मुंबई: ग्राहकोपयोगी उत्पादन क्षेत्रातील दिग्गज कंपनी ‘प्रॉक्टर अँड गॅम्बल’ने (पी अँड जी) शैलेश जेजुरीकर यांची कंपनीचे आगामी जागतिक अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती मंगळवारी घोषित केली. त्यामुळे ते आता सुंदर पिचाई, सत्या नाडेला, शंतनू नारायण, अरविंद कृष्णा, नील मोहन आणि लीना नायर यांसारख्या अमेरिकेतील भारतीय वंशाच्या मुख्याधिकाऱ्यांच्या श्रेणीत सामील झाले आहेत.
पी अँड जीचे विद्यमान मुख्याधिकारी जॉन मोलर यांनी कंपनीत चार वर्षे काम केल्यानंतर अकस्मात राजीनामा दिला. २०२१ पासून अध्यक्षपदावर असलेले मोलर हे आता कार्यकारी अध्यक्ष होतील आणि व्यावसायिक बाबींवर मुख्याधिकाऱ्यांना सल्ला देतील, असे पी अँड जीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. मात्र कंपनीने नेतृत्वातील बदलाचे कारण उघड केले नाही. जेजुरीकर आयआयएम लखनऊमधून पदवी घेतल्यानंतर लगेचच पी अँड जीमध्ये रुजू झाले होते.
त्यांनी हैदराबाद पब्लिक स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केले. तेथे ते एक सक्रिय क्रिकेट खेळाडू आणि नाडेला यांचे वर्गमित्र होते. ते दोघे आजही चांगले मित्र आहेत. जेजुरीकर यांनी १७ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धांमध्ये हैदराबादचे प्रतिनिधित्व देखील केले. नंतर त्यांनी मुंबईतील एल्फिन्स्टन महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण केले. पुढे त्यांनी लखनऊमधून व्यवसाय प्रशासन व्यवस्थापनांतून पदव्युत्तर पदवी मिळविली. शैलेश यांनी पी अँड जीमधील विविध विभागांमध्ये काम केले आहे. आजवर त्यांनी भारत, केनिया, सिंगापूर आणि अमेरिकेमध्ये कंपनीचे नेतृत्व केले आहे.