Post Office FD Rates & Calculations: पोस्ट ऑफिसच्या विविध योजनांमध्ये गुंतवणूक ही भारतात सर्वाधिक लोकप्रिय तर आहेच, पण ती विश्वासार्ह योजनाही मानली जाते. गुंतवणूकदारांना कर वाचवण्यासाठी पोस्टाच्या योजनेचा लाभ होऊ शकतो, तसेच बाजारातील सततच्या उलाढाली पाहता ही सुरक्षित गुंतवणूकसुद्धा ठरते. यंदा नव्या आर्थिक वर्षात कर वाचवण्यासाठी आणि चांगला परतावा मिळण्यासाठी आपणही गुंतवणुकीच्या योजना शोधत असाल तर पोस्टाच्या मुदत ठेव योजनेविषयी (फिक्स्ड डिपॉझिट (FD)) प्लान्सविषयी आज आम्ही आपल्याला सांगणार आहोत.

पोस्ट ऑफिसमध्ये एक वर्ष, दोन वर्ष, तीन वर्ष आणि पाच वर्षे अशा विविध मुदतीच्या योजना आहेत. सरकारी योजना असल्याने यातून परताव्याची हमीही चांगली अते. लक्षात घ्या, प्राप्तिकर कायदा, १९६१ च्या कलम ८० सी अंतर्गत सर्वच योजना तुम्हाला १.५० लाख रुपयांपर्यंत प्राप्तिकरात सूट देत नाहीत. पोस्ट ऑफिस एफडीद्वारे फक्त पाच वर्षांच्या एफडीमध्ये ठेवलेल्या ठेवींवर दीड लाख रुपयांपर्यंत कर सवलत प्रदान केली जाते.

पोस्ट ऑफिस मुदत ठेव योजना काय आहे?

पोस्ट ऑफिस फिक्स्ड डिपॉझिट किंवा मुदत ठेव निर्दिष्ट कालावधी पूर्ण झाल्यानंतर तुमच्या गुंतवणुकीवर हमी दराने परतावा देते. जेव्हा मुदत ठेवींची मुदत पूर्ण होते, तेव्हा तुम्ही पैसे काढू शकता ज्यात तुम्ही गुंतवणुकीच्या वेळी दिलेली मूळ रक्कम आणि व्याज देखील समाविष्ट असते. पोस्ट ऑफिस एक वर्ष, दोन वर्ष, तीन वर्ष आणि पाच वर्ष अशा विविध कालावधीच्या एफडी करण्याची मुभा देते.

पाच वर्षांसाठी पोस्ट ऑफिस एफडी ७.५ टक्के व्याज दर देते, व्याज दर वार्षिक देय आहे परंतु तिमाही गणना केली जाते. एफडीमध्ये किमान ठेव १००० रुपये असते. कमाल रक्कमेची मर्यादा याला लागू होत नाही. तुम्ही संयुक्त (जॉईंट) किंवा वैयक्तिक खाते उघडू शकता.

अल्पवयीन मुलाच्या वतीने पालक देखील खाते उघडू शकतात. पाच वर्षांच्या मुदत ठेवीचा कालावधी पूर्ण होण्याआधी, आपण पुन्हा १८ महिन्यांसाठी एफडी पुन्हा चालू ठेवू शकता.

हे ही वाचा<< Money Mantra: नारायण मूर्तींनी नातवाला दिलेल्या २४० कोटींच्या भेटीवर किती टॅक्स बसणार?

पोस्ट ऑफिसच्या एफडी योजनांचा परतावा

  • पोस्ट ऑफिस एफडी स्कीममध्ये ३ लाख रुपयांच्या गुंतवणुकीसाठी, तुम्हाला १ लाख ३४ हजार ९८४ रुपये व्याज मिळू शकते आणि मुदत संपल्यावर रक्कम ४ लाख ३४ हजार ९८४ रुपये मिळू शकते.
  • पोस्ट ऑफिस एफडी स्कीममध्ये ५ लाख रुपयांच्या गुंतवणुकीसाठी, तुम्हाला २ लाख २४ हजार ९७४ रुपये व्याज मिळू शकते आणि मुदत संपल्यावर ७ लाख २४ हजार ९७४ रुपये रक्कम मिळू शकते.
  • पोस्ट ऑफिस एफडी स्कीममध्ये १० लाख रुपयांच्या गुंतवणुकीसाठी, तुम्हाला ४ लाख ४९ हजार ९४८ रुपये व्याज मिळू शकते आणि मुदत संपल्यावर १४ लाख ४९ हजार ९४८ रुपये रक्कम मिळू शकते.