PhysicsWallah Of Alakh Pandey Files For IPO: एडटेक क्षेत्रातील युनिकॉर्न कंपनी फिजिक्सवालाने विस्तार आणि नव्या उपक्रमांसाठी आयपीओ द्वारे ३,८२० कोटी रुपये उभारण्यासाठी सेबीकडे अद्ययावत कागदपत्रे दाखल केली आहेत. काल दाखल केलेल्या कागदपत्रांमध्ये प्रस्तावित ३,१०० कोटी रुपयांच्या इक्विटी शेअर्सचा नवीन आयपीओ इश्यू आणि प्रमोटर्सकडून ७२० कोटी रुपयांपर्यंतच्या ऑफर फॉर सेल शेअर्सचा समावेश आहे. त्यामुळे आता लवकरच फिजिक्सवाला शेअर बाजारात पदार्पण करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

अलख पांडे आणि प्रतीक बूब हे दोन्ही प्रमुख प्रमोटर्स, ऑफर फॉर सेलद्वारे प्रत्येकी ३६० कोटी रुपयांचे शेअर्स ऑफलोड करतील. सध्या, दोघांकडेही कंपनीचा प्रत्येकी ४०.३५ टक्के हिस्सा आहे.

नोएडा येथील फिजिक्सवाला कंपनीने मार्चमध्ये गोपनीय प्री-फायलिंग मार्गाने आयपीओसाठी सेबीकडे ड्राफ्ट पेपर्स दाखल केले आणि जुलैमध्ये त्यांना सेबीची मंजुरी मिळाली होती. पुढील टप्प्यापर्यंत आयपीओ तपशीलांची सार्वजनिक माहिती गोपनीय ठेवता यावी यासाठी कंपनीने गोपनीय प्री-फायलिंग मार्ग निवडला होता.

नवीन इश्यूमधून मिळणाऱ्या रकमेपैकी ४६०.५ कोटी रुपये नवीन ऑफलाइन आणि हायब्रिड कोचिंक सेंटर्सच्या विकासासाठी वापरण्यात येणार आहेत. तर, ५४८.३ कोटी रुपये सध्या कंपनीकडे असलेल्या कोचिंग सेंटर्सची भाडी देण्यासाठी वापरली जाणार असल्याचे फिजिक्सवाला कंपनीने सांगितले आहे.

याचबरोबर कंपनी त्यांची उपकंपनी झायलेम लर्निंगमध्ये ४७.२ कोटी रुपये गुंतवणार आहे. ज्यामध्ये नवीन सेंटर्ससाठी ३१.६ कोटी रुपये आणि वसतिगृहांची भाडी देण्यासाठी १५.५ कोटी रुपये वापरेल.

कंपनी उत्कर्ष क्लासेस आणि एज्युटेक यांना त्यांच्या सेंटर्सच्या भाडेपट्ट्यासाठी आणखी ३३.७ कोटी रुपये देणार आहेत. याव्यतिरिक्त, सर्व्हर आणि क्लाउड सुविधांसाठी २००.१ कोटी रुपये, मार्केटिंग उपक्रमांसाठी ७१० कोटी रुपये आणि उत्कर्ष क्लासेसमध्ये अतिरिक्त हिस्सा खरेदी करण्यासाठी २६.५ कोटी रुपये राखीव ठेवण्यात आले आहेत.

फिजिक्सवाला ही कंपनी जेईई, नीट, गेट आणि यूपीएससी यांसारख्या स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करणारे कोर्सेस तसेच कौशल्यवृद्धीचे शिक्षण देते. हे सर्व कोर्सेस ऑनलाइन प्लॅटफॉर्म्स जसे की, यूट्युब, वेबसाइट आणि अ‍ॅप्सबरोबर ऑफलाइन सेंटर्सवरही चालवले जातात.