संकटं ही दोन प्रकारात विभागली जातात. एक ‘सुलतानी संकट’ तर दुसरं ‘अस्मानी संकट’. सुलतानी संकट हे मानव निर्मित असतं. जुन्या काळात राजांनी लावलेले विविध जाचक कर, जाचक अटी वगैरे आणि अस्मानी संकट म्हणजे निसर्गाचा कोप. आज दुर्दैवाने भारताच्या बाबतीत ही दोन्ही संकटं आ वासून उभी ठाकली आहेत. यात अस्मानी संकट म्हणजे उत्तर भारतात, विशेषतः पंजाबमध्ये आलेला पूर, तर सुलतानी संकट म्हणजे ‘ट्रम्प टेरर, टॅरिफ.’ एक सुभाषित प्रचलित आहे. ‘प्रत्येक प्रश्नाला उत्तर हे असतंच, तरच त्याला प्रश्न म्हणायचे अन्यथा ती नैसर्गिक आपत्ती समजावी’ आता आपल्यासमोर जी काही अस्मानी व सुलतानी संकटं उभी ठाकली आहेत त्याचा खुबीने वापर करून घेतला तर वाईटातून चांगलं, अर्थात इष्टापत्ती साधल्यासारखं ठरेल.
‘काळ्या ढगांची रुपेरी किनार’ कशी असेल ते या लेखातून जाणून घेऊ. त्याचा निर्देशांकाच्या वाटचालीवर कसा सकारात्मक परिणाम होइल तेदेखील जाणून घेऊया. अर्थशास्त्राच्या सोनेरी नियमांचा आधार घेता, एखाद्याचा खर्च हा दुसऱ्याच्या उत्पन्नाचं साधन असतं. ‘ट्रम्प टेरर, टॅरिफ’मुळे निर्यातीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असल्याने, त्यावर उतारा म्हणून ‘वस्तू व सेवा करात’ (जीएसटी) जाहीर झालेल्या सवलती. यातून देशांतर्गतच भारतीय तयार वस्तूंची मागणी वाढवण्याचा प्रयत्न सरकारने सुरू केलेला आहे.
या आर्थिक वर्षापासून सरसकट करमुक्त उत्पन्नाची मर्यादा ही १२ लाखांपर्यंत वाढवली गेली आहे. त्यामुळे सर्वच करदात्यांवरील कराचे ओझे कमी होऊन, दोन पैसे हाताशी राहत सणासुदीच्या दिवसात नवीन जीवनावश्यक वस्तूंची खरेदी होऊ शकते. यातच दुग्धशर्करा योग म्हणजे तीन महिन्यांपूर्वीच्या ६ जूनच्या रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणात बँकांसाठी ‘रोख राखीव प्रमाण’ (सीआरआर) हे एक टक्क्यांनी कमी केले गेले आहे.
या निर्णयाची अंमलबजावणी ही सणासुदीच्या दिवसात म्हणजे ऑगस्ट ते ऑक्टोबरमध्ये करायची असल्याने, हा अतिरिक्त पैसा बँकांकडे कर्जपुरवठ्यासाठी उपलब्ध राहणार आहे. जो सणासुदीच्या दिवसात वापरला जाईल. या धोरणामुळे अभियांत्रिकी कंपन्यांच्या तयार वस्तू ज्यात दुचाकी, चारचाकी, टीव्ही, फ्रीज, वातानुकूलन यंत्र, नवीन घर इत्यादींची चांगली मागणी राहून खप मोठया प्रमाणात होईल.
तसेच या सर्व अभियांत्रिकी तयार वस्तूंसाठी कच्चा माल म्हणून मूलभूत उद्योगातील पोलाद, सिमेंट व अन्य धातूंच्या क्षेत्राला मागणी राहील. याचं थेट प्रतिबिंब ‘सकल राष्ट्रीय उत्पादनावर’ येणाऱ्या दिवसांत कशा रीतीने उमटेल आणि त्याचे सकारात्मक पडसाद हे निफ्टी निर्देशांकावर कशा प्रकारे दिसतील. ते पुढील लेखात जाणून घेऊ.
या आठवड्यातील निफ्टी निर्देशांकांच्या वाटचालीकरता, २५ ऑगस्ट २०२५ च्या लेखातील काही वाक्यांचा आधार घेऊ. “आर्थिक आघाडीवर दररोजच्या रटाळ, कंटाळवाण्या, उदासीन बातम्यांमुळे घरंगळत जाणारा निफ्टी निर्देशांकांच्या घसरणीला अटकाव करण्यासाठी म्हणून, प्रथम ही घसरण थांबत एक क्षीण स्वरूपाची सुधारणा अपेक्षित आहे आणि तिचे पहिले वरचे लक्ष्य २४,८५० ते २५,०००, द्वितीय वरचे लक्ष्य २५,१५० ते २५,३५० असे असेल,” असे त्या लेखात म्हटले होते.
सरलेल्या सप्ताहात निफ्टी निर्देशांकाने २५,००० चा स्तर पार केल्याने तेजीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. येणाऱ्या दिवसांत निफ्टी निर्देशांकाने २५,००० ते २४,८०० चा स्तर सातत्याने राखल्यास निफ्टी निर्देशांकाचे प्रथम वरचे लक्ष्य २५,१५० ते २५,३५०, द्वितीय वरचे लक्ष्य २५,५०० ते २५,८०० असेल. या स्तरावरून येणाऱ्या हलक्या-फुलक्या घसरणीत, निफ्टी निर्देशांकाला २४,८०० ते २४,५०० स्तराचा आधार असेल.
आता चालू असलेल्या तेजीची कमान ही २४,४०० च्या स्तरावर आधारलेली असल्याने हा स्तर राखणे नितांत गरजेचे आहे. हा स्तर राखल्यास वर नमूद केलेली तेजीची सर्व लक्ष्य साध्य होतील. या सर्व तेजीच्या प्रक्रियेत निफ्टी निर्देशांक २४,४०० चा स्तर राखण्यात अपयशी ठरल्यास या निर्देशांकाचे खालचे लक्ष्य २४,००० ते २३,८०० असे असेल.
– आशीष ठाकूर
लेखक भांडवली बाजार विश्लेषक आहेत
ashishthakur1966@gmail.com
अस्वीकृती: शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि ‘इच्छित लक्ष्य’ या संकल्पनांचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.