वैभव जोग
मागच्या एक वर्षाच्या काळात सोन्याच्या दरात जी वाढ झाली आहे, त्यामुळे बऱ्याच गुंतवणूकदारांचा पुन्हा एकदा सोन्यातील गुंतवणुकीकडे कल वाढतो आहे. मात्र ही गुंतवणूक प्रत्यक्ष सोन्यात करणे आणि डिजिटल माध्यमातून करणे यातील फरक जाणून घ्यायला हवा. कित्येक वर्षांपासून सोने हा गुंतवणुकीसाठी उपलब्ध असलेला एकमेव पर्याय होता. भारतात शेअर बाजार बाल्यावस्थेत असताना बऱ्याचदा सोन्यातच गुंतवणूक केली जायची. जगातील सर्व मध्यवर्ती बँका सोन्यात पैसे गुंतवतात म्हणजेच सोन्याचा साठा करून ठेवतात. आपत्कालीन परिस्थितीत तारण ठेवण्यासाठी सोन्याएवढी खात्रीशीर आणि हक्काची मालमत्ता कोणतीही नाही. यामुळे सोन्यात गुंतवणूक अपरिहार्य आहे. जरी शेअर बाजार, म्युच्युअल फंड, बँका, कर्जरोखे हे पर्याय उपलब्ध असले तरीही सोन्यातील गुंतवणुकीची मोहिनी कमी झालेली नाही.

गुंतवणूकदारांनी सोन्यातील प्रत्यक्ष गुंतवणूक आणि डिजिटल गुंतवणूक यातला फरक समजून घ्यायला हवा. दर महिन्याला दर वर्षाला किंवा सणासुदीला सोने विकत घेणाऱ्यांना ते सोने सुरक्षित ठेवण्यासाठी तरतूद करावी लागते. सोन्याचे दागिने आणि गुंतवणुकीचे सोने हे विषय वेगळे आहेत. दागिने हे हौसेसाठी केले जातात तर गुंतवणुकीसाठीचे सोने दीर्घकाळपर्यंत कुठेतरी सुरक्षित ठिकाणी ठेवावे लागते. सोने विकत घेताना त्यामध्ये सुरक्षेबरोबर दुसरा प्रश्न निर्माण होऊ शकतो, तो म्हणजे शुद्धतेचा. आपण विकत घेतलेले सोने पूर्णपणे शुद्ध आहे याची खात्री नसल्याने गुंतवणूकदारांचे नुकसान झालेले आहे. ही सर्व प्रकारची फसवणूक टाळण्यासाठी सोन्यामध्ये डिजिटल प्रकारची गुंतवणूक करावी हा पर्याय उदयास आला आहे.

यात पहिला पर्याय म्हणजे ‘एक्स्चेंज ट्रेडेड फंड’ अर्थात ‘ईटीएफ’ हा असून दुसरा पर्याय ‘गोल्ड फंड’ असा आहे. या दोन्ही प्रकारांमध्ये तुलनात्मकदृष्ट्या कोणता प्रकार चांगला ? हे जाणून घेऊ या.

‘गोल्ड ईटीएफ’ थेट तुम्ही गुंतवलेले पैसे सोन्यात गुंतवतात. म्हणजेच जसे, तुम्ही सोने विकत घेता तसे ‘ईटीएफ’ सोने विकत घेतात. गोल्ड फंडातील गुंतवणूक सोन्याशी संबंधित पर्यायांमध्ये असते, म्हणजेच गोल्ड फंड फक्त सोन्यात न गुंतवता ‘गोल्ड ईटीएफ’, सोने तयार करणाऱ्या खाणी आणि कंपन्या आणि सोन्याशी संबंधित पर्यायांमध्ये गुंतवणूक करतात. ‘गोल्ड फंड’ विकत घेणे आणि विकणे यासाठी डिमॅट खात्याची गरज नसते. जसा तुम्ही कोणताही इक्विटी म्युच्युअल फंड गुंतवणूक विक्रेत्याच्या माध्यमातून किंवा ‘डायरेक्ट प्लॅन’ म्हणून खरेदी करू शकता तसाच ‘गोल्ड फंड’ खरेदी केला जातो. जेवढी ‘गोल्ड फंडा’ची ‘नेट ऍसेट व्हॅल्यू’ असेल आणि जेवढी तुमची गुंतवणूक असेल त्याप्रमाणे तुम्हाला ‘युनिट’ दिले जातात. या उलट ‘गोल्ड एक्स्चेंज ट्रेडेड फंड’मध्ये सोन्यातील गुंतवणुकीसाठी तुम्हाला डिमॅट खाते असणे गरजेचे असते. जसे शेअर बाजारातून शेअर विकत घेतले जातात आणि विकले जातात तसेच ‘एक्स्चेंज ट्रेडेड फंड’ खरेदी केले जातात.

म्युच्युअल फंड कंपन्या जे ‘गोल्ड फंड’ चालवतात किंवा उपलब्ध करून देतात त्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी निधी व्यवस्थापक असतो. फंडात जमा झालेली रक्कम नेमकी कुठे गुंतवायची आणि कशी गुंतवायची, याचा निर्णय निधी व्यवस्थापक घेत असतो. अर्थातच यासाठी त्यांना दिले जाणारे पैसे ‘एक्सपेन्स रेशो’ मध्ये गणले जातात. म्हणूनच ‘गोल्ड म्युच्युअल फंड’ योजनांचा ‘एक्सपेन्स रेशो’ हा ‘गोल्ड ईटीएफ’पेक्षा जास्त असतो. ‘एक्स्चेंज ट्रेडेड फंडा’त गुंतवणूक झालेले सगळे पैसे हे थेट सोन्यात गुंतवायचे हे सोपे गणित असल्याने तेथे निधी व्यवस्थापन खर्च कमी असतो.

म्युच्युअल फंडातील गोल्ड योजनांमध्ये गुंतवणूक करताना प्रत्येक फंड घराण्याच्या नियमाप्रमाणे कमीत कमी किती रकमेचे ‘युनिट’ घ्यायचे? ते ठरलेले असते. उदाहरणार्थ, सुरुवातीची पहिली गुंतवणूक कमीत कमी पाच हजार असावी व त्यानंतर कमीत कमी एक हजार अशा प्रकारचा नियम असू शकतो तर ‘एक्स्चेंज ट्रेडेड फंडा’त अशा प्रकारचा कोणताही नियम नसतो. तुम्ही जसा शेअर बाजारामधून एखाद्या कंपनीचा फक्त एक शेअर विकत घेऊ शकता त्याचप्रमाणे फक्त एक ‘युनिट’ विकत घेण्याची सोय ‘एक्सचेंज ट्रेडेड फंडा’त आहे. ज्यांना अत्यंत कमी गुंतवणुकीपासून सुरुवात करायची असेल त्यांच्यासाठी हा पर्याय आकर्षक आहे.

सोन्यातील दरवाढ किंवा सोन्याच्या दरातील घसरण या दोघांमध्ये ‘एक्स्चेंज ट्रेडेड फंड’ जणू काही आरशासारखे काम करतात. म्हणजे जसा सोन्याचा भाव कमी किंवा जास्त होईल तशीच ‘गोल्ड एक्स्चेंज फंडा’ची ‘नेट ऍसेट व्हॅल्यू’ कमी-जास्त होते. याचाच अर्थ गुंतवणुकीतील अधिक पारदर्शकता या पर्यायात दिसून येते. तुम्हाला गरज असेल तेव्हा पैसे काढून घ्यायचे असल्यास म्युच्युअल फंडाच्या गोल्ड योजनेतून पैसे काढून घेण्यापेक्षा ‘एक्स्चेंज ट्रेडेड फंड’ विकणे अधिक सुलभ असते. जसा एखाद्या कंपनीचा शेअर वाढल्याबरोबर विकून टाकायचा असतो किंवा वाढत नाही म्हणून विकून टाकायचा असतो तसेच गणित ‘एक्स्चेंज फंडा’चे आहे. ‘एक्स्चेंज ट्रेड फंड’ या शब्दाचा अर्थ शेअर बाजार सुरू असतो, त्यावेळेत तुम्ही केव्हाही त्या फंडात गुंतवणूक करू शकता आणि केव्हाही तुमच्याकडची गुंतवणूक विकू शकता.

गोल्ड म्युच्युअल फंड योजनेत ही संधी उपलब्ध होत नाही. म्हणजे जर आजच्या आज मी ‘युनिट’ विकले तर त्याचे पैसे खात्याला जमा होण्यासाठी थोडासा वेळ जास्त लागेल म्हणजेच ‘एक्स्चेंज ट्रेडेड फंडा’ची तरलता ‘गोल्ड फंडा’पेक्षा जास्त आहे. पोर्टफोलिओतील वेगळेपण हा ‘गोल्ड फंडा’चा आणखी एक लक्षात घेण्यासारखा मुद्दा आहे. सोन्यातील ‘एक्स्चेंज ट्रेडेड फंडा’त फक्त शुद्ध सोन्यात गुंतवणूक होते, तर ‘गोल्ड म्युच्युअल फंड’ योजनांमध्ये सोन्याशी संबंधित सर्व उपलब्ध पर्यायांमध्ये गुंतवणूक होते. याचाच अर्थ त्या पोर्टफोलिओतील एखादा पर्याय म्हणावे तसे परतावे देत नसेल तर एकूण पोर्टफोलिओच्या परताव्यावर फंडाच्या त्याचा थोडासा का होईना परिणाम होतो, या उलट ‘एक्स्चेंज ट्रेडेड फंड’ हा थेट सोन्याच्या दराशी संलग्न असतो.

डिजिटल गोल्ड कोणासाठी?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तुम्हाला पोर्टफोलिओला एक सुरक्षित कवच द्यायचे असेल तर हा पर्याय अगदीच आजमावून बघण्यासारखा आहे. सोन्याच्या खाणी आणि सोन्याचे साठे पृथ्वीतलावरील खात्रीशीर संपणारी वस्तू असल्याने तिचे मूल्य सतत वाढतच असते आणि भविष्यातही वाढतेच राहणार आहे. म्युच्युअल फंडातील अशा काही योजना असतात, ज्यात इक्विटी शेअर बरोबरीने सोन्यातील गुंतवणूक केली जाते अशा पर्यायांचाही वापर गुंतवणुकीला पोर्टफोलिओला वेगळेपण देण्यासाठी करता येऊ शकतो. तुमच्या एकूण पोर्टफोलिओपैकी ठरावीक हिस्सा सोन्यातील गुंतवणुकीमध्ये डिजिटल माध्यमातून झाला तर भविष्याच्या दृष्टीने ते फायदेशीरच ठरणार आहे.