आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल म्युच्युअल फंडाने नुकताच ‘आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल एनर्जी अपॉर्च्युनिटीज फंड’ या नावाने एक नवीन फंड बाजारात आणला आहे. त्या अनुषंगाने ऊर्जा क्षेत्रातील भारतातील सद्य:स्थिती आणि येणाऱ्या भविष्याचा हा एक संक्षिप्त आढावा.

ऊर्जा ही दैनंदिन जीवनातील आवश्यक बाब आहे, हे नव्याने सांगायला नको. मला आठवते, शाळेत असताना आठवड्यातील एक दिवस वीजप्रवाह बंद असायचा आमच्या गावात. मुंबई-पुण्यापलीकडे हा एक दिवसाचा ‘विजनवास’ नित्याचाच होता. आज कल्पना करून बघा. दूरचित्रवाणी, मोबाइल, रेफ्रिजरेटर, वाय-फाय, मायक्रोवेव्ह, कार, वॉशिंग मशीन अशा किती तरी वस्तूंच्या वापरावर निर्बंध येतील, जर वीजपुरवठा खंडित झाला. रेल्वे, विमाने ही दळणवळणाची साधने, उद्योग क्षेत्र, दूरसंचार अशा सर्वांना स्पर्शून जाणारा हा विषय आहे. तेल आणि वायू क्षेत्राचा विचार केला तर तेलसाठ्याचा शोध, त्यावर प्रक्रिया आणि साठवण आणि शेवटी त्याचे वितरण अशा तिन्ही टप्प्यांमध्ये वेगवेगळ्या कंपन्या कार्यरत आहेत. वीजनिर्मितीचा विचार केला तर थर्मल, हायड्रो, गॅस आणि न्यूक्लिअर अशा वेगवेगळ्या पद्धतीने काम करणाऱ्या आणि वितरण करणाऱ्या कंपन्या आहेत.

हेही वाचा : मार्ग सुबत्तेचा : सुकन्येची समृद्धी

गेल्या दोन दशकांत भारताचा ऊर्जा वापर दुपटीने वाढला आहे. भारत हा जागतिक स्तरावर चौथा सर्वात मोठा ऊर्जा वापरकर्ता देश आहे. भारताचा दरडोई ऊर्जेचा वापर जागतिक सरासरीच्या एकतृतीयांश आहे. चीनचा वापर भारताच्या ४.४ पट आहे आणि कोरियाचा वापर भारताच्या ९.५ पट आहे. भारत ही जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या मार्गावर असताना, दरडोई ऊर्जा वापरातही लक्षणीय वाढ होऊ शकते. वर्ष २००० ते २०१० या दहा वर्षांच्या कालावधीत चीन कृषी क्षेत्राकडून उत्पादन क्षेत्राकडे वळल्यामुळे विजेची प्रचंड मागणी निर्माण झाली. भारताचा प्रवास वेगळा आहे, पूर्वी आपण कृषी क्षेत्रातून सेवा क्षेत्राकडे वळलो. आता आपण उत्पादन क्षेत्राकडे मोर्चा वळवला आहे, ज्यामुळे भारतात ऊर्जेची मागणी जास्त राहणार आहे. दरडोई उत्पन्नातील वाढीमुळेदेखील ऊर्जेची मागणी वाढती राहील. तुम्हाला माहिती आहे का, की एका चॅटबॉट क्वेरीला गूगल सर्चपेक्षा जवळपास १० पट जास्त वीज लागते.

भारतासारख्या उष्णकटिबंधीय देशात विजेची मागणी हवामान बदलाशी निगडित राहणार आहे. जागतिक हवामान संघटनेच्या भाकितानुसार, वर्ष २०२३ ते २०२७ या कालावधीत जागतिक वार्षिक सरासरी तापमान १.१°C – १.८°C जास्त असण्याचा अंदाज आहे. २०७० पर्यंत शून्य कार्बन उत्सर्जनाचे देशाचे लक्ष्य आहे. त्यामुळे ‘एनर्जी व्हॅल्यू चेन’मधील विद्यमान आणि नवीन कंपन्यांसाठी संधी निर्माण होतील.

हेही वाचा : Money Mantra: फंड विश्लेषण – क्वान्ट मिड कॅप फंड

या फंडाची गुंतवणूक वीजनिर्मिती, नैसर्गिक तेल, हरित ऊर्जा, वायू अशा क्षेत्रातील कंपन्यांमध्ये असेल. २०२४ अखेरीस निफ्टी एनर्जी इंडेक्स ट्रेलिंग पीई १४.१२ तर निफ्टी ५० इंडेक्स ट्रेलिंग पीई २२.८५ आहे. बाजाराचे मूल्यांकन उच्चतम पातळीवर असताना हा फंड बाजारात आला आहे. या फंडात प्रामुख्याने लार्ज कॅप कंपन्यांचा जास्त भरणा असेल. हा ऊर्जा क्षेत्रासंदर्भातील फंड असल्याने त्याला या क्षेत्रातील संधी आणि जोखीम दोन्ही लागू होतात.

हेही वाचा : Money Mantra: होम लोन मुदतीपूर्वीच चुकते करावे की, नाही?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वीजटंचाईसारख्या समस्यांवर आपल्याला मात करत पुढे जायचे आहे, त्यामुळे दीर्घ कालावधीत ऊर्जा क्षेत्र आणि सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) हे एकत्रितपणे वाढतील, अशी अपेक्षा आहे. पुढील २५ वर्षांमध्ये भारताची जशी अधिकाधिक प्रगती होईल तशी आपली ऊर्जेची मागणी वाढत राहील. विकसित भारताच्या स्वप्नाचा पाया ऊर्जा क्षेत्रातून घातला जाईल. ज्या अनुभवी गुंतवणूकदारांना दीर्घकालीन गुंतवणूक करायची आहे, त्यांनी आपल्या गुंतवणूक सल्लागाराशी चर्चा करून गुंतवणुकीचा निर्णय घ्यावा.