गेली काही वर्ष आपण शेअर बाजारातून चांगला परतावा मिळवला आहे. तर काहींनी बहुप्रसवा परतावा प्राप्त केला आहे. तर काही महिन्यांपासून काही लोक सांगत आहेत की, बाजार खाली येणार आहे. तरीसुद्धा तो काही त्याच्या प्रवासाची दिशा बदलत नाहीये असं काहीसं चित्र सध्या दिसतं आहे. काही जणांनी तर बाजार खाली येणार या भीतीने नफा बाजूला काढून पैसे तयार ठेवले आहेत आणि बाजार कधी खाली येतो याची आतुरतेने वाट पाहत आहेत. तर अगदी उलट दिशेला काही गुंतवणूकदार बाजार नेहमी वरच जातो या विश्वासावर पोर्टफोलिओमध्ये कोणतेच बदल करत नाहीयेत. आता या दोन बाजूंमध्ये नक्की कोण बरोबर आहे हे पुढे वेळच ठरवेल, परंतु मागील काही घटना एकदा पडताळून पाहायला काहीच हरकत नाहीये असं मला वाटतंय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

साधारणपणे मागील २४ वर्षांच्या काळात शेअर बाजारात आपण तीन मोठ्या पडझडी पाहिल्या. पहिली होती ती वर्ष २००० मध्ये, तेव्हा माहिती तंत्रज्ञान व दूरसंचार कंपन्यांचा फुगा फुटला होता. तेव्हा निफ्टीमध्ये ५३ टक्के घसरण आली होती. इन्फोसिस तेव्हा ८५ टक्क्यांनी आपटला होता (मार्च २००० ते सप्टेंबर २००१ कालावधी अखेर), तर विप्रो ९० टक्क्यांनी खाली गेला होता (फेब्रुवारी २००० ते सप्टेंबर २००१ कालावधी अखेर). केतन पारिख आणि त्याच्या के-१० शेअरने केलेल्या घोटाळ्याने अनेक लहान गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान केलं. पुढे वर्ष २००८ मध्ये जागतिक आर्थिक संकटामुळे आपल्या बाजाराला मोठा धक्का बसला. अमेरिकेतील आर्थिक गोंधळामुळे जगात सगळीकडे शेअर बाजार कोसळले होते. निफ्टी जानेवारी २००८ ते ऑक्टोबर २००८ दरम्यान ६५ टक्के खाली आला. रिलायन्स ७२ टक्के, टीसीएस ६१ टक्के, स्टेट बँक ५९ टक्के, लार्सन अँड टुब्रो ६९ टक्के, ओएनजीसी ६० टक्के तर एनटीपीसीचे समभाग ६१ टक्के आपटले होते. अजून पुढे वर्ष २०२० मध्ये करोना संकटाने बाजाराला जानेवारी २००२ ते मार्च २०२० या अल्पकालावधीमध्ये ४० टक्के खाली आणलं. एचडीएफसी बँक ४३ टक्के, रिलायन्स ४६ टक्के, आयसीआयसीआय बँक ५१ टक्के, टीसीएस ३३ टक्के तर इन्फोसिस ३६ टक्के खाली आला. परंतु लगेच पुढे काही महिन्यात बाजाराने सगळं नुकसान भरून काढलं आणि आगेकूच केली.

हेही वाचा – गुंतवणुकीस सज्ज असे संरक्षण क्षेत्र!

या संपूर्ण २४ वर्षांच्या काळामध्ये अनेक कारणांनी बाजार खाली आला आहे. मात्र वर सांगितलं इतकं नुकसान त्यातून झालेलं नाही. पण अशा प्रत्येक पडझडीमध्ये कधी एखाद्या क्षेत्रावर तरी कधी विशिष्ट कंपन्यांवर (आयएल अँड एफएस ट्रान्सपोर्टेशन, येस बँक) दीर्घकालीन परिणाम झालेले आढळतात. आज मला हे सर्व इथे सांगायच्या मागचा उद्देश एकच आहे. तो म्हणजे, जेव्हा केव्हा बाजारात पडझड होते त्यात चांगले आणि वाईट, सगळेच शेअर पडतात. बाजारातून पैसा बाहेर पडायला लागला की, किरकोळ गुंतवणूकदार सगळं विकून मोकळे होतात. परंतु अनेक जणांना वेळेवर बाहेर ना पडल्यामुळे किंवा चुकीच्या वेळी बाजारात भरपूर गुंतवणूक केल्यामुळे जास्त नुकसान सहन करावं लागतं. आजची जागतिक, आर्थिक आणि भू-राजकीय परिस्थिती लक्षात घेता, यावेळी आपला बाजार किती टक्के पडेल याचा अंदाज बांधता येणं कठीण आहे. मागील अनेक वर्षांपासून बाजारात फिरणारा स्वस्त पैसा जेव्हा एखाद्या निमित्तमात्र कारणामुळे बाहेर काढला जाईल तेव्हा आणि त्यानंतर बाजार २० ते ३० टक्के पडून सावरेल, की ५० ते ६० टक्के आपटेल हे येणारा काळच सांगेल. परंतु एक जागरूक गुंतवणूकदार म्हणून आपण आपला पोर्टफोलिओ सांभाळणं ही आपलीच जबाबदारी आहे.

आपला पोर्टफोलिओ, आपलीच जबाबदारी

मुळात पोर्टफोलिओ जर दीर्घकाळासाठी बनवलेला असला, तरीसुद्धा त्याला तेजी-मंदी आणि चढ-उतार लागू होतात. जर एखाद्या क्षेत्राचं किंवा एका विशिष्ट कंपनीच्या शेअरचं प्रमाण ५ टक्क्यांपेक्षा जास्त असेल किंवा एकाच प्रकारच्या म्युच्युअल फंडात २५ टक्केपेक्षा जास्त असेल, तर पोर्टफोलिओमध्ये जोखीम वाढते. त्यात जर पोर्टफोलिओमध्ये परतावे हे मागील २-३ महिन्यांत आलेले असतील, तर त्याची जोखीम नक्कीच जास्त आहे हे समजून घ्यावे. एखाद्या चाणाक्ष गुंतवणूकदाराच्या एव्हाना लक्षात आलं असेल की, बाजाराला पुढे जायला मिळत नाहीये. व्यापक बाजाराचे प्रतिनिधित्व करणारे मिडकॅप व स्मॉलकॅप कंपन्यांच्या निर्देशांकाने तर मागील महिन्याभरात नवीन उच्चांक देखील गाठला नाहीये. मागे जे शेअर वाढले, ते आता वाढत नाहीयेत. शिवाय अनेक शेअर जे गेली काही वर्षे फार काही करत नव्हते ते आता पुढे जात आहेत. असं तेव्हा होतं जेव्हा बाजारामध्ये घेण्याजोगे शेअर कमी होत जातात. कुठलीही बातमी आली की तिला फार पटकन प्रतिसाद मिळतो आणि मग कुठलाही शेअर उगीचच किंवा गरजेपेक्षा जास्त वर जातो. तेव्हा अशा काळात गुंतवणूक करताना फार सांभाळून करावी लागते. अशा वेळी पोर्टफोलिओतील जोखीम हळूहळू कमी करत आणावी लागते. जिथे खूप नफा झालाय तिथे थोडे शेअर विकून त्या कंपनीचे पोर्टफोलिओमधील प्रमाण खाली आणून वाट पाहावी. पुढे जर तोच शेअर स्वस्त झाला की, ते पैसे परत घालता येतील. परंतु जर त्या कंपनीची कामगिरी चांगली झाली नाही तर त्यातून बाहेर पडून दुसऱ्या कंपनीमध्ये पैसे घालावे. ज्या गुंतवणुकीमध्ये अजूनसुद्धा नुकसान दिसत असेल, किंवा मनाजोगा फायदा झालेला नसेल, तर मग तिचा नीट अभ्यास करून तोटा घ्यावा. हातात आलेली रक्कम चांगल्या ठिकाणी सुरक्षित ठेवावी आणि योग्य पर्याय सापडला की त्यात ते पैसे गुंतवावे. इथे काही गुंतवणूकदारांना एक त्रास होतो- खात्यात पैसे आले, की खर्च होतात. मग अशा गुंतवणूकदारांनी बँकेतील १५ दिवसांच्या किंवा एक महिन्याच्या मुदत ठेवींमध्ये किंवा म्युच्युअल फंडांच्या आर्बिट्राज अथवा ओव्हरनाईट फंडमध्ये पैसे ठेवावेत. मुदत ठेवीत पैसे लगेच मिळतील, पण म्युच्युअल फंडातील पैसे पुन्हा खात्यामध्ये यायला किमान १-२ कामकाजी दिवस लागतात. म्हणून सगळेच पैसे एकाच पर्यायात न ठेवता दोन-तीन पर्यायांची सांगड घालावी. अचानक बाजारात गुंतवणुकीची संधी मिळाली तर हाताशी चांगली रक्कम असलेली बरी.

हेही वाचा – Money Mantra: टीडीएस कुणी कापावा? कुणी कापू नये? त्याचा परतावा कसा मिळवाल?

येणारे महिने हे आपल्या देशात आणि अमेरिकेतदेखील महत्त्वाचे आहेत. निवडणूक आणि त्यानंतरचा निकाल या गोष्टींमुळे बाजारात अस्थिरता राहणार आहे. त्यात युद्धजन्य परिस्थिती जर अजून चिघळली किंवा महागाईचा भडका उडाला तर मग बाजार खालच्या दिशेला कधी वळेल आणि तोही किती जोरात, ते कोणीही सांगू शकत नाही. तेव्हा असेट अलोकेशन नीट ठेवा आणि पोर्टफोलिओ सांभाळा.

trupti_vrane@yahoo.com

प्रकटीकरण: हा लेख फक्त मार्गदर्शनपर आहे. इथे लेखिका कोणतीही जाहिरात करत नाही.

मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: If history repeats itself in the share market mmdc ssb
First published on: 11-03-2024 at 07:25 IST