Tesla : जगातील अब्जाधीशांच्या यादीत समाविष्ट असलेले टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क हे कोणत्या न कोणत्या कारणांनी चर्चेत असतात. खरं तर मस्क यांच्या टेस्ला कंपनीच्या आलिशान कारच्या चर्चा जगात पाहायला मिळतात. टेस्लाने जेव्हा बहुचर्चित सायबरट्रक लॉन्च केला होता, तेव्हाही त्यांच्या सायबरट्रकची चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं होतं. आता याच टेस्लाच्या सायबरट्रक प्रोग्राम प्रमुखांबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे.
टेस्लाच्या सायबरट्रक प्रोग्राम प्रमुख सिद्धांत अवस्थी यांनी टेस्ला कंपनी सोडली असल्याची माहिती समोर आली आहे. सिद्धांत अवस्थी यांनी जवळपास आठ वर्षांहून अधिक काळ टेस्लामध्ये काम केलं आहे. त्यांनी टेस्लामध्ये त्यांच्या कामाची सुरूवात इंटर्न म्हणून केली होती, त्यानंतर ते टेस्लाच्या सायबरट्रक प्रोग्रामच्या प्रमुखपदापर्यंत पोहोचले होते. मात्र, यानंतर सिद्धांत अवस्थी यांनी रविवारी रात्री आपण टेस्ला सोडत असल्याची घोषणा केली आहे. संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
सिद्धांत अवस्थी यांनी त्यांच्या लिंक्डइन पोस्टमध्ये म्हटलं की, “आठ वर्षांपूर्वी जेव्हा मी इंटर्न म्हणून कामाला सुरुवात केली, तेव्हा मला कधीच कल्पना नव्हती, की मी एक दिवस सायबरट्रक सारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचं नेतृत्व करेन आणि आता ते सोडणं हा माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण निर्णय आहे.”
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वरील राजीनामा जाहीर करताना सिद्धांत अवस्थी यांनी म्हटलं की, “टेस्लामधील माझ्या उत्कृष्ट कामगिरीनंतर, मी अलीकडेच कंपनी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. जो माझ्या आयुष्यातील आतापर्यंतच्या सर्वात कठीण निर्णयांपैकी एक होता. एलोन मस्क आणि सर्व टेस्लामधील सहकाऱ्यांचे आणि ग्राहकांचे आभार मानतो”, असंही सिद्धांत अवस्थी यांनी म्हटलं.
