सध्याच्या पालकांना सतावणारी एक मोठी समस्या आहे, ती म्हणजे त्यांची मुलं आयुष्यात स्थिरस्थावर नक्की कधी होणार? भरपूर शिक्षण घेतलेली ही मुलं अनेकदा देशाबाहेर असतात, वयाच्या तिशीपर्यंत शिकत असतात, नोकरी मिळाली की पहिलं कर्ज फेडतात आणि मग लग्नाचा विचार करतात. लग्न केलं तरी सुद्धा मुलं होईस्तोवर पस्तिशी आलेली असते. अनेकदा तर लग्न झाल्यावर मुलं नकोच अशा निर्णयावर येतात. अर्थात हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. परंतु आर्थिक स्थैर्य हा आजच्या काळासाठी एक मोठा मुद्दा आहे.
हल्ली सगळीकडे दोघांची नोकरी असते, चांगलं शिक्षण आणि नामांकित कंपनीत नोकरी असेल तर पगार सुद्धा चांगले मिळतात. त्यामुळे हातात भरपूर पैसे खुळखुळतात आणि त्या मानाने जबाबदाऱ्या कमी असतात. तेव्हा ‘वीकेंड पार्ट्या’, भटकंती, ‘सेल’मधली खरेदी हे सर्व जणू जगण्याचे अविभाज्य भाग झालेले आहेत. या सगळ्यामुळे कुठंतरी गुंतवणूक मागे पडली आहे. जिथे मोठं कुटुंब आहे, पगार कमी आहे किंवा इतर आर्थिक जबाबदाऱ्या आहेत, तिथे दोघांची कमाई सुद्धा कमी पडते. परंतु पुढे जाऊन आर्थिक स्थैर्य जर हवं आहे तर गुंतवणूक ही हवीच. आधीच्या काळात लोकं एकाच ठिकाणी रुजू होऊन तिथून निवृत्त होत होते, पुढे नोकऱ्या बदलणं सुरू झालं. कधी फक्त पगारासाठी तर कधी संधीसाठी, आता तर पन्नाशीतच निवृत्त व्हायची स्वप्नं पडायला लागली आहेत. काहींच्या बाबतीत असंही होत आहे की कष्ट संपतच नाहीत, तर काही ठिकाणी भरपूर पैसे मिळत असून सुद्धा आर्थिक स्वातंत्र्य नाही.
अनेकदा असं लक्षात येतं की, इतर अनेक संस्कार पालक आपल्या मुलांवर करत असतात. पैशांच्या बाबतीत म्हणायचं झालं तर उगीच खर्च करू नका, पैसे झाडावर लागत नाहीत, आई-वडील खूप कष्ट करून पैसे मिळवतात, इत्यादी वाक्य मुलांच्या कानावर पडत असतात. परंतु पैसे कसे कमवायचे, गुंतवणूक कशी करायची, आर्थिक आराखडा कसा मांडायचा हे शिक्षण क्वचितच घरांमध्ये दिलं जातं. अनेकदा तर आपल्या मुलाला किंवा मुलीला पैशांचं काहीच कळत नाही असं ठाम मत मांडून आई-वडील सगळं सांभाळत असतात. मात्र मुलांना काहीच शिकवत नाही. त्यात दोन पिढ्यांमधील ‘Generation Gap’ मोठा असल्यामुळे तरुण पिढीला या संदर्भातील एकतर त्यांच्या पालकांची कळकळ समजत नाही. त्यांचं ऐकायचं नाही असं तरी ठरवलेलं असतं. कारण काहीही असो, परंतु आजच्या आणि या पुढच्या पिढीला जर आर्थिक स्वातंत्र्य उपभोगायचं असेल तर वेळ दवडून अजिबात चालणार नाही. आजच्या पालकांवर म्हणून ही एक मोठी जबाबदारी आहे. तर आजचा लेख तरुण पिढीला आर्थिकरित्या कसं सक्षम करता येईल यासाठी आहे.
१. बचत आणि गुंतवणूक वेगळी असते हे मुलांना कळू द्या – मुळात सुरुवात होते ती लहानपणीच. आपण मुलांना ‘Piggy Bank’ देऊन पैसे साठवा म्हणून सांगतो. पण पैसे हे नुसते साठवणं पुरेसं नसतं. म्हणून गुंतवणुकीचे छोटे-छोटे धडे वयानुसार आणि मुलाच्या क्षमतेनुसार द्यायला हवे. गुंतवणुकीचा गोंधळ किंवा बागुलबुवा वाटण्यापेक्षा जर त्याबद्दलचं शिक्षण सोप्पं करून दिलं तर त्याचे फायदे दीर्घकालीन असतील.
२. खेळांमधून ज्ञान पसरवा – व्यापार (Monopoly) हा खेळ मला खूप आवडतो कारण त्यात आपण काही तरी विकत घेतो, त्यासाठी पैसे देतो आणि त्यातून पुढे कमाई करतो हे सर्व कळतं. अतिशय सोप्पा खेळ असून त्यातून मिळकत आणि मालमत्ता यातील फरक समजावता येतो. थोड्या मोठ्या मुलांसाठी ‘Game of Life’ सुद्धा आहे. यामध्ये आर्थिक आराखडा कसा मांडायचा यावर माहिती मिळते. अर्थात अगदी खोलात जात नाही येत. परंतु नियोजनाचं बी रुजवायला हा खेळ नक्की मदत करू शकतो. Cashflow १०१ म्हणून एक अजून खेळ आहे, जो अजून थोड्या मोठ्या मुलांसाठी आहे. ज्यातून गुंतवणूक आणि पैसे हाताळायचं तंत्र मुलांना शिकता येईल.
३. गुंतवणूक गप्पा मारा – पालक म्हणून आपण मुलांसमोर शक्यतो गुतंवणूकीच्या गोष्टी करणं टाळतो. अर्थात त्यामागे योग्य कारणं असतात. परंतु याबाबत सहज गप्पा मारायला काहीच हरकत नाही. एखाद्या व्यवसायातून कसे पैसे मिळतात किंवा संधीचा फायदा उद्योगांना कसा होतो. जागतिक उलाढालीचा आपल्या खर्चांवर आणि मिळकतीवर कसा परिणाम होतो. गुंतवणूक केली नाही तर त्याचे दुष्परिणाम काय असतात आणि नुकसान कसं होतं, ‘स्कॅम’ कसे केले जातात, अशा सर्व चर्चा थोड्या रंजक पद्धतीने घरात झाल्या तरी मुलांना पुरे होतं. एकतर कानावर सहज पडल्याने या गोष्टींवर त्यांचं आपसूक लक्ष जातं.
४. नवीन तंत्रज्ञान आणि ‘ऑटोमेशन’चा लाभ घ्या – तरुणांचा नैसर्गिकरित्या तंत्रज्ञानाकडे कल असतो. मोबाईल हा त्यांच्या जीवश्च कंठश्च मित्र असल्याने याच्याशी लढण्याऐवजी आपण त्याचा आपल्या फायद्यासाठी वापर केला पाहिजे. ऑनलाईन खरेदीबरोबर ऑनलाईन गुंतवणूक करायला मुलांना शिकवा. अर्थात त्यांच्या बँकेच्या खात्यावर पालकांनी स्वतःचा ताबा ठेवायचा आहे. पण छोटी छोटी गुंतवणूक नियमित त्यांच्याकडून करवून घेतल्याने त्यांना स्वतःचे पैसे गुंतवताना पुढे फायदा होईल.
५. त्यांना व्यवहार करू द्या – पैसे हाताळले नाही तर समजणार कसं? खर्चाचं व्यवस्थापन हे महत्त्वाचं आहेच, परंतु गुंतवणूक व्यवस्थापन त्याहीपेक्षा महत्त्वाचं आहे. कोणत्या गुंतवणुकी कधी योग्य असतात, किती जोखमीच्या असतात, त्यातून पैसे नक्की कसे वाढतात हे ऐकणं आणि वाचणं एक असतं आणि त्याचा अनुभव घेणं हे दुसरं. छोट्या चुका झालेल्या परवडतील, पण त्यातून मोठी शिकवण घेता येईल. म्हणून मुलांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी त्यांना स्वतः गोष्टी करू द्या.
६. ‘जलद श्रीमंत व्हा’ वरून ‘हळूहळू श्रीमंत व्हा’ यावर लक्ष केंद्रित करा – सोशल मीडिया अर्थात समाजमाध्यमाचे जग जलद श्रीमंत होण्याच्या योजनांनी भरलेले आहे. परंतु एक कायमस्वरूपी आर्थिक पाया संयम आणि सातत्य यावर बांधला जातो. तरुणांना शिकवा की, बाजारपेठेचा दीर्घकालीन वरच्या दिशेने जाणारा मार्ग हा त्यांचा मित्र आहे. तरुण गुंतवणूकदारांना हे शिकवणे महत्त्वाचे आहे की, बाजारातील मंदी हा चक्रातील एक सामान्य भाग आहे आणि घाबरून विक्री करणे ही ते करू शकणाऱ्या सर्वात वाईट चुकांपैकी एक आहे. विविधीकरण महत्त्वाचे आहे. विविधतेचे महत्त्व स्पष्ट करण्यासाठी तुमची सर्व अंडी एकाच टोपलीत ठेवू नका ही म्हण वापरा. समभाग, रोखे आणि म्युच्युअल फंड यासारख्या विविध मालमत्ता वर्गांमध्ये गुंतवणुकीचा प्रसार, एकाच कंपनीच्या खराब कामगिरीमुळे त्यांच्या पोर्टफोलिओचा ऱ्हास होण्यापासून कसा बचाव करतो हे स्पष्ट करा.
७. समाज माध्यमांच्या प्रभावापासून मुलांना वेळीच सावध करा – आजच्या ‘इन्स्टा आणि व्हॉटसऍप’ च्या जगात आपलं लक्ष कसं विचलित होतं, त्यांचा गैरफायदा कसा घेतला जाऊ शकतो आणि त्यातून आपल्या आर्थिक स्थैर्याला कसा धक्का लागू शकतो या बद्धल मुलांना वेळीच कळणं गरजेचं आहे. इथे पालकांनी थोडा वेगळा विचार करायला हवा. मुलांना प्रवचनं आवडत नाही. सतत आई-वडील कानाशी धडे देत बसले तर मुलं ऐकण्याच्या पलीकडे जाण्याची संभावना असते. तेव्हा थोड्या क्लुप्त्या करून, निरनिराळ्या शकला लढून हे काम करावं लागेल. याचा फायदा दिसायला थोडा वेळ लागेल पण उपयोग नक्की होईल.
तरुण पिढीला गुंतवणुकीच्या चांगल्या सवयी विकसित करण्यासाठी प्रोत्साहित करणे म्हणजे त्यांना त्यांच्या पैशाचे काय करावे हे सांगणे नव्हे. आधीच्या पिढ्यांना भेडसावणाऱ्या चिंतांपासून त्यांना मुक्त करून, त्यांच्या आर्थिक भवितव्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांना सक्षम करण्याबद्दल आहे. नवीन पिढीला गुंतवणुकीकडे काम म्हणून नव्हे तर आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त करण्यासाठी त्यांच्या शस्त्रागारातील सर्वात शक्तिशाली साधन म्हणून पाहण्यास प्रेरित करा. गुंतवणुकीच्या प्रवासाकडे त्यांचं मन हळू हळू वळवा, जेणेकरून त्या प्रवासाची त्यांना भीती ना वाटता एक सुखमय दीर्घकालीन अनुभवासाठी त्यांना तयार करता येईल.
तृप्ती राणे
trupti_vrane@yahoo.com
प्रकटीकरण: हा लेख फक्त मार्गदर्शनपर आहे. इथे लेखिका कोणतीही जाहिरात करत नाही.