Mumbai-Pune Expressway Speed Limit Fine: मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टमने जुलै २०२४ पासून ४७० कोटी रुपयांचे २७.७६ लाख ई-चलान जारी केले आहेत, परंतु आतापर्यंत फक्त ५१ कोटी रुपये दंड वसूल झाला आहे, असे महाराष्ट्र मोटार वाहन विभागाच्या आकडेवारीवरून दिसून आले आहे. याबाबत पीटीआयने वृत्त दिले आहे.

९५ किमी लांबीच्या या एक्सप्रेसवेवर वाहतूक नियमांचे पालन व्हावे यासाठी आणि अपघात कमी करण्यासाठी एआय-चालित कॅमेरे आणि डिटेक्शन टूल्स असलेली ही प्रणाली सुरू करण्यात आली होती. पण दंडाच्या ओघामुळे, विशेषतः जास्त वेगाने गाडी चालवणाऱ्या वाहनधारकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे, असे पीटीआयने वृत्त दिले आहे.

नियम उल्लंघनांमध्ये कार आघाडीवर

याबाबतची आकडेवारी असे दर्शविते की, १७.२० लाख ई-चलान कारचे कापले असून यामध्ये वेगमर्यादेच्या उल्लंघनासाठी सर्वात जास्त दंड ठोठावण्यात आले आहेत.

ही प्रणाली कशी कार्य करते

आयटीएमएस प्रोटेक सोल्युशन्स आयटीएमएस एलएलपीद्वारे चालवले जाते, जे प्रति चलन (जीएसटीसह) ६५४.९० रुपये कमवते. जुलै ते डिसेंबर २०२४ दरम्यान जारी केलेल्या ८.८४ लाख ई-चलनांसाठी ऑपरेटरला आधीच ५७.९४ कोटी रुपये देण्यात आले आहेत.

या प्रणालीमध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे:

  • ४० गॅन्ट्री आणि शेकडो सीसीटीव्ही कॅमेरे
  • स्पीड डिटेक्शन कॅमेरे
  • ऑटोमॅटिक नंबर प्लेट रेकग्निशन
  • वेट-इन-मोशन सेन्सर्स
  • वाहन वर्गीकरण प्रणाली
  • हवामान सेन्सर्स आणि डायनॅमिक मेसेजिंग सिस्टम
  • सेंट्रल कमांड अँड कंट्रोल सेंटर

आरटीओ अधिकाऱ्यांनी मंजुरी देण्यापूर्वी ऑपरेटरच्या कर्मचाऱ्यांद्वारे वाहतूक उल्लंघन अहवाल तयार केला जातो आणि त्याची पडताळणी केली जाते.

खंडाळा घाटातील वेगमर्यादेवरून वाद

खंडाळा घाट विभागात सर्वाधिक वेगमर्यादा दंड आकारण्यात आला आहे, जिथे कारसाठी वेगमर्यादा ताशी ६० किमी आणि जड वाहनांसाठी ४० किमी आहे. एक्सप्रेसवेच्या इतर भागांमध्ये, लहान वाहनांसाठी ही मर्यादा १०० किमी आणि जड वाहनांसाठी ८० किमी आहे.

वाहतूकदारांचा असा युक्तिवाद आहे की, घाटात सध्याची मर्यादा खूपच कमी आहे, विशेषतः लोणावळा आणि खालापूर दरम्यानच्या १० किमीच्या उतारावर, ज्यामुळे जड वाहनांना नियंत्रण राखणे कठीण होते.

पुणे-मुंबई मार्गावर घाटात जड वाहनांसाठी मर्यादा ४५-५० किमी प्रतितासपर्यंत वाढवण्याचा विचार राज्य करत आहे.