Raj Kundra Has Illegal Bitcoin Worth Rs. 150 Cr, Claims ED: अंमलबजावणी संचालनालयाने उद्योगपती राज कुंद्रा यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात राज कुंद्रा यांनी १५०.४७ कोटी रुपये किमतीचे २८५ बिटकॉइन बेकायदेशीरपणे बाळगल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. अंमलबजावणी संचालनालयाच्या मते, राज कुंद्रा यांना हे बिटकॉइन गेनबिटकॉइनचे संस्थापक आणि क्रिप्टो घोटाळ्याचा सूत्रधार दिवंगत अमित भारद्वाज याच्याकडून मिळाले होते.
महाराष्ट्र आणि दिल्ली पोलिसांनी व्हेरिअबल टेक प्रायव्हेट लिमिटेड आणि अमित भारद्वाज, अजय भारद्वाज, विवेक भारद्वाज, सिम्पी भारद्वाज आणि महेंद्र भारद्वाज यांच्यासह अनेक व्यक्तींविरुद्ध दाखल केलेल्या एफआयआरमधून हे प्रकरण समोर आले आहे. या सर्वांवर बिटकॉइन मायनिंगद्वारे मोठ्या परताव्याचे आश्वासन देऊन गुंतवणूकदारांना फसवण्याचा आणि गुप्त ऑनलाइन वॉलेटमध्ये बिटकॉइन लपवण्याचा आरोप आहे.
अंमलबजावणी संचालनालयाने म्हटले आहे की, राज कुंद्रा यांनी युक्रेनमध्ये बिटकॉइन मायनिंग फार्म उभारण्यासाठी अमित भारद्वाजकडून बिटकॉइन घेतले होते. गुंतवणूकदारांना उच्च परताव्याचे आश्वासन देण्यात आले होते. पण, हा प्रकल्प सुरू न करता राज कुंद्रा यांनी क्रिप्टोकरन्सी आपल्याकडे ठेवल्याचा आरोप आहे.
आरोपपत्रात असे नमूद केले आहे की, केवळ मध्यस्थ म्हणून काम करण्याचा राज कुंद्रा यांचा बचाव अयोग्य होता कारण करार थेट राज कुंद्रा आणि भारद्वाज कुटुंबामध्ये झाला होता.
“हा करार प्रत्यक्षात राज कुंद्रा आणि अमित भारद्वाज व त्याचे वडील महेंद्र भारद्वाज यांच्यात झाला होता. त्यामुळे आणि राज कुंद्रा यांनी केवळ मध्यस्थ म्हणून काम केल्याचा युक्तिवाद योग्य नाही”, असे आरोपपत्रात म्हटले आहे.
अंमलबजावणी संचालनालयाने असे निदर्शनास आणून दिले की, राज कुंद्रा यांना सात वर्षांनंतरही पाच वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये मिळालेल्या बिटकॉइनची अचूक संख्या माहिती होती. याचा अर्थ असा की, ते केवळ मध्यस्थ नसून खरे लाभार्थी आहेत.
२०१८ पासून राज कुंद्रा, बिटकॉइन ज्या वॉलेटमध्ये हस्तांतरित केले होते त्याची माहिती देण्यात अयशस्वी ठरले आहेत, असाही आरोप अंमलबजावणी संचालनालयाने केला आहे.
“२८५ बिटकॉइन अमित भारद्वाजने त्यांना नव्हे तर टॉमला हस्तांतरित केल्याचा त्यांचा दावा सिद्ध करण्यासाठी कागदोपत्री पुरावे देण्यास सांगितले असता, राज कुंद्रा यांनी या संदर्भात कोणताही कागदोपत्री पुरावा दिला नाही”, असेही आरोपपत्रात म्हटले आहे.