गेल्या लेखात तांत्रिक विश्लेषणशास्त्रातील ‘इलियट वेव्ह’ संकल्पनेचा आधार घेत निफ्टी निर्देशांकाची भविष्यकालीन वाटचाल तीन शक्यतांच्या आधारे रेखाटली होती. त्या शक्यता आज काळाच्या कसोटीवर तपासता – १) ‘वस्तू व सेवा कर’ (जीएसटी) रचनेतील सुधारणा आणि कर सवलतीच्या रूपात जी सकारात्मक बातमी आली त्या घटनेने तेजीला खतपाणी घातलं. त्या दृष्टीने निफ्टी निर्देशांकाने २५,१५० ते २५,३५० चा स्तर पार करावयास हवा होता, तर ही तेजीची झुळूक ‘शाश्वत तेजीत’रूपांतरित झाली असती. असे घडल्यास ते तेजीचं पाहिलं पाऊल असेल.

२) हे शक्य न झाल्यास निदान २४,८५२ ते २४,६७३ ची गॅप / पोकळीचा स्तर निफ्टी निर्देशांकाने राखावयास हवा. असे घडल्यास त्या वेळेला चालू असलेली तेजीची कमान तरी निफ्टी निर्देशांकावर कायम राहिली असती. हे दुसरं पाऊल होतं. (निफ्टी निर्देशांक २५,१५० वरून २४,८५० पर्यंत खाली येणं हे तेजीच्या प्रवासात ‘एक पाऊल’ मागे येण्यासारखं झालं.)

३) तिसरी शक्यता जी वर्तविली होती, ती म्हणजे ऑगस्ट अखेरीला ट्रम्प यांचा आयात शुल्काचा प्रस्ताव हा विपरीत आल्यास बाजाराची घसरण अपेक्षित आहे. या स्थितीत निफ्टी निर्देशांक २४,६७३ च्या खाली टिकल्यास निफ्टी निर्देशांकांचे प्रथम खालचे लक्ष्य २४,५०० असेल. जे सरलेल्या सप्ताहातील शुक्रवारी निफ्टी निर्देशांकाने २४,४२६ चा साप्ताहिक बंद देत साध्य केलं. अशा रीतीने ‘तीन पावलांत’ निफ्टीची गेल्या पंधरा दिवसांची वाटचाल शब्दबद्ध करता येईल. यातील ‘एक पाऊल पुढे तर दोन पावलं मागे’ अशा रीतीने निफ्टीची वाटचाल होती.

निफ्टी निर्देशांक २४,५००च्या स्तराखाली टिकत असल्याने, निफ्टीची वाटचाल पुन्हा दोन पावलं मागे- म्हणजेच मंदीच्या दिशेने व्हायला लागली आहे. या मंदीच्या दिवसांत निफ्टी निर्देशांकावर एक क्षीण स्वरूपाची सुधारणा, तेजी अपेक्षित आहे. हा ‘बुडत्याला काडीचा आधार’ याप्रमाणे असेल. त्या स्थितीसाठी आज मानसिक तयारी करूया. यासाठी आपण ‘तांत्रिक विश्लेषणशास्त्रातील, चलत् सरासरी,(मूव्हिंग ॲव्हरेज), फेबुनासी रिट्रेसमेंट, गॅन अँगल या तीन प्रमेयांनी / आयुधांनी तेजीची- ‘लक्ष्मीची तीन पावलं रेखाटूया’.

निफ्टी निर्देशांकावरील क्षीण तेजीचे गृहीतक

१) चलत् सरासरी: तांत्रिक विश्लेषणातील सर्वात महत्त्वाची संकल्पना, गुंतवणूकदार गुंतवणुकीचा विचार करताना ज्याचा प्राधान्याने विचार करतात ती ‘२०० दिवसांची चलत् सरासरी’ ही आताच्या घडीला निफ्टी निर्देशांकावर ती २४,०७५ आहे.

२) फेबुनासी रिट्रेसमेंट : यासाठी निफ्टी निर्देशांकावरील ३० जूनचा उच्चांक २५,६६९ आणि ७ एप्रिल २०२५चा नीचांक २१,७४३ या घसरणीचा ६१.८ टक्के आधार स्तर हा २४,१६९ येत आहे.

३) गॅन अँगल : यासाठी निफ्टी निर्देशांकावरील २७ सप्टेंबर २०२४ चा उच्चांक २६,२७७ गृहीत धरून घसरणीला अटकाव करणारा ‘गॅन अँगल’चा आधार स्तर हा आताच्या घडीला २४,२३० येत आहे.

तीन वेगवेगळी प्रमेयं, पण एकत्रितपणे ती २४,२३० ते २४,००० ची संख्या सूचित करत आहेत. जिवाचा थरकाप उडवणाऱ्या, दाहक मंदीच्या गर्तेत तेजीची संकल्पना मांडणे म्हणजे ‘तेजीचा शब्द बोलण्याऐवजी त त प प बोलण्यासारखंच. पण आनंद बक्षी, मनमोहन देसाई यांच्यापासून प्रेरणा घेऊन… अनहोनी को होनी कर दें, होनी को अनहोनी, एक जगह जब जमा हों तीनों याप्रमाणे, अमर म्हणजे चलत् सरासरी, अकबर म्हणजे फेबुनासी रिट्रेसमेंट आणि ॲन्थनी अर्थात गॅन अँगल असे हे तिघे एकत्र येऊन २४,०००च्या स्तराची राखण करत आहेत. या स्तरावरून, तेजीची पालवी फुटल्यास निफ्टी निर्देशांकाचे वरचे लक्ष्य २४,५००, २४,८५० ते २५,१५० असे असेल.

‘नेहमी चांगलंच होईल याचा विचार करा, पण वाईटाची तयारी ठेवा’ म्हणजेच ट्रम्प यांची आकाशवाणी – ट्विटरवरील घोषणा. ती भारताच्या बाबतीत पुन्हा निराशाजनक आल्यास, ‘बुडत्याला काडीचा आधार’ असलेला २४,००० चा स्तरदेखील तोडत निफ्टी निर्देशांकाचे प्रथम खालचे लक्ष्य २३,८०० ते २३,५००, तर द्वितीय खालचे लक्ष्य २३,००० असेल.- आशीष ठाकूर, लेखक भांडवली बाजार विश्लेषक आहेत.

ashishthakur1966@gmail.com

प्रकटन : शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टाॅप लाॅस’ आणि इच्छित लक्ष्य या संकल्पनांचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.