TCS Salary Hikes Announced: भारतातील सर्वात मोठी आयटी कंपनी असलेल्या टीसीएसने काही दिवसांपूर्वी जगभरातील एकून मनुष्यबळाच्या २ टक्के कर्मचारी कपातीचे संकेत दिले होते. या संकेतानुसार तब्बल १२ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले जाणार असल्याचे सांगण्यात आले होते. तसेच पगारवाढही रोखल्याची बातमी समोर आली होती. मात्र आता पगारवाढीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. टीसीएसकडून ८० टक्के कर्मचाऱ्यांचा पगार वाढवला जाणार आहे.
कंपनीतील कनिष्ठ आणि मध्यम स्तरात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार वाढवला जाणार आहे. नोकरकपातीच्या घोषणेनंतर पगारवाढीचे संकेत दिल्यामुळे टीसीएसच्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
कंपनीकडून कर्मचाऱ्यांना याबाबत माहिती देण्यात आली असल्याचे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे. सदरची पगारवाढ १ सप्टेंबर २०२५ पासून लागू करण्यात येणार आहे, अशी माहिती टीसीएसचे सीएचआरओ मिलिंद लक्कड आणि के. सुदीप यांनी दिली आहे. दरम्यान किती टक्के पगारवाढ होईल, याबाबत कोणतीही निश्चित अशी माहिती बाहेर आलेली नाही. मात्र कंपनीच्या वरिष्ठ एचआर अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.
“समर्पित वृत्तीने कामात झोकून देणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याचे आम्ही आभारी आहोत. आपण सगळे एकत्र टीसीएसचे भविष्य उज्ज्वल करूयात”, असा ईमेल एचआरने पाठविल्याची माहिती पीटीआयने दिली आहे.
पगारवाढ केली तरी नोकरकपात अटळ
दरम्यान टीसीएसने पगारवाढीची घोषणा केली असली तरी नोकरकपात अटळ असल्याचेही सांगण्यात येत आहे. टीसीएसच्या नोकरकपातीच्या घोषणेमुळे आयटी क्षेत्रात वेगाने होत असलेल्या बदलांची चर्चा होत आहे. जागतिक आर्थिक अनिश्चितता, अमेरिकेच्या टॅरिफ धोरणाचा आऊटसोर्सिंगवर झालेला परिणाम आणि कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे आलेले अडथळे, अशा आव्हानांचा सामना सध्या आयटी क्षेत्र करत आहे.
नोकरकपातीबद्दल माहिती देताना टीसीएसने भविष्यातील आव्हानांची पूर्वतयारी म्हणून हे पाऊल उचलल्याचे सांगितले होते. भविष्यात कंपनी तांत्रिक गुंतवणूक, कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे काम करणे, बाजारातील नव्या संधी आणि कर्मचाऱ्यांच्या कामात पुनर्रचना करण्यासाठी हे पाऊल उचलल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले होते.