We need To Create 40 Adanis-Ambanis, Says Niranjan Hiranandani: रिअल इस्टेट उद्योगपती निरंजन हिरानंदानी यांनी झोपडपट्ट्या हटवून सर्वांना घरे आणि पायाभूत सुविधा पुरवण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या गृहनिर्माण क्षेत्राच्या दृष्टिकोनाचे कौतुक केले आहे. एएनआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत, त्यांनी उद्योगपती गौतम अदाणी आणि मुकेश अंबानी यांचेही कौतुक केले आणि म्हटले की, आपल्याला ४० अदानी आणि अंबानी निर्माण करण्याची गरज आहे.
एएनआयच्या मुलाखतीमध्ये स्मिता प्रकाश यांनी धारावी पुनर्विकास प्रकल्पावर होत असलेल्या टीकेबद्दल विचारले असता, निरंजन हिरानंदानी यांनी उद्योगपती गौतम अदाणींना पाठिंबा दिला आणि ते म्हणाले की भारताला अशा संपत्ती निर्माण करणाऱ्यांची गरज आहे.
निरंजन हिरानंदानी म्हणाले की, “आपल्याला ४० अदाणी निर्माण करण्याची गरज आहे. आपल्याकडे फक्त एक अदानी आणि एक अंबानी आहेत. जर ४० अदाणी-अंबानी निर्माण झाले तर आपला देश सुधारेल आणि त्यांच्यात अधिक स्पर्धा होईल. दोघेही चांगले व्यक्ती आहेत आणि चांगले काम करत आहेत.”
“ते सर्वांना रोजगार देतात. अति-यशस्वी लोकांविषयी नेहमीच द्वेष व्यक्त केला जातो. ते सत्ताकेंद्रांच्या जवळ आहेत म्हणून ते श्रीमंत झाले आहेत, असे म्हटले जाते. पण, आज ते जे आहेत ते होण्यासाठी किती काम करावे लागते हे टीका करणाऱ्यांच्या लक्षात येत नाही”, असेही निरंजन हिरानंदानी यांनी म्हटले.
या मुलाखतीत, निरंजन हिरानंदानी म्हणाले की, मुंबईला झोपडपट्टीमुक्त करून सर्वांसाठी घरे उपलब्ध करून देणे साध्य होण्यासारखे आहे. ते म्हणाले, “माझे मत असे आहे की, सर्वांसाठी घरे हे उद्दिष्ट आपण साध्य करू शकतो. देशात पैशाची कमतरता नाही. आपण मुंबईला झोपडपट्टीमुक्त करू शकतो. देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत की, सात ते आठ वर्षांत मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या निम्म्या लोकांना झोपडपट्टीमुक्त करू शकतो.”
मुंबईतील पायाभूत सुविधांवरील सरकार करत असलेल्या खर्चाबाबत बोलताना निरंजन हिरानंदानी यांनी दावा केला की, गेल्या दोन वर्षांत मुंबईत मेट्रोचे जाळे ३०० किलोमीटरहून अधिक पसरले आहे.
“आपण आता खर्च करत आहोत. ३०० किलोमीटर मेट्रोचे काम सुरू आहे. गेली ६५ वर्षं आपल्याकडे फक्त १९० किलोमीटरचे लोकल रेल्वेचे जाळे होते. पण आता आपण केवळ दोन वर्षांत ३०० किलोमीटरपेक्षा जास्त मेट्रो मार्ग जोडणार आहोत. आपल्याकडे आता क्रॉस-हार्बर ब्रिज आहे. दुसऱ्या विमानतळाचे काम सुरू आहे. याचबरोबर तिसऱ्या विमानतळाची योजनाही आखली जात आहे. आज आपण या देशात अशा गोष्टी साध्य करत आहोत ज्या कालपर्यंत स्वप्नातसुद्धा शक्य वाटत नव्हत्या”, असेही निरंजन हिरानंदानी यांनी म्हटले.