गुंतवणूक करायची आहे, पण शेअर मार्केट नको ? म्युच्युअल फंड म्हणजे काय समजत नाही ? म्युच्युअल फंडातील वेगवेगळ्या योजनांमध्ये नक्की किती ‘रिस्क’ आहे याचा अंदाज घेता येत नाही ?

अशा शंका तुमच्या मनात येतात का ? शेअर बाजार तर नकोय पण बँकांच्या फिक्स डिपॉझिटपेक्षा जास्त रिटर्न मिळावी अशी तुमची इच्छा आहे का ?

यासाठी एक उत्तम मार्ग तुमच्यासमोर आहे, तो म्हणजे कॉर्पोरेट फिक्स डिपॉझिट किंवा कंपनी फिक्स डिपॉझिट. भारतातील गुंतवणूकदारांसाठी पोस्ट ऑफिस आणि घराच्या जवळ असलेली बँक हेच गुंतवणुकीसाठी आदर्श पर्याय असायचे. कारण गुंतवणूक सुरक्षित आणि गुंतवणूक करण्याची प्रक्रिया सुद्धा सोपी. पण जसजसा काळ बदलत गेला तसतसे बँकांचे आणि पोस्टाचे व्याजदर तितकेसे आकर्षक राहिलेले नाही. मग आता पैसे कुठे गुंतवायचे ? यावर उपाय म्हणजे कंपन्यांचे फिक्स डिपॉझिट.

आणखी वाचा: Money Mantra: सोळावं वरीस सोन्याचं! ‘हा’ फंड आपल्या …

विविध कंपन्यांच्या आकर्षक योजना असतात. या कंपन्यांमध्ये मध्यम आणि दीर्घ मुदतीसाठी पैसे ठेवणे लाभदायक असते. सहा महिने किंवा एक वर्षासाठी पैसे ठेवायचे असल्यास रिटर्न मध्ये फार फरक पडणार नाही पण तुम्हाला तीन किंवा पाच वर्षासाठी पैसे गुंतवायची इच्छा असेल तर विविध पर्याय उपलब्ध आहेत.

कंपनी- कालावधी- व्याजदर (व्याज मुदतीनंतर मिळेल)
बजाज फायनान्स- १५ महिने- ७.४५%
बजाज फायनान्स- २२ महिने-७.५०%
बजाज फायनान्स- ४४ महिने- ८.३५%
बजाज फायनान्स-३६ ते ६० महिने-८.०५%
बजाज फायनान्स-ज्येष्ठ नागरिकांसाठी ४४ महिने- ८.६०%
महिंद्रा फायनान्स-३६ महिने-८.०५% (ज्येष्ठ नागरिकांसाठी ०.२५% अधिक)
महिंद्रा फायनान्स-३० महिन्यांसाठी-७.९०%
महिंद्रा फायनान्स-४२ महिन्यांसाठी-८.०५%
श्रीराम फायनान्स-२४ महिने- ७.७६%
श्रीराम फायनान्स-४२ महिने-८%
श्रीराम फायनान्स-५० महिने-८.१८%
मुथूट कॅपिटल-६० महिने-७.२५

कंपनी फिक्स डिपॉझिटमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला दोन प्रकारचे पर्याय उपलब्ध असतात. पहिल्या पर्यायात तुम्ही दर महिन्याला / दर तीन महिन्यांनी / सहा महिन्यांनी किंवा वर्षअखेरीस व्याज खात्याला जमा करून घेऊ शकता. जर तशी इच्छा नसेल तर तुम्ही जेवढ्या कालावधीसाठी फिक्स डिपॉझिट केले आहे त्याचा कालावधी संपल्यावर तुम्हाला ते व्याज मिळू शकते. दुसऱ्या पर्यायात मुदत संपल्यानंतर व्याज मिळाल्यामुळे त्याची ‘इफेक्टिव्ह यिल्ड’ वाढते. कॉर्पोरेट फिक्स डिपॉझिट मध्ये बँकेच्या किंवा पोस्टाच्या दरमहा बचत योजनेसारखे पैसे ठेवता येतात. म्हणजेच दर महिन्याला एक ठराविक रक्कम ठेवायची. समजा तुम्हाला दोन वर्षांनी घरात एखादी वस्तू विकत घेण्यासाठी पैसे लागणार असतील तर दर महिन्याला रक्कम बाजूला काढून या पर्यायांमध्ये गुंतवल्यास चांगला व्याजदर मिळतो.

आणखी वाचा: ट्रान्सपोर्टेशन अँड लॉजिस्टिक्स-भविष्यातील प्रगतीचे इंजिन

कॉर्पोरेट फिक्स डिपॉझिट आणि जोखीम

ज्याप्रमाणे सगळ्या गुंतवणूक पर्यायांमध्ये जोखीम असतेच त्याचप्रमाणे कॉर्पोरेट फिक्स डिपॉझिट मध्ये सुद्धा कंपनीचे क्रेडिट रेटिंग महत्त्वाचे असते. तुम्ही ज्या कंपनीच्या फिक्स डिपॉझिटमध्ये पैसे गुंतवता आहात त्या कंपनीचे नफ्याचे आकडे कसे आहेत ? कंपनीने लोकांकडून घेतलेले पैसे ज्यांना कर्ज म्हणून दिले आहेत त्या कर्जाची नियमितपणे वसुली होते की नाही ? यावरून कंपनीला ‘क्रेडिट रेटिंग’ दिले जाते. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये जाऊन आल्यानंतर, एखादा सिनेमा बघितल्यानंतर जर त्याचा दर्जा चांगला असेल तर तुम्ही त्याला जास्त पॉईंट द्याल तसेच ‘क्रेडिट रेटिंग एजन्सी’ फिक्स डिपॉझिट उपलब्ध करून देणाऱ्या कंपन्यांचे तुलनात्मक अवलोकन करून त्यांना रेटिंग देतात.

या एफडी मध्ये बसणारा टॅक्स तुम्हाला किती व्याज मिळते यावर असतो. वार्षिक व्याज पाच हजाराच्या वर असेल तर टीडीएस कापला जातो, या नियमांत वेळोवेळी बदल होत असतात हे लक्षात असुद्या.

** या लेखामध्ये सुचवलेल्या कंपन्यांच्या फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करताना जोखीम विषयक सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून आणि आपल्या गुंतवणूक सल्लागाराला विचारून आपल्या जोखमीवरच गुंतवणूक करावी.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.