मुंबई: अमेरिकेने भारतावर लादलेल्या ५० टक्के आयात कराने स्थानिक शेअर बाजारात गुंतवणूकदारांच्या भावनांना प्रचंड धक्का पोहचविला असून, सलग दुसऱ्या सत्रात सुरू राहिलेल्या विक्रीच्या माऱ्याने सेन्सेक्स गुरुवारी ७०६ अंशांनी कोसळला.

रशियाच्या तेल खरेदीसाठी शिक्षा म्हणून भारतावर लादलेला अतिरिक्त २५ टक्के कर बुधवारपासून लागू झाला. त्या संबंधी मंगळवारी निघालेल्या अधिसूचनेच्या वृत्तानेही बाजारात उत्पात घडविला आणि त्या दिवसांत सेन्सेक्स ८४९.३७ अंशांनी गडगडला होता. गणेश चतुर्थीनिमित्त सुटीमुळे बुधवारी बाजारात व्यवहार झाले नाहीत. परंतु गुरुवारीही ट्रम्प आयात शुल्काचा धसका गुंतवणूकदारांवर कायम दिसला आणि दोन सत्रांत मिळून सेन्सेक्स तब्बल १,५५५ अंशांची धुपल्याचे दिसून आले.

समभाग विकून बाजारातून गुंतवणूक काढून घेण्याची परदेशी गुंतवणूकदारांमध्ये दिसून आलेल्या घाईनेही स्थानिक बाजारातील भावनांना झळ पोहचविली आहे. गुरुवारी दिवसअखेर बीएसई सेन्सेक्स ७०५.९७ अंशांनी (०.८७ टक्के) घसरून ८०,०८०.५७ वर स्थिरावला. दिवसभरात त्याची घसरण ७७३.५२ अंशांच्या नीचांकापर्यंत विस्तारली होती. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक २११.१५ अंशांच्या (०.८५ टक्के) नुकसानीसह २४,५००.९० वर बंद झाला.

सेन्सेक्समधील एचसीएल टेक, इन्फोसिस, पॉवर ग्रिड, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, एचडीएफसी बँक, हिंदुस्तान युनिलिव्हर, भारती एअरटेल आणि आयसीआयसीआय बँक हे प्रमुख घसरणीत राहिलेले समभाग होते. त्या उलट टायटन, लार्सन अँड टुब्रो, मारुती आणि अॅक्सिस बँक हे वधारलेल्या समभागांमध्ये होते.

अमेरिकेने जगातील सर्वाधिक कर लागू असलेल्या देशांच्या सूचीत भारताला ठेवल्याने, गुंतवणूकदारांमध्ये निराशावाद वाढल्याने, त्याचे सेन्सेक्स-निफ्टीतील घसरणीत ठळक प्रतिबिंब उमटले आहे. एकीकडे भारत-अमेरिकेदरम्यान व्यापार कराराबाबत कोणतेही सकारात्मक वृत्त नाही आणि या कर परिणामांना तोंड देण्यासाठी केंद्र सरकारकडून धोरणात्मक समर्थनाची आशाही मावळली असल्याने बाजारातील गुंतवणुकीच्या भावना प्रचंड मंदावल्या आहेत, असे जिओजित इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडचे संशोधन प्रमुख विनोद नायर म्हणाले.

अमेरिकेत ५० टक्के कर लागू झालेल्या कापड निर्यातदारांना दिलासा देण्यासाठी सरकारने गुरुवारी कापसाच्या करमुक्त आयातीला आणखी तीन महिने वाढवून ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली. तथापि ही गोष्ट गुंतवणूकदारांमध्ये आशा जागवू शकली नाही. स्थानिक बाजारात लार्जकॅप शेअर्स मोठ्या प्रमाणात आपटलेच. बरोबरीने जोखीम सुरक्षिततेच्या भावनेने आणि नफावसुली म्हणून मिड-कॅप आणि स्मॉलकॅप शेअर्सनाही विक्रीचा जबर फटका बसल्याचे दिसून आले.

आकडे-

सेन्सेक्स – ८०,०८०.५७ घसरण ७०५.९७ (०.८७ टक्के)

निफ्टी – २४,५००.९० घसरण २११.१५ (०.८५ टक्के)

ब्रेंट क्रूड – ६७.६३ घसरण ०.६२ टक्के

डॉलर – ८७.६३ घसरण ६ पैसे