निफ्टी निर्देशांक जेव्हा २४,६०० ला नाकावर सूत असल्यागत दाहक मंदीच्या गर्तेत होता, त्या वेळेला तेजीचा ‘त’ उच्चारताना ‘त त प प’ व्हायचं. तथापि, तेव्हाच्या उदासीन वातावरणात, ‘बस झाली आता मंदी!’ असा पुकारा याच स्तंभातून केला गेला. अमर (चलत सरासरी), अकबर (फेबुनासी रिट्रेसमेंट) आणि अँथनी (गॅन अँगल) यांना हाताशी घेत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच स्मरण करत, २४,६००च्या स्तरावर ‘तेजीचे इवलेसे रोप लावले’ गेले. आज त्याचा आज वेलू गगनावरी गेला अशी आजची तेजीची परिस्थिती आहे. लवकरच निफ्टी नवीन उच्चांकाच्या नभांगणात स्वच्छंदपणे विहार करण्याच्या स्थितीत आहे. अशा रीतीने दिवाळीतील पाडव्याला हे नवीन वर्ष गुंतवणूकदारांना सुख, समृद्धी, भरभराटीचे जावो अशा शुभेच्छा निफ्टीने आपल्या कृतीतून दिल्या, असे म्हटलं तरी ते वावगे ठरणार नाही.

सरलेल्या सप्ताहातील हलक्याफुलक्या घसरणीला पाहता, निफ्टी निर्देशांकाला २५,७०० ते २५,४०० स्तरावर भरभक्कम आधार आहे हे पुन्हा सांगावेसे वाटते. हा स्तर राखल्यास निफ्टी निर्देशांकाचे वरचे लक्ष्य २६,१००… २६,३३३… २६,६३३ ते २६,९३३ असे असेल.

या लेखात आपण वर नमूद केलेले उच्चांक कशा रीतीने काढले ते अंकगणितातील आकडेमोडीवरून जाणून घेऊया.

नवीन उच्चांकासाठी आपल्याला मध्यबिंदूची गरज लागणार आहे. हा मध्यबिंदू काढण्यासाठी आलेखावरील, ३० जून २०२५ चा उच्चांक म्हणजेच २५,६६९ आणि ८ ऑगस्ट २०२५ रोजीचा २४,३३७ अलीकडचा नीचांक लक्षात घेऊ. या उच्चांक, नीचांकांमधील फरक २५,६६९ उणे २४,३३७ हा १,३३२ येत आहे. आता मध्यबिंदू काढण्यासाठी उच्चांक, नीचांकांमधील फरक १,३३२ च्या अर्धे म्हणजेच ६६६ हा आकडा येतो. ६६६ ही संख्या ८ ऑगस्ट २०२५ च्या २४,३३७ नीचांकामध्ये मिळविली असता २५,००३ (२४,३३७ ६६६ ) हे उत्तर येते. या स्तराला आपण शाश्वत तेजीचा स्तर म्हणून अधोरेखित करत आलो आहोत.

निफ्टी निर्देशांक २५,००३ च्या स्तरावर सातत्याने टिकल्यास निफ्टी निर्देशांकाचे वरचे लक्ष्य काढण्यासाठी २५,००३ अधिक १,३३२ (उच्चांक – नीचांकामधील फरक) मिळविता २६,३३५ हे निफ्टी निर्देशांकाच वरचे लक्ष्य येत आहे, जे बरोबर २७ सप्टेंबर २०२४ च्या २६,२७७ च्या उच्चांकाशी साधर्म्य साधणारे आहे.

निफ्टी निर्देशांकाची तेजीची अथवा मंदीची चाल तपासता निफ्टी निर्देशांक नेहमी ३०० अंशांच्या परिघात (बॅण्ड) वाटचाल करत असतो. त्या दृष्टीने २६,३३३ अधिक ३०० अंश २६,६३३, त्यानंतर २६,९३३ (२६,६३३ ३०० अंश) हे निफ्टी निर्देशांकाचे संभाव्य उच्चांक दृष्टीपथात येत आहेत. भविष्यात निफ्टी निर्देशांकावरील तेजीचा वेलू २८,५०० पर्यंत बहरेल की मध्येच खुरडेल त्याचा विस्तृत आढावा पुढील लेखात घेऊया. (क्रमशः)
निकालपूर्व विश्लेषण

१) भारत हेवी इलेक्ट्रीकल लिमिटेड (भेल )

  • २४ ऑक्टोबरचा बंद भाव : २३१.२५ रुपये
  • तिमाही वित्तीय निकाल : बुधवार, २९ ऑक्टोबर
  • महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर : २२७ रुपये
  • निकाल उत्कृष्ट असल्यास : या सकारात्मक वृत्ताच्या जोरावर समभागाकडून २२७ रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य २४५ रुपये, द्वितीय लक्ष्य २६५ रुपये.
  • निराशादायक निकाल असल्यास: २२७ रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत २१० रुपयांपर्यंत घसरण

२) कोल इंडिया लिमिटेड

  • २४ ऑक्टोबरचा बंद भाव : ३९४.१० रुपये
  • तिमाही वित्तीय निकाल: बुधवार, २९ ऑक्टोबर
  • महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर: ३८५ रुपये
  • निकाल उत्कृष्ट असल्यास : या सकारात्मक वृताच्या जोरावर समभागाकडून ३८५ रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ४०० रुपये, द्वितीय लक्ष्य ४१५ रुपये.
  • निराशादायक निकाल असल्यास: ३८५ रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ३७५ रुपयांपर्यंत घसरण.

ई-मेल: ashishthakur1966@gmail.com
लेखक भांडवली बाजार विश्लेषक आहेत.

अस्वीकृती: शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि इच्छित लक्ष्य या संकल्पनांचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.