ज्या कंपन्या शेअर बाजारात सूचिबद्ध नाहीत किंवा ज्या खासगी कंपन्या आहेत, त्यांच्या समभागांच्या विक्रीवर होणाऱ्या नफ्यावर प्राप्तिकर कसा आकारला जातो. हे या लेखातून समजावून घेऊ.
आता खासगी कंपनी म्हणजे काय ते समजून घेऊ. खासगी कंपनी म्हणजे असा व्यवसाय जो भागधारकांच्या एका लहान गटाच्या मालकीचा असतो आणि ज्यांच्या समभागाची खरेदी-विक्री शेअर बाजारात होत नाही. तसेच त्यांचे समभाग सामान्य जनतेला विक्रीसाठी देत नाहीत. जे करदाते उद्योग-व्यवसाय करतात ते कंपनीच्या नावाने उद्योग-व्यवसाय करू शकतात. खासगी कंपन्यांद्वारे उद्योग-व्यवसाय करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. खासगी कंपन्यांमध्ये सामान्यतः तुलनेने भागधारक कमी संख्येने असतात. ज्यामध्ये स्वतः किंवा मित्र, नातेवाईकांकडून किंवा इतर खासगी गुंतवणूकदारांचा समावेश असू शकतो. खासगी कंपन्यांना, सूचिबद्ध कंपन्यांच्या तुलनेत कमी प्रमाणात अनुपालन करावे लागते.

शेअर बाजारात सूचिबद्ध असलेल्या बऱ्याच कंपन्यांचा प्रवास छोट्या खासगी कंपनीतून सुरू झालेला असतो. ज्यांनी कंपनी शेअर बाजारात सूचिबद्ध होण्यापूर्वी कंपनीमध्ये गुंतवणूक केली आहे, त्यांना अनेक पटींत लाभ झाले आहेत. यामध्ये जोखीमदेखील खूप जास्त आहे, तसेच यामध्ये परतावासुद्धा जास्त मिळू शकतो. असे समभाग बाजारात खरेदी करता किंवा विकता येत नाहीत. अशा खासगी कंपन्यांच्या समभागावर मिळालेल्या उत्पन्नावर कर आकारणी कशी होते? हे जाणून घेणे गरजेचे आहे.

लाभांशावर कर आकारणी :

खासगी कंपन्यांनी दिलेला लाभांश हा गुंतवणूकदाराला करपात्र आहे. समभागाच्या विक्रीवर होणारा नफा हा भांडवली नफा असतो. करदात्याला त्याच्या उत्पन्नाच्या टप्प्याप्रमाणे त्यावर कर भरावा लागतो. लाभांश १०,००० रुपयांपेक्षा जास्त असेल तर त्यावर उद्गम कर (टीडीएस) कापण्याची तरतूद आहे. गुंतवणूकदाराकडे पॅन नसेल तर त्यावर २० टक्के उद्गम कर कापला जातो.

भांडवली नफा कसा गणावा :

शेअर बाजारात सूचिबद्ध कंपन्यांच्या समभागाचे विक्रीदर हे कंपन्यांची कामगिरी, व्याजदर, मागणी, पुरवठा, इत्यादींवर अवलंबून असतात आणि त्याचा बाजारभाव सहज उपलब्ध असतो आणि हे सहज विकता येतात. खासगी कंपन्यांच्या समभागाची शेअर बाजारात खरेदी-विक्री होत नसल्यामुळे त्याचा बाजारभाव सहज उपलब्ध होत नाही. अशा समभागाची विक्री केल्यास त्यावर होणारा भांडवली नफा गणणे तितकेच अवघड होऊन जाते. भांडवली नफा गणण्यासाठी सूचिबद्ध नसलेल्या समभागाचे वाजवी बाजारमूल्य स्थापित करणे आवश्यक असते. जर या मूल्यापेक्षा कमी रकमेत समभागाचे हस्तांतरण झाले तर, भांडवली नफा गणताना वाजवी बाजारमूल्य हे विक्रीमूल्य म्हणून समजण्यात येते. समभागाचे प्रत्यक्ष हस्तांतरणमूल्य हे वाजवी बाजारमूल्यापेक्षा जास्त असेल तर प्रत्यक्ष विक्रीमूल्य हे भांडवली नफा गणताना विक्रीमूल्य म्हणून समजण्यात येते.

म्हणजेच, भांडवली नफा गणताना वाजवी बाजारमूल्य आणि प्रत्यक्ष हस्तांतरणमूल्य (यापैकी जे जास्त आहे ते) हे विक्रीमूल्य आणि प्रत्यक्ष खरेदीमूल्य यामधील जो फरक आहे, तो भांडवली नफा म्हणून समजण्यात येतो. यातून विक्रीसाठी झालेला खर्च (दलाली वगैरे) वजा करता येतो. जर समभाग २३ जुलै, २०२४ पूर्वी विकल्यास, दीर्घ मुदतीचा भांडवली नफा गणताना ‘इंडेक्सेशन’चा फायदासुद्धा करदात्याला घेता येतो. जर समभाग २३ जुलै, २०२४ किंवा त्यानंतर विकल्यास, दीर्घ मुदतीचा भांडवली नफा गणताना ‘इंडेक्सेशन’चा फायदा करदात्याला घेता येत नाही.

कर किती भरावा लागेल?

खासगी कंपन्यांचे समभाग ही प्राप्तिकर कायद्यानुसार भांडवली संपत्ती असल्यामुळे त्याची करपात्रता त्याच्या धारणकाळावर अवलंबून आहे. खासगी कंपन्यांचे समभाग खरेदी केल्या तारखेपासून २४ महिन्यांनंतर विकल्यास ती संपत्ती दीर्घ मुदतीची होते. त्यावर होणारा भांडवली नफा हा दीर्घ मुदतीचा होतो, अन्यथा अल्प मुदतीचा. असे समभाग २३ जुलै, २०२४ पूर्वी विकल्यास आणि करदात्याला दीर्घ मुदतीचा भांडवली नफा झाल्यास, तो ‘इंडेक्सेशन’चा फायदा घेऊन त्यावर २० टक्के (अधिक ४ टक्के शैक्षणिक आणि आरोग्य कर) इतका कर भरू शकतो. जर समभाग २३ जुलै, २०२४ किंवा त्यानंतर विकल्यास, दीर्घ मुदतीचा भांडवली नफा गणताना महागाई निर्देशांकाचा फायदा न घेता करदात्याला त्यावर १२.५० टक्के (अधिक ४ टक्के शैक्षणिक आणि आरोग्य कर) इतका कर भरावा लागतो. शेअर बाजारात सूचिबद्ध कंपन्यांचे समभाग विकल्यास, त्यावर होणाऱ्या १,२५,००० रुपयांच्या भांडवली नफ्यावर (कलम ११२ ए नुसार) कर भरावा लागत नाही. ही तरतूद खासगी कंपन्यांच्या समभागाच्या विक्रीवर होणाऱ्या भांडवली नफ्यासाठी लागू नाही. करदात्याला अल्प मुदतीच्या भांडवली नफ्यावर करदात्याच्या उत्पन्नाच्या टप्प्याप्रमाणे कर भरावा लागतो. खासग

तोट्याच्या तरतुदी

करदात्याला अशा समभागाच्या विक्रीवर दीर्घ मुदतीचा तोटा झाल्यास तो इतर दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यातून वजा करता येतो आणि तो पूर्णपणे वजा होत नसेल तर पुढील ८ वर्षांसाठी ‘कॅरी-फॉरवर्ड’ करता येतो. मात्र तो पुढील वर्षी फक्त दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यातूनच वजा करता येतो. करदात्याला अल्प मुदतीचा तोटा झाल्यास तो इतर अल्प किंवा दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यातून वजा करता येतो. तो पूर्णपणे वजा होत नसेल तर पुढील ८ वर्षांसाठी ‘कॅरी-फॉरवर्ड’ करता येतो आणि पुढील वर्षी अल्प किंवा दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यातूनच वजा करता येतो. असा अल्प किंवा दीर्घ मुदतीचा भांडवली तोटा पुढील वर्षांसाठी ‘कॅरी-फॉरवर्ड’ करावयाचा असल्यास विवरणपत्र वेळेत दाखल करणे बंधनकारक आहे.

विवरणपत्रात अतिरिक्त माहिती

करदात्याने खासगी कंपन्यांच्या समभागामध्ये गुंतवणूक केली असेल तर त्यांनी काही विशेष बाबींकडे लक्ष दिले पाहिजे. करदात्याला जर लाभांश मिळाला असेल किंवा भांडवली नफा झाला असेल तर ते उत्पन्न किंवा तोटा, या योग्य सदरात दाखवावा. शिवाय अशा खासगी कंपन्यांच्या समभागाची माहिती करदात्याला आपल्या विवरणपत्रात दर्शवावी लागते. यामध्ये कंपनीचे नाव, कंपनीचा प्रकार (भारतीय किंवा परदेशी), कंपनीचे पॅन, समभागाची संख्या, सुरुवातीची शिल्लक, खरेदीमूल्य, या वर्षात खरेदी केलेले समभाग, हस्तांतरित केलेले समभाग, शिल्लक समभाग, इत्यादी माहितीचा समावेश आहे. करदात्याकडे खासगी कंपन्यांचे समभाग असतील तर त्याला फॉर्म २ किंवा ३ मध्ये विवरणपत्र दाखल करावे लागेल.

– प्रवीण देशपांडे

pravindeshpande1966@gmail.com