईड (आरओसीई): १३%
नेट इंट्रेस्ट मार्जिन : ११.५ टक्के
डेट इक्विटी गुणोत्तर: ३.१६
इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर: २.८४
बीटा: १.१
बाजार भांडवल: रु. ८१,९९५ कोटी (लार्ज कॅप)
वर्षभरातील उच्चांक/ नीचांक: १०२९/६५६
एसबीआय कार्ड्स आणि पेमेंट सर्व्हिसेस लिमिटेड ही भारतातील सर्वात मोठी वाणिज्य बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाची उपकंपनी असून महत्त्वाची बॅंकेतर वित्तीय कंपनी आहे. कंपनीचा प्रमुख व्यवसाय भारतातील ग्राहकांना क्रेडिट कार्ड जारी करणे आहे. २५ वर्षांपूर्वी १९९८ मध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया आणि जीई कॅपिटल यांनी एसबीआय कार्ड सादर केले होते. त्या नंतर २०१७ मध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया आणि कार्लाइल ग्रुपने कंपनीमध्ये जीई कॅपिटलचा हिस्सा विकत घेतला. मार्च २०२० मध्ये ७५५ रुपये प्रतिसमभाग दराने प्रारंभिक समभाग विक्रीच्या माध्यमातून, एसबीआय कार्ड्स आणि पेमेंट सर्व्हिसेस ही भारतातील स्टॉक एक्स्चेंजवर सूचिबद्ध होणारी पहिली क्रेडिट कार्ड कंपनी ठरली आहे. कार्ड-इन-फोर्स आणि खर्चाच्या बाबतीत, कंपनी दुसऱ्या क्रमांकावर आहे. एसबीआयचा सक्रिय कार्ड बेस १.६८ कोटी (गेल्या आर्थिक वर्षापेक्षा २२ टक्के अधिक) आहे.
आणखी वाचा- मार्ग सुबत्तेचा: पेन्शन पोर्टफोलिओ बांधताना…
कंपनीकडे आठ प्रकारच्या मुख्य कार्ड्सचा पोर्टफोलिओ आहे, जो वेगवेगळ्या ग्राहक विभागांना लक्ष्य करतो. एसबीआय कार्ड्स भारतातील सर्वात मोठी को-ब्रँड क्रेडिट कार्ड जारीकर्ता आहे. ज्यामध्ये उद्योगांमध्ये २३ भागीदार असून त्यात बीपीसीएल, टाटा, आदित्य बिर्ला, विस्तारा एअरवेज, नेचर्स बास्केट, फॅब इंडिया, आयआरसीटीसी, लाइफस्टाइल रिटेल, फेडरल बँक, पंजाब अँड सिंध, यूको, सेंट्रल बँक इ.). कंपनीने “AURUM” सादर करून “सुपर प्रीमियम” श्रेणीमध्ये प्रवेश केला आहे.
आणखी वाचा-गुंतवणूक ओघ आटला! एप्रिलमध्ये ‘इक्विटी फंडां’च्या गुंतवणुकीत ७० टक्के घसरण
कंपनीचे २०२३ साठी संपलेल्या आर्थिक वर्षाचे निकाल जाहीर झाले आहेत. अपेक्षेप्रमाणे कंपनीने उत्तम कामगिरी करून दाखवली आहे. कंपनीच्या नेट इंटरेस्ट मार्जिनमध्ये वाढ झाली नसली तरीही कंपनीच्या उलाढालीत गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत २६ टक्के वाढ होऊन ती १४,२८६ कोटींवर गेली आहे. तर नक्त नफ्यात ४० टक्के वाढ होऊन, तो २,२५८ कोटींवर पोहोचला आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत कंपनीच्या इंटरेस्ट तसेच कमिशन उत्पन्नात वाढ होऊन ११,३०२ कोटींवरून १४,२८६ कोटींवर गेले आहे. कंपनीने २०२२-२३ या आर्थिक वर्षात सुमारे १३.७१ लाख नवीन खाती उघडून ३७ टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. कंपनीच्या नक्त अनुत्पादित कर्जामध्ये थोडी वाढ होऊन ती ०.८७ टक्क्यांवर पोहोचली आहे. भारतातील तरुणांचा क्रेडिटकार्डमधील सहभाग वाढता आहे. आगामी कालावधीत देखील कंपनीची कामगिरी आश्वासक असेल अशी अपेक्षा आहे. एसबीआयसारखी उत्तम आणि बलाढ्य प्रवर्तक असलेली तसेच “ट्रिपल ए” पतमानांकन असलेली एसबीआय कार्ड्स आणि पेमेंट सर्व्हिसेस तुमच्या पोर्टफोलियोत असायला हरकत नाही.