आर्थिक नियोजन किती महत्त्वाचं आहे असं विचारलं असता अमृता फडणवीस म्हणाल्या, “मला वाटतं सगळ्यात आवश्यक काही असेल तर ते आर्थिक नियोजन. ज्याप्रकारे आपल्याला आपलं शिक्षण आवश्यक आहे, संस्कार आवश्यक आहेत अगदी त्याचप्रकारे आर्थिक नियोजन करणंही आवश्यक आहे. एखादा बोट चालवणाऱ्या माणसाकडे नकाशे, होकायंत्र आणि दिशा दाखवणारी साधनं हवीत. ती नसतील तर त्याची बोट भरकटू शकते. त्याच प्रमाणे आपल्या आयुष्यात आर्थिक नियोजन आहे. आर्थिक नियोजन नसेल तर आपल्या खर्चाची गाडी भरकटण्याची शक्यता असते.” असं अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे.
आर्थिक नियोजन कशासाठी लागतं? तर आपली प्रत्येकाची काही स्वप्नं असतात. घर घेणं, कार घेणं, लग्न करणं, घरातल्या कुणाचं लग्न, मुलांचं शिक्षण, घरी काही तातडीची गरज लागल्यास अशा सगळ्या गोष्टी येतात. त्यासाठी आर्थिक नियोजन केलं जातं. आर्थिक नियोजन कसं करतात तर आवक आणि जावक काय ते माहीत हवं. तुमची स्वप्नं, तुमची स्वप्नं कधी पूर्ण करायची आहेत त्यासाठी काय करता? या गोष्टी आर्थिक नियोजनात येतात. असंही अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे.
समजा एखाद्या माणसाचा पगार १०० रुपये आहे तर त्यातले ५० रुपये हे नेहमीच्या खर्चात जातात. आणखी ३० रुपये हे त्याच्या गरजांसाठी खर्च होतात. मग जी आवक आहे त्यात २० टक्के रक्कम तुम्हाला शिल्लक ठेवणं आवश्यक आहे. शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लाँग टर्म असे स्वप्नांचे पॅटर्न असू शकतात. तुम्ही सेव्हिंग्ज करु शकता, एफडीज, लिक्विड फंड असे अनेक पर्याय करुन ही गुंतवणूक करता येते, एसआयपी करु शकता असे अनेक पर्याय गुंतवणुकीचे आहेत. पीपीएफचा विचारही अनेकजण करतात तो देखील चांगला पर्याय आहे असंही अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे. अमृता फडणवीस यांनी लोकशाही मराठीला मुलाखत दिली. त्यात त्यांनी हे मत मांडलं आहे. तसंच गुड लोन काय आणि बॅड लोन काय हे देखील अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे.
गुड लोन म्हणजे काय आणि बॅड लोन म्हणजे काय?
कर्ज घेण्याकडे अनेक लोकांचा कल असतो. स्वप्नपूर्तीसाठी कर्ज घ्यावं का? असं विचारलं असता अमृता फडणवीस म्हणाल्या, कर्ज घेणं हा प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय आहे. तुमची स्वप्नं काय आणि त्यांची तीव्रता काय यावर सगळं अवलंबून असतं. लोन्समध्ये काही लोन्स गुड लोन असतात काही लोन बॅड लोन असतात. ज्या कर्जात तुम्हाला आर्थिक किंवा व्यक्तिगत प्रगती दिसते आहे ते गुड लोन आहे. समजा एखाद्याने गृह कर्ज घेतलं तर त्याच्या घराची किंमत भविष्यात वाढणार आहे आणि त्याच्याकडे घराची सुरक्षितताही असणार आहे त्यामुळे गृह कर्ज किंवा होम लोन हे चांगलं लोन आहे. त्याप्रमाणेच शैक्षणिक कर्ज हे देखील एक चांगलं कर्ज आहे. कारण त्यात घेणाऱ्या व्यक्तीचं मूल्य पुढे वाढणार आहे त्यामुळे ते चांगलं लोन आहे. जर एखाद्या उद्योजकाने कर्ज घेतलं आणि व्यवसाय वृद्धी केली तर ते चांगलं कर्ज ठरतं. आता बॅड लोन म्हणजे काय? तर एक कार समजा एखाद्या व्यक्तीने घेतली ती शोरुमच्या बाहेर पडताच तिची किंमत कमी होणार आहे तर ते बॅड लोन आहे. तुम्हाला बाहेर फिरायला जाण्यासाठी कर्ज काढावं लागत असेल तर ते बॅड लोन आहे. शिवाय लग्नाच्या खर्चासाठी कुणी कर्ज काढलं तर ते देखील बॅड लोन आहे. कारण हे कर्ज घेणाऱ्यांची कंबर तुटतेच. असं अमृता फडणवीस यांनी सांगितलं.