वृत्तसंस्था, नवी दिल्ली

मनोरंजन क्षेत्रातील झी आणि सोनी यांच्यात प्रस्तावित १० अब्ज डॉलरच्या विलीनीकरणासाठी आम्ही वचनबद्ध आहोत आणि प्रस्तावित विलीनीकरण यशस्वीपणे पूर्ण करण्याच्या दिशेने आम्ही पावले टाकत आहोत, असे झी एंटरटेनमेंट लिमिटेडने मंगळवारी स्पष्ट केले.

झी आणि सोनी यांच्यात प्रस्तावित विलीनीकरण पूर्णत्वाकडे जाणार नसल्याचे वृत्त निराधार आणि वस्तुस्थितीला धरून नसल्याचे झी एंटरटेनमेंट लिमिटेडने मंगळवारी प्रमुख बाजारमंचांना खुलासेवजा निवेदनाद्वारे सूचित केले. सोनीकडून मात्र यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया पुढे आलेली नाही. बराच काळ रखडलेल्या या एकत्रीकरणाच्या कराराला दोन्ही पक्षांकडून एक महिन्याचा वाढीव मुदत कालावधी देण्यात आला होता. २०२१ मधील मूळ करारानुसार हे विलीनीकरण २२ डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्णत्वास येणे आवश्यक होते, पण त्याला आणखी एका महिन्याच्या मुदतवाढीचा उभयतांनी निर्णय घेतला.

हेही वाचा >>>Mantra : घरभाडे भत्ता करमुक्त करुन घेता येतो का?

एंटरटेनमेंट एंटरप्रायझेस लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पुनीत गोएंका यांच्याकडे विलीनीकृत संस्थेचे नेतृत्व सोपवण्याचा मुद्दा वादाचे कारण बनला असून, उभयतांमध्ये त्या संबंधाने अद्याप सहमती होऊ शकलेली नसल्याचे बोलले जात आहे. विलीन झालेल्या संस्थेचे नेतृत्व कोण करणार यावरून उद्भवलेला तिढा आणि मतभेद निर्धारित वाढीव वेळेत सुटले तरच विलीनीकरणाचा मार्ग लवकर मोकळा होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा >>>‘पीएफसी’ला जागतिक प्रांगण खुले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

समभागाची घसरगुंडी

झी आणि सोनी यांच्यात प्रस्तावित विलीनीकरण फिस्कटल्याच्या वृत्ताचे झी एंटरटेनमेंटच्या समभागावर प्रतिकूल परिणाम उमटले. मंगळवारच्या सत्रात झीचा समभाग मुंबई शेअर बाजारात ७.६४ टक्क्यांच्या म्हणजेच २१.२० रुपयांच्या घसरणीसह २५६.२५ रुपयांवर स्थिरावला.