मागील लेखात आपण अमेरिकेने छेडलेल्या व्यापारयुद्धामुळे भारताला पुढील काळात महागाई नियंत्रणामध्ये सरकारला कसा फायदा होईल, याबाबत चर्चा केली होती. मागील १०-१५ दिवसातील अन्न धान्य, फळे, भाज्या इ. कमॉडिटीच्या किंमतीत आलेली नरमाई पाहता आपले अंदाज चांगलेच खरे ठरले आहेत, असे म्हणता येईल. तर मागील आठवड्यात प्रसिद्ध झालेल्या एप्रिल महिन्यातील ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित किरकोळ महागाई दर सहा वर्षाच्या नीचांकी पातळीवर घसरली आणि घाऊक निर्देशांक देखील तेरा महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आल्यामुळे ते आपल्या अंदाजानुसारच होते.
या पार्श्वभूमीवर येत्या काळात देखील आपले अंदाज खरे ठरण्याची शक्यता अधिक दृढ झाली आहे आणि त्यामुळे रिझर्व्ह बँकेला अधिक आत्मविश्वासाने व्याजदर कपात करणे शक्य होईल, अर्थव्यवस्थेत उत्साहजनक वातावरण निर्माण होईल आणि मोसमी पाऊस सामान्य ते अधिक झाला तर एका सकारात्मक आर्थिक चक्रामुळे देशाच्या विकासदराला अधिक चालना मिळेल,अशा प्रकारची परिस्थिति निर्माण झाली आहे. याचे अग्रीम परिवर्तन आपल्याला निफ्टी आणि बँक निफ्टी या आपल्या भांडवली बाजारातील प्रमुख निर्देशांकांमध्ये आलेल्या जोरदार तेजीमध्ये दिसून येत आहे.
खरीप पीक निवड महत्त्वाची
आता दोन आठवड्यात राज्यात मोसमी पावसाची हजेरी लागेल आणि खरीप हंगामातील पेरण्यांची लगबग सुरू होईल. मागील संपूर्ण हंगाम राज्यातील प्रमुख पिकांसाठी मोठ्या मंदीचा गेल्यामुळे यावर्षी पीकनिवड करताना संभ्रम निर्माण होणे शक्य आहे. सोयाबीन आणि कापूस ही राज्यातील दोन प्रमुख खरीप पिके असून तूर आणि मका यांच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढताना दिसत आहे. परंतु मागील हंगामातील किंमती पाहून लागवडीचा निर्णय घेतला जात असल्यामुळे सलग दोन हंगामात सोयाबीनमध्ये तोटा झाल्यामुळे शेतकरी सोयाबीनचे क्षेत्र कमी करण्याच्या बेतात असणे साहजिक आहे. तर कापसात कमी-जास्त प्रमाणात तीच परिस्थिति राहिल्याने कपाशीच्या लागवडीत देखील घट होऊ शकेल, असे बोलले जात आहे. त्यामुळे येत्या खरीपात पीकनिवड महत्त्वाची ठरणार आहे.
सुरक्षित पीक – मका
सोयाबीन, कापूस यांच्या किंमती साधारणपणे जागतिक घटकांवर अधिक अवलंबून असल्याने देशांतर्गत परिस्थितीत सुरक्षित पीक म्हणून सलग तिसऱ्या वर्षी मक्याला झुकते माप देणे किफायतशीर ठरेल. अलीकडील काळात मका हे पशूखाद्य न राहता ते ऊर्जा आणि अन्न पीक म्हणून सतत मागणीत वाढ होताना दिसत आहे. खरीप आणि रब्बी तसेच उन्हाळी अशा तिन्ही हंगामात मक्याची लागवड वाढत असली तरी मागणीतील वाढ क्षेत्रवाढीपेक्षा अधिक राहिल्याने मक्याची किंमत ऐन काढणीच्या वेळी देखील प्रतिक्विंटल २,००० रुपयांच्या खाली आलेली नाही. तर हंगामाअखेरीस तो कुठे कुठे ३१-३२ रुपये झाल्याचे दिसून आले आहे.
पुढील काळात इथेनॉलसाठी केंद्राने अधिक तांदूळ उपलब्ध करून दिला असला, तरी ऊसाची उपलब्धता अजून आठ-दहा महिने जेमतेम राहील. त्यामुळे मक्याची मागणी कमी होण्याची शक्यता नाही. तसेच पोल्ट्री-स्टार्च-प्रक्रिया केलेले अन्न यासाठी मक्याची मागणी चांगलीच राहील. त्यामुळे मका तुलनेने सर्वात सुरक्षित पीक राहील.
कापूस, सोयाबीन आश्वासक
कापूस आणि सोयाबीन ही दोन्ही पिके येत्या वर्षात तेजीत राहतील की मंदीत हे सांगणे सध्याच्या परिस्थितीत कठीण असले तरी दोन्ही पिकांसाठी यापूर्वीच किंमतीचा तळ नोंदवला गेला आहे, एवढे सांगता येईल. तसेच अलीकडील जागतिक व्यापार युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतातील परिस्थितिचा आढावा घेतल्यास कापसाच्या मागणीत वाढ होण्यासाठी अनुकूल परिस्थिति आहे. विशेषत: वस्त्र-प्रावरणे निर्यातीत मोठी वाढ होण्याची शक्यता असल्यामुळे कापसात मर्यादित तेजीची अपेक्षा केल्यास चूक ठरणार नाही. मर्यादित यासाठी की, कापूस महामंडळाकडील हमीभाव खरेदीतील मोठे साठे प्रत्येक तेजीत बाजारात येण्याची शक्यता विचारात घेता कापसाला पुढील हंगामात ८,६००-८,८०० रुपये प्रतिक्विंटल या पातळीवर मोठा अडसर राहील. तर सोयाबीन देखील मर्यादित तेजीकडे वाटचाल करण्याची शक्यता आहे. अमेरिकी खंडात पुढील हंगामात सोयाबीनचे क्षेत्र मक्यात वळण्याचे अंदाज, जागतिक पातळीवर पोल्ट्री, पशुपालन उद्योगातील अनुमानित वाढ आणि देशांतर्गत लागवडीतील अनुमानित घट या घटकांमुळे सोयाबीन प्रतिक्विंटल ५,०००-५,२०० रुपये जाण्यास मदत होईल. अर्थात यासाठी २०२६ उजाडण्याची वाट पाहायला लागू शकेल.
तुरीला धोरण-शाप तर उडीद किफायतशीर
राज्यात तूर हे महत्त्वाचे खरीप पीक असून २०२३-२४ या पणन हंगामात तुरीला विक्रमी भाव मिळाला. त्यामुळे मागील वर्षात तुरीचे क्षेत्र आणि उत्पादन वाढेल अशी अपेक्षा होती. परंतु क्षेत्रवाढ मर्यादित राहिली आणि प्रतिकूल हवामान यामुळे अपेक्षित उत्पादनवाढ झालीच नाही. त्यामुळे तुरीचे भाव निदान हमीभावापेक्षा अधिक राहणे गरजेचे होते. परंतु तूर आणि पिवळ्या वाटाण्याची विक्रमी आयात, केंद्राची कडक धोरणे यामुळे तूर मंदीतच राहिली आहे. येत्या काळात देखील वाटाण्याचे मोठे साठे, केंद्राचे बफर स्टॉक, आणि आयातीवर भर तसेच चांगला पाऊस होण्याचे अनुमान अशा अनेक घटकांची सावली कडधान्य क्षेत्रावर राहील, असे संकेत मिळत असल्यामुळे तुरीत पुढील वर्षात मोठी तेजी अपेक्षित नाही. त्या तुलनेत सातत्यपूर्ण मागणी आणि पुरवठा वाढीचे कमीत कमी पर्याय यामुळे उडीद पीक अधिक किफायतशीर राहील.
वरील अंदाज हे सध्याची आंतरराष्ट्रीय परिस्थिति लक्षात घेऊन व्यक्त केले आहेत. लवकरच भारताचे अनेक द्विपक्षीय व्यापार करार होणार आहेत. यामध्ये अमेरिकेशी होऊ घातलेला करार अत्यंत म्हहत्त्वाचा ठरणार आहे. अमेरिकेच्या मनात भारताला इथेनॉल निर्यात करण्याचे मनसुबे आहेत. ते यशस्वी झाल्यास मक्यातील तेजीला लगाम बसू शकेल. तीच गोष्ट इतर शेतमालाच्या बाबतीत देखील होऊ शकते. परंतु या कराराद्वारे दुसरे दरवाजे देखील उघडू शकतात. त्यामुळे सध्या या गोष्टींवर लक्ष ठेवणे एवढेच आपण करू शकतो.
सोन्यात तेजीपेक्षा मंदीची शक्यता अधिक
मागील महिन्यात सोन्याने भारतात १,००,००० रुपये प्रति १० ग्रॅम हा (सर्व करांसहित) किंमतीचा उच्चांक गाठला होता. आणि या संपूर्ण वर्षात सोने १,२५,००० रुपयांचा नवीन विक्रम करेल असे सर्वत्र बोलले जात होते. या स्तंभातून याविषयी चर्चा करताना सोन्याच्या किंमतीत अधिक वाढ होण्याची शक्यता वर्तवली असली तरी त्यात तेजीपेक्षा मंदीची शक्यता कैक पटीने अधिक असल्याचे सूचित केले होते. तसेच नजीकच्या काळातील सोन्याचा कल हा १००-२०० डॉलरच्या चढ उतारांनी भरलेला असेल असेही म्हटले होते. मागील महिन्याभरातील सोन्याच्या भावातील चढ-उतार अगदी अशाच प्रकारचे राहिले असून सोने ३,५०० डॉलर (प्रति ट्रॉय औंस) वरुन आता ३,२०० डॉलरच्या खाली आले आहे. ही मंदी अजून लांबण्याची शक्यता असून आंतरराष्ट्रीय बाजारात किंमती २,९००-२,८०० डॉलर या कक्षेपर्यंत येण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे. रशिया-यूक्रेन आणि भारत-पाकिस्तान यांमधील निवळलेली परिस्थिति, अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा व्यापार-कर युद्धाबाबत घेतलेला मवाळ पवित्रा या गोष्टी अशाच राहिल्या किंवा याहून अधिक सुधारल्या तर सोन्यातील मंदी वर्षभर चालू राहणे सहज शक्य आहे.