आपले पैसे किंवा संपत्ती दुसऱ्याच्या नावाने कोणत्याही मोबदल्याशिवाय हस्तांतरित करण्याचे प्रसंग आपल्या जीवनात अनेकदा येतात. असे प्रसंग आयुष्यात येण्याची अनेक कारणे आहेत. पती/पत्नीला, मुलांना, आई-वडिलांना, इतर नातेवाईकांना, मित्रांना, लग्न, वाढदिवस यांसारख्या प्रसंगात भेट देण्यापासून संपत्तीचे नियोजन, कर नियोजन, कौटुंबिक तोडगा, वगैरे कारणाने पैसे किंवा संपत्ती हस्तांतरित केली जाते.

पैशांचे आणि संपत्तीचे असे हस्तांतर केले तर प्राप्तिकर कायद्यानुसार काय खबरदारी घेतली पाहिजे, हे जाणून घेतले पाहिजे. एखाद्या व्यक्तीने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संपत्ती दुसऱ्याच्या नावाने मोबदल्याशिवाय किंवा अपुऱ्या मोबदल्याने हस्तांतरित केली तर त्यावर प्राप्तिकर आकारला जाऊ शकतो. तसेच त्यावर मिळणाऱ्या उत्पन्नावर, ज्याने संपत्ती हस्तांतरित केली, त्याला काही प्रसंगी करसुद्धा भरावा लागतो. याद्वारे गैरप्रकारसुद्धा घडू शकतात. आपली संपत्ती दुसऱ्याच्या नावाने हस्तांतरित करून आपले करदायित्व अवैध रीतीने कमी केले जाते. अशा व्यवहारांवर आळा घालण्यासाठी प्राप्तिकर कायद्यात काही तरतुदी आहेत. मोठ्या रकमेच्या व्यवहारांची माहिती प्राप्तिकर खात्याकडे उपलब्ध होत असते. करदात्याने असे व्यवहार करण्यापूर्वी कायद्याचे उल्लंघन तर होत नाही ना हे जाणून घेतले पाहिजे. या लेखात हस्तांतरित संपत्ती मिळालेल्या व्यक्तींनी काय काळजी घ्यावी ते बघूया.

कोणत्याही मोबदल्याशिवाय किंवा अपुऱ्या मोबदल्याने संपत्तीची देवाणघेवाण करणे म्हणजे भेट असे समजले जाते. प्राप्तिकर कायद्यात भेट याची व्याख्या केलेली नाही. प्राप्तिकर कायदा कलम ५६ नुसार मोबदल्याशिवाय किंवा अपुऱ्या मोबदल्यात हस्तांतरित केलेली संपत्ती हे संपत्ती स्वीकारणाऱ्याला इतर उत्पन्न या उत्पन्नाच्या स्रोताखाली करपात्र आहे. कोणत्या भेटी करपात्र आहेत आणि कोणत्या करमुक्त हे समजून घेतले पाहिजे.

करपात्र भेटी :

१. रोखीने (यात रोख रक्कम, चेक, बँक हस्तांतर याचा समावेश होतो) मिळालेल्या भेटीची एकूण रक्कम ५०,००० रुपयांपेक्षा कमी असेल तर ती करपात्र उत्पन्नात गणली जात नाही. मात्र ५०,००० रुपयांपेक्षा जास्त रक्कम रोखीने मिळाल्यास संपूर्ण रक्कम करपात्र उत्पन्नात गणली जाते. उदा, एका व्यक्तीला त्याच्या मित्रांकडून ४८,००० रुपये रोख रक्कम किंवा दागिन्यांच्या स्वरूपात मिळाली तर त्याला ही संपूर्ण रक्कम, म्हणजेच ४८,००० रुपये, करमुक्त असेल.

समजा एका व्यक्तीला त्याच्या मित्रांकडून ५१,००० रुपये रोख रक्कम किंवा दागिन्यांच्या स्वरूपात मिळाली कर त्याला ही संपूर्ण रक्कम, म्हणजेच ५१,००० रुपये, करपात्र असेल आणि त्याला ती इतर उत्पन्नात दाखवावी लागेल आणि त्याच्या उत्पन्नाच्या टप्प्यानुसार त्यावर कर भरावा लागेल.

२. स्थावर मालमत्ता (यात घर, जमीन, वगैरेचा समावेश होतो) कोणत्याही मोबदल्याशिवाय मिळाल्यास आणि मुद्रांक शुल्काच्या मूल्यांकनानुसार मूल्य ५०,००० रुपयांपेक्षा जास्त असेल तर संपूर्ण मूल्य करपात्र आहे. मालमत्ता अपुऱ्या मोबदल्यात मिळाली असेल आणि मुद्रांक शुल्काच्या मुल्यांकनानुसार असणारे मूल्य हे मोबदल्यापेक्षा (अ) ५०,००० रुपयांपेक्षा जास्त असेल आणि (ब) मोबदल्याच्या १० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर या फरकाएवढी (अ आणि ब मधील जी जास्त रक्कम आहे ती) रक्कम उत्पन्नात गणली जाते. उदा. एखाद्या व्यक्तीने एक घर खरेदी केले आणि त्या घराचे मुद्रांक शुल्कानुसार मूल्य हे ९४ लाख रुपये आहे आणि प्रत्यक्ष खरेदी मूल्य करारनाम्यानुसार ८४ लाख रुपये आहे. या उदाहरणात घराचे मुद्रांक शुल्कानुसार मूल्य हे मोबदल्यापेक्षा १० लाख (९४ लाख रुपये वजा ८४ लाख रुपये) रुपयांनी जास्त आहे आणि ते मोबदल्याच्या १० टक्क्यांपेक्षा जास्त म्हणजेच ८,४०,००० रुपयांपेक्षा (८४ लाख रुपयांच्या मोबदल्याच्या १० टक्के) जास्त आहे.

त्यामुळे मुद्रांक शुल्कानुसार मूल्य आणि प्रत्यक्ष मोबदला यामधील फरकाची रक्कम, १० लाख रुपये हे त्या व्यक्तीचे इतर उत्पन्न मानले जाईल आणि त्याला त्याच्या उत्पन्नाच्या टप्प्याप्रमाणे यावर कर भरावा लागेल. तसेच विक्री करणाऱ्याला, मुद्रांक शुल्कानुसार मूल्य आणि प्रत्यक्ष मोबदला, यापैकी जी जास्त आहे, ती विक्री रक्कम समजून, त्यानुसार भांडवली नफा गणावा लागेल. ही फरकाची रक्कम १० टक्क्यांपेक्षा कमी असली तर फरकाएवढी रक्कम इतर उत्पन्न म्हणून गणली जाणार नाही. तसेच घर खरेदीवर उद्गम कर कापताना सदनिकेचे मुद्रांक शुल्कानुसार मूल्य आणि मोबदला यामधील जी रक्कम जास्त आहे, त्यावर उद्गम कर कापावा लागेल. सदनिकेची विक्री करणाऱ्याला मोबदला जरी आपल्याला ८४ लाख रुपये द्यावयाचा असला तरी उद्गम कर ९४ लाख रुपयांवर १ टक्का इतका कापावा लागेल जर सदनिका विक्री करणारा निवासी भारतीय असेल तर.

३. ठरावीक जंगम मालमत्ता (यात सोने, चांदी, दागिने, चित्रे, शिल्पे, वगैरेचा समावेश होतो) कोणत्याही मोबदल्याशिवाय मिळाल्यास आणि त्याचे वाजवी बाजार मूल्य ५०,००० रुपयांपेक्षा जास्त असेल तर संपूर्ण मूल्य करपात्र आहे. मालमत्ता अपुऱ्या मोबदल्यात मिळाली असेल आणि मोबदला हा वाजवी बाजार मूल्यापेक्षा कमी असेल आणि हा फरक ५०,००० रुपयांपेक्षा जास्त असेल तर या फरकाएवढी रक्कम उत्पन्नात गणली जाते.

करमुक्त भेटी :

१. भेटी (रोख, स्थावर किंवा जंगम मालमत्तेच्या स्वरूपात) ठरावीक नातेवाईकांकडून मिळाल्यास त्या करपात्र उत्पन्नात गणल्या जात नाहीत. या रकमेला कोणतीही मर्यादा नाही. ठरावीक नातेवाईकांमध्ये पती/पत्नी, आई/वडील, भाऊ/बहीण, पती किंवा पत्नीचा भाऊ किंवा बहीण (आणि त्यांचे पती/पत्नी), आई किंवा वडिलांचा भाऊ किंवा बहीण (आणि त्यांचे पती/पत्नी) आणि वंशपरंपरेतील व्यक्ती यांचा समावेश होतो.

२. एखाद्या व्यक्तीला त्याच्या लग्नप्रसंगात भेटी मिळाल्या असतील तर त्या करपात्र नसतील. या भेटी ठरावीक नातेवाईकांकडून किंवा इतरांकडून मिळाल्या असल्या तरी करमुक्त असतील. ज्या व्यक्तीच्या लग्नप्रसंगात भेटी मिळतात त्यालाच त्या भेटी करमुक्त आहेत. त्याच्या आई-वडिलांना मिळालेल्या भेटी त्यांना करपात्र असतील. याव्यतिरिक्त प्रसंगात (उदा, वाढदिवस, वगैरे) मिळालेल्या भेटी करपात्र आहेत. परंतु या ठरावीक नातेवाईकांकडून मिळाल्यास करमुक्तच असतील.

३. एखाद्या करदात्याला वारसाहक्काने किंवा मृत्युपत्राद्वारे कोणतीही संपत्ती मिळाल्यास ती मिळालेली संपत्ती करपात्र उत्पन्नात गणली जात नाही.

करदात्याला जर, मोबदल्याशिवाय किंवा कमी मोबदल्याने संपत्ती मिळाल्यास त्याने ती संपत्ती करपात्र उत्पन्न आहे किंवा नाही हे तपासून घेतले पाहिजे. बऱ्याच वेळेला स्थावर मालमत्ता खरेदी करताना मुद्रांक शुल्कानुसार मूल्य आणि प्रत्यक्ष मोबदला यामधील फरकाकडे दुर्लक्ष केले जाते. याचा परिणाम मालमत्ता खरेदी करणाऱ्याला तसेच विक्री करणाऱ्याला भोगावा लागू शकतो. अशी करपात्र संपत्ती मिळाल्यास त्या वर्षीच्या आपल्या विवरणपत्रात ती योग्य सदरात दाखवून त्यावर कर भरणे अपेक्षित आहे, अन्यथा व्याज आणि दंडाला सामोरे जावे लागू शकते.

– प्रवीण देशपांडे

pravindeshpande1966@gmail.com