शेअर बाजारात गुंतवणूकदारांकडून धुवाधार पैशांचा पाऊस सुरूच आहे. यंदा लवकर सुरुवात होऊन, लांबलेल्या पावसाप्रमाणे, बाजार पडो, झडो पण गुंतवणुकीची संततधार सुरूच आहे. गुंतवणूकदारांची तऱ्हा ही अशी कशी? प्रश्न हाही की, हा पैशाचा ओघ, हवा तसा फायदा गुंतवणूकदारांना देईल काय?
शेअर बाजाराची खरी गंमत ही तो सतत हालता राहण्यात आहे. नव-नवे बाजार प्रवाह, उलट प्रवाह, गती आणि सर्वात म्हणजे बाजारातील अस्थिरता यातून हे घडत असते. अर्थात ट्रेंड्स, ट्रेंड रिव्हर्सल्स, मोमेंटम आणि व्होलॅटॅलिटी वगैरे बाजाराची अभिन्न वैशिष्ट्ये आहेत. या वैशिष्ट्यांमुळेच तर अनेकांना या बाजाराचा मोह जडला आहे. तर अनेकांसाठी तीच वैशिष्ट्ये रिस्क म्हणजेच धोक्याचे सूचकही आहेत. म्हणजे एकासाठी जी गोष्ट लोभस, तीच दुसऱ्यासाठी भीतीने काळजाचा ठोका चुकवणारी. गुंतवणूकदारांच्या गटांमधील ही एक सर्वात ठळक आणि महत्त्वाची विभागणी म्हणता येईल. म्हणजेच दिग्गज आणि संपत्तीवान तसेच संस्थात्मक गुंतवणूकदार आणि सगळेच ट्रेडर हे पहिल्या गटातील, तर छोटे वैयक्तिक (रिटेल) गुंतवणूकदार हे दुसऱ्या गटात मोडणारे. परंतु या बहुपदरी विभागणीतील पदर सैल व्हावेत, अशी गटातटातील सरमिसळ सध्या बाजारात सुरू आहे. स्पष्टच म्हणायचे तर ‘गुंतवणूकदार’ आणि ‘ट्रेडर’ ही तफावत वेगाने घटत आहे. सर्वात गंभीर गोष्ट म्हणजे अनेक गुंतवणूकदारांबाबत हा बदल त्यांच्या नकळतच सुरू आहे.
भारतीय भांडवल बाजार १९९२ मध्ये परदेशी गुंतवणुकीसाठी खुला झाला. १९९२-९३ मध्ये परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांचे (FII – एफआयआय) कामकाज १३ कोटींच्या माफक गुंतवणुकीतून सुरू झाले. त्याआधी तत्कालीन यूटीआय, सरकारी बँका आणि वित्तीय संस्थांकडून प्रायोजित म्युच्युअल फंडांचा समावेश असलेल्या देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांचे (DII – डीआयआय) बाजारात प्रस्थ होते. १९९३ मध्ये, खासगी क्षेत्रातील म्युच्युअल फंडांनादेखील सहभागास परवानगी देण्यात आली. जे आधीच कार्यरत असलेल्या म्युच्युअल फंडांसह, एफआयआयच्या तुलनेत एक तुलाभार (काऊंटरवेट) म्हणून काम करतील अशी अपेक्षा होती.
प्रत्यक्षात देशी संस्थांच्या (डीआयआय) तुलनेत, मागाहून आलेल्या परदेशी (एफआयआय) गुंतवणूकदारांचे पारडे जड होत गेले. बऱ्याच मोठ्या कालावधीपर्यंत परदेशी गुंतवणूकदारच आपल्या बाजाराचे नियंते आणि कर्तेकरविते होते. आज हे चित्र पालटले आहे. जून २०२५ मध्ये पहिल्यांदाच डीआयआय म्हणजेच देशी संस्थात्मक गुंतवणूकदार हे एफआयआयला वरचढ ठरल्याचे दिसले. जरी एफआयआयची भारतीय कंपन्यांतील हिस्सेदारी १७ टक्क्यांच्या आसपास असली, तरी त्या तुलनेत डीआयआयनी धारण केलेली एकूण शेअर संपदा (holding) आज २ टक्के जास्त म्हणजेच साधारण ७२ लाख कोटी रुपयांवर गेली आहे. परदेशी गुंतवणुकीचा प्रभाव घटणे हा मोठा उलटफेर नक्कीच आहे. तो घडविण्यात रिटेल गुंतवणूकदारांचेच मोठे योगदान राहिले आहे. कसे ते पाहूया.
सरलेला ऑगस्ट हा देशी गुंतवणूकदार संस्थांकडून पैशांचा ओघ सुरू राहिलेला सलग पंचविसावा महिना होता. या २५ महिन्यांत, त्यांनी अभूतपूर्व ११.५ लाख कोटी रुपये शेअर्समध्ये गुंतविले आहेत. यापैकी सुमारे ७५ टक्के म्हणजेच सुमारे नऊ लाख कोटी रुपये हे म्युच्युअल फंडांमधून आले आहेत. म्हणजेच नियतकालिक थोडक्या पण शिस्तशीर गुंतवणुकीचा परिपाठ असलेल्या ‘एसआयपी’चाच, पर्यायाने किरकोळ गुंतवणूकदारांचाच हा पैसा आहे. या रिटेल वैयक्तिक गुंतवणुकीचा आकार लहान असेल, परंतु त्यांच्या सहभागाचे एकत्रित प्रमाण या गुंतवणुकीला प्रचंड मोठी बनवते. किती मोठी तर, २०२१ मध्ये मासिक आठ ते नऊ हजार कोटी रुपयांचा असलेला ‘एसआयपी’ ओघ आज तिपटीने वाढून दरमहा २८ हजार कोटींवर पोहोचला आहे. प्रत्येक महिन्याला हा असा पैसा जमा होत जातो आणि तो म्युच्युअल फंडाच्या निधी व्यवस्थापकांना वापरणे अर्थात कसाही करून गुंतविणे भागच असते. म्हणूनच एफआयआयकडून अथकपणे विक्री आणि डीआयआयकडून तितक्याच अविचलपणे खरेदी अशी मालिका सारखी सुरू असते. उलटदेखील घडते, पण असे दिवस थोडकेच.
ही अशी स्थिती काही प्रश्नांना वाव निर्माण करते. रिटेल गुंतवणुकीच्या प्रवाहाची गती व सातत्य असेच राहिले, तर म्युच्युअल फंडही बाजाराला तारणाऱ्या खरेदीचे सातत्य राखणार काय? परदेशी गुंतवणूकदारांचा पैसा हा येतो आणि जातोही, पण तो नफा न कमावताच माघारी जातो असे कसे म्हणायचे? कंपन्यांची मिळकत कामगिरी जेमतेम असताना, त्यांच्या शेअरचे वाजवीपेक्षा अधिक फुगलेले मूल्यांकन हे परदेशी गुंतवणूकदारांच्या माघारीचे प्रमुख कारण. हेच कारण देशी गुंतवणूकदार संस्थांना जराही विचलित कसे करत नाही?
तेजी-मंदी शाश्वत नसते. शेअर बाजाराची नैसर्गिक धाटणीच अशी आहे. तेजी-मंदीचे नैसर्गिक संक्रमण मोठ्या कालावधीपर्यंत कृत्रिमरीत्या रोखता येणे म्हणूनच कठीण आहे. सरलेल्या तिमाहीत अनपेक्षित वधारलेला अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर, वस्तू व सेवा करातील (जीएसटी) ताज्या सुधारणांचे उपभोगाला, पर्यायाने कंपन्यांच्या मालाला उठाव देणारे सकारात्मक परिणाम, त्याआधीची प्राप्तिकरातील सवलत इत्यादी घटकांनी गुंतवणूकदार वर्गात उत्साह आणि आनंद असणे स्वाभाविक आहे. सध्याचा बाजारातील तेजीचा प्रवाह या कारणांनी शाबूत आहे. मात्र जागतिक बाजारात परिस्थिती विपरीत आहे. ती आणखी प्रतिकूल बनून एफआयआय बाहेर पडण्याची तीव्रता केव्हाही दिसेल, अशी अनिश्चितता आहे. ही स्थिती या तेजीच्या कणखरतेची कसोटी पाहणारी असेल. जास्तीचा परतावा म्हणून या पर्यायाकडे वळलेल्या सामान्य गुंतवणूकदारांना मात्र अजाणतेपणीच या अस्थिरतेच्या वावटळीत लोटले जाईल. अर्थात टेलीग्राम, व्हॉट्सॲपवरील अनाहूत ‘टिप्स’ना भुलून पुरते पोळले जाण्यापेक्षा, हे कैकपटीने बरे. मग गुंतवणूकदारांनी करावे तरी काय? एक तर, ‘ट्रेडर’ बनणे हा छंद आपल्याला कितपत परवडेल हे ज्याचे त्याने पाहावे. दुसरे म्हणजे जोखमीला समजून-उमजून संगणक अथवा मोबाइल फोनची कळ दाबण्यासाठी फिंगरटिप्स अर्थात बोटांचा वापर त्यांनी अतीव सावधतेने करावा.
ई-मेल: sachin.rohekar@expressindia.com