Share Market News Updates: मुंबई शेअर बाजारात आज तेजी पाहायला मिळत आहे. बाजार उघडताच सेन्सेक्समध्ये १,०२२ अंशाची वाढ होऊन बाजार ८१,६१९ वर उघडला. तर एनएसई निफ्टीमध्ये ३१९ अंशाची वाढ होऊ २४,९५१ वर पोहोचला. शुक्रवारी, स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने लाल किल्ल्यावरून भाषण करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) रचनेत सुधार करण्याचे संकेत दिले होते. या घोषणेचे सकारात्मक परिणाम आज बाजारावर दिसून येत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीएसटीत सुधार करण्याची घोषणा केल्यानंतर आज ऑटोमोबाइल आणि ग्राहकोपयोगी वस्तूंच्या समभागांमध्ये सर्वाधिक वाढ झालेली पाहायला मिळाली. सूत्रांच्या माहितीनुसार, केंद्र सरकार सध्याचे १२ टक्के आणि २८ टक्के हे दोन जीएसटीचे स्लॅब रद्द करण्याचा विचार करत आहे. यापुढे बहुतेक वस्तूंना ५ आणि १८ टक्क्यांच्या श्रेणीत समाविष्ट केले जाणार आहे.
निफ्टी५० मध्ये सर्वाधिक वाढ झालेल्या कंपन्यांमध्ये हिरो मोटोकॉर्प, मारुती सुझुकी, बजाज फायनान्स, बजाज ऑटो आणि एम अँड एम यांचा समावेश आहे. एचसीएल टेक, आयटीसी, एल अँड टी, सन फार्मा आणि डॉ. रेड्डीज या कंपन्या मात्र लाल रंगात दिसत आहेत.
ईटीने दिलेल्या बातमीनुसार, बीएसईवर सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांचे भांडवल ५.९३ लाखांनी वाढले असून ते ४५१.७० लाख कोटींवर पोहोचले आहे.
शेअर बाजारात तेजी येण्याचे कारण काय?
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घोषणेसह इतरही काही बाबींचा बाजारावर सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. जसे की, एस अँड पी ग्लोबल १८ वर्षांनंतर भारताचे दीर्घकालीन सॉवरेन क्रेडिट रेटिंग ‘बीबीबी-‘ वरून ‘बीबीबी’ पर्यंत वाढवले आहे.
जीएसटी स्लॅबमध्ये सुधारणा
केंद्र सरकारने १२ आणि २८ टक्के असे दोन ‘जीएसटी’चे स्लॅब रद्द करण्याचे सुतोवाच केले आहे. नव्या रचनेनुसार, दैनंदिन वापरातील वस्तू आणि सेवांवर केवळ पाच आणि १८ टक्क्यांपर्यंतच करआकारणी करण्यात येण्याची शक्यता आहे. तर २८ टक्के स्लॅबमधील वस्तू ४० टक्क्यांच्या स्लॅबमध्ये हलवल्या जातील.
डोनाल्ड ट्रम्प-पुतिन यांची चर्चा
शुक्रवारी अलास्का येथे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्यात झालेल्या बैठकीनंतर अमेरिकेचा रशियाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलू शकतो, असे संकेत मिळत आहेत. तसेच ट्रम्प आज युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचीही भेट घेणार आहेत. युक्रेन-रशिया यांच्यात दोन वर्षांपासून चाललेला लष्करी तणाव कमी करण्याचा प्रयत्न ट्रम्प यांच्याकडून होताना दिसत आहे. त्याचेही चांगले पडसाद जगभरातील बाजारावर पडताना दिसत आहे.