TCS Pune layoffs 2025: भारतातील आघाडीची माहिती तंत्रज्ञान कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने (TCS) काही दिवसांपूर्वी जगभरातील मनुष्यबळापैकी दोन टक्के अर्थात १२,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कमी करण्याचा निर्णय घेतला होता. कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर आणि भविष्यातील आव्हानांचा सामना करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात येत आहे, असा दावा कंपनीकडून करण्यात आला होता. नोकरकपातीची कुऱ्हाड पुण्यावर कोसळल्याचे सांगितले जात आहे.
ईटेकने दिलेल्या वृत्तानुसार, आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ‘नॅसेंट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एम्प्लॉईज सिनेट’ (NITES) या संघटनेने आरोप केला आहे की, टीसीएसने सुमारे २,५०० कर्मचाऱ्यांना राजीनामा देण्यास भाग पाडले आहे. याबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संघटनेकडून पत्रही देण्यात आले आहे.
टीसीएसने आरोप फेटाळला
तथापि, टीसीएसने हा आरोप फेटाळून लावला आहे. तसेच हे आरोप बिनबुडाचे असल्याचे म्हटले आहे. कंपनीने म्हटले की, कौशल्यांचे पुर्नरचना करण्याच्या अलीकडच्या उपक्रमामुळे काही कर्मचाऱ्यांवर परिणाम झाला आहे. NITESचे अध्यक्ष हरप्रीत सिंग सलुजा यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले की, बाधित कर्मचाऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी यात तात्काळ हस्तक्षेप करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
हरप्रीत सिंग सलुजा पुढे म्हणाले, केंद्रीय कामगार मंत्रालयाने महाराष्ट्राच्या कामगार सचिवांना या प्रकरणात आवश्यक ती कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. पण या निर्देशानंतरही यात काहीच बदल झाला नाही. एकट्या पुण्यात गेल्या काही दिवसांत २५०० कर्मचाऱ्यांना राजीनामा देण्यास भाग पाडले गेले आहे किंवा त्यांना अचानक कामावरून काढून टाकण्यात आले आहे.
NITES संघटनेने पुढे म्हटले की, काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांचा आकडा गंभीर असा आहे. कारण त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबाची संख्या गृहित धरली तर हा आकडा कितीतरी मोठा होतो. या पत्रात पुढे नमूद केल्याप्रमाणे, “बाधित कर्मचाऱ्यांपैकी बरेच जण मध्यम ते वरिष्ठ पातळीवरील कर्मचारी आहेत. ज्यांनी कंपनीसाठी आपल्या आयुष्यातील १० ते २० वर्षांचा काळ दिला. यापैकी अनेक कर्मचाऱ्यांचे वय ४० हून अधिक आहे. त्यांच्या डोक्यावर ईएमआय, मुलांचे शिक्षण, वैद्यकीय खर्च आणि घरातील वृद्ध पालकांची जबाबदारी आहे. आजच्या स्पर्धात्मक बाजारपेठेत त्यांना नवीन नोकरी शोधणे आव्हानात्मक आहे.”
कोणत्या कर्मचाऱ्यांना फटका बसला?
मनीकंट्रोलच्या वृत्तानुसार, कंपनीने कौशल्य पुर्नरचना केल्यामुळे ज्यांची कौशल्ये अनावश्यक झाली आहेत किंवा ज्यांनी बदलत्या क्लाईंटच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी स्वतःला प्रशिक्षित केलेले नाही, त्यांच्यावर कपातीची कुऱ्हाड कोसळली आहे. याव्यतिरिक्त ज्या कर्मचाऱ्यांकडे कोणताही प्रकल्प नाही किंवा आठ महिन्यांपेक्षा जास्त काळ ते बेंचवर आहेत. त्यांच्यावरदेखील याचा परिणाम होईल.