मारुती सुझुकी या भारतातील सर्वात मोठ्या वाहन उत्पादन करणाऱ्या कंपनीने आपले ‘मेगा एक्सपान्शन प्लॅन’ जाहीर केले आहेत. उदारीकरणाच्या आधी भारत सरकार आणि सुझुकी मोटर्स जपान यांच्या एकत्रित भागीदारीतून सुरू झालेल्या या कंपनीने भारतातील सर्वसामान्य माणसाचे आपली स्वतःची हक्काची गाडी असण्याचे स्वप्न पूर्ण केले. सर्वसामान्यांना परवडणारी आणि सर्वाधिक मायलेज देणारी याचबरोबर अनेक काळ टिकून साथ देणारी गाडी असा तिचा लौकिक राहिला. गेल्या पंधरा-वीस वर्षात परदेशी कंपन्यांनी भारतात आपले बस्तान बसवायला सुरुवात केली. ह्युंदाई सर्वप्रथम बाजारात दाखल झाली पण नंतर युरोपियन कंपन्या आल्या, दक्षिण कोरियाची किया मोटर्स आणि जॅग्वार आणि लँड रोव्हरच्या यशस्वी खरेदींनंतर टाटा मोटर्सने आपली नाविन्यपूर्ण मॉडेल्स बाजारात आणायला सुरूवात केली, आधुनिक श्रेणीतील वाहने बाजारात आणायला सुरुवात केली. त्यावेळी मारुतीला स्पर्धा निर्माण व्हायला सुरुवात झाली. पण यावर यशस्वीरित्या मार्ग काढत मारुतीने आपली वाटचाल सुरूच ठेवली. ‘हॅचबॅक’ या श्रेणीतील एस्क्प्रेसो, स्विफ्ट, अल्टो, अल्टो K१०, व्हॅगनार, सेलेरिओ या गाड्या; जुन्या मारुती व्हॅन चे नवे बदललेले रूप असलेली ‘इको’ ही गाडी; एम यु व्ही(MUVs) आणि एसयूव्ही (SUVs) या श्रेणीतील अर्टिगा आणि ब्रिझा आणि सेदान श्रेणीतील डिझायर या गाड्या मारुतीच्या सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या गाड्या आहेत. मात्र बदलत्या बाजाराची ओळख समजून घेऊन नेक्सा या आपल्या ब्रँडच्या माध्यमातून ग्रँड विटारा, जिमी, बलेनो, सियाज, XL-6 अशा प्रीमियम श्रेणीतील गाड्या सुद्धा मारुती विकते. कोरोनाच्या टाळेबंदीनंतर पुन्हा एकदा बाजारपेठ स्थिरावत असताना मारुती कंपनी पुन्हा एकदा टॉप गिअर टाकायला सज्ज आहे. आपल्याकडे असलेल्या शिल्लक रकमेपैकी ४५००० कोटी रुपये खर्चून तिसऱ्या टप्प्यातील एक्सपान्शन करण्यात येणार आहे. हा प्लॅन पूर्णपणे प्रत्यक्षात येण्यासाठी सात वर्षाचा कालावधी लागेल.
आणखी वाचा: Money Mantra: ‘मिशो’च्या नफ्याचं गमक काय?
आठ लाख गाड्यांचे उत्पादन आणि इलेक्ट्रिक वाहननिर्मितीत आघाडीचे टार्गेट
२०३०-३१ या वर्षात सध्या आहे त्या तुलनेत मारुतीच्या गाड्यांचे उत्पादन दुप्पट झाले पाहिजे असे मारुतीचे उद्दिष्ट आहे. या उद्दिष्टाअंतर्गत पुढच्या आठ वर्षात मारुती 20 लाख गाड्यांची निर्मिती करण्यावर आपले लक्ष केंद्रित करणार आहे. मारुतीची ओळख असलेल्या पारंपरिक गाड्या बाजारातून जाणार नाहीतच, मात्र नव्या जमान्यातील ग्राहकांच्या बदलत्या आवडीनुसार इलेक्ट्रिक व्हेईकल (EVs), सीएनजी आणि इथेनॉल या शाश्वत तंत्रज्ञानाचा वापर करून कंपनीला आपले उद्दिष्ट साध्य करायचे आहे. पुढच्या आठ वर्षात कंपनी विजेवर चालणाऱ्या सहा गाड्या बाजारात आणणार आहे. यामुळे ग्राहकांना निवडीचे अधिक स्वातंत्र्य तर मिळेल आणि मारुतीला आपल्या सध्याच्या ग्राहकांनाच लक्ष्य बनवून इलेक्ट्रिक व्हेईकल विकता येतील. २०२२- २३ या आर्थिक वर्षात मारुतीने जवळपास 19 लाख गाड्यांचे विक्रीचे उद्दिष्ट साध्य केले आहे. मारुतीने आपला निर्यातीतील वाटा वाढवण्यावर भर दिला आहे. गेल्या वित्त वर्षात मारुतीने अडीच लाख गाड्या निर्यात केल्या.
आणखी वाचा: आयटीसी आणि आयटीसी हॉटेल यांचे डीमर्जर
ऑगस्ट महिन्याची उत्साहवर्धक आकडेवारी
कंपनीने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार ऑगस्ट महिन्यात गाड्यांची एकूण विक्री १८९०८२ इतकी झाली. मारुतीने आत्तापर्यंत एका महिन्यातील विक्रीचा नोंदवलेला हा उच्चांक आहे. या महिन्यात मारुतीने २४६१४ गाड्यांची निर्यात केली, मागच्या वर्षीच्या तुलनेत यात तीन हजाराने वाढ झाली. ऑगस्टच्या आकडेवारीचा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असा की स्पोर्ट्स युटिलिटी वेहिकल्स (SUVs) या श्रेणीतील ब्रिझा, आर्टिगा, ग्रँड विटारा, जिमी, एस क्रॉस अशा गाड्यांमध्ये विक्री जोरदार वाढलेली दिसली. या श्रेणीतील ५८,७४६ गाड्या विकल्या गेल्या गेल्या. वर्षी हाच आकडा अवघा २६९३२ एवढा होता. यावरून मारुती फक्त छोट्या गाड्याच विकू शकते हा समज दूर होण्यात नक्की मदत होईल.
शेअरहोल्डर्सना घसघशीत डिव्हीडंड !
गुंतवणूकदारांसाठी आणखी एक चांगली बातमी म्हणजे गेल्या ४० वर्षातील सर्वाधिक म्हणता येईल असा ९० रुपये प्रति शेअर घसघशीत लाभांश कंपनीने जाहीर केला आहे. सोमवारी ४ सप्टेंबर रोजी बाजार बंद झाले तेव्हा मारुतीच्या शेअर चा भाव १०३६२रुपये होता.