रूढ शिक्षणव्यवस्थेने ‘दुय्यम’ असा शिक्का मारलेले विद्यार्थी नेहमीच्या अभ्यासक्रमांपेक्षा वेगळ्या वाटा चोखाळत आहेत, असे या अभ्यासक्रमांच्या गामणीवरून दिसून येते. हे अभ्यासक्रमदेखील विद्यापीठांद्वारेच चालवले जातात. जेमतेम तीन महिन्यांचे, सहा महिन्यांचे किंवा खूप झाले तर नऊ महिन्यांचे हे अभ्यासक्रम अनेक उमेदवारांच्या कुटुंबाची खळगी भरण्यासाठी आज उपयोगात पडत आहेत. त्यामुळेच ‘मुख प्रसिद्धी’च्या माध्यमातून अशा झटपट अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांची गर्दीही दिसून येत आहे. हे अभ्यासक्रम फारसे चर्चेत नसले तरी हमखास नोकरी, रोजगार उपलब्ध करून देणारे असल्याने पालकांमध्येही त्याविषयी जनजागृती होत आहे. शिवाय विद्यापीठांनी तयार केलेले संबंधित अभ्यासक्रम संस्थांच्या, उद्योगांच्या किंवा समाजाच्या गरजेतून त्या निर्माण केले आहेत. हॉस्पिटलमध्ये विशिष्ट प्रकारचे सहाय्यक हवे असल्यास तसे प्रस्ताव डॉक्टरांनी विद्यापीठांना दिल्याने चांगले अभ्यासक्रम अस्तित्वात आले. आज त्याचा लाभ हॉस्पिटल आणि ते अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना होत आहे, हे विशेष.

आपण शिकतो कशासाठी? असा एक सहज प्रश्न आपल्याला विचारला तर त्याचे सामान्यपणे उत्तर नोकरीसाठी, कमावण्यासाठी असे दिले जाते. शिक्षणाच्या अनेक उद्देशांपैकी नोकरी, रोजगार मिळवणे हा आहे. नोकरीसाठी तो फार महत्त्वाचा निकष आहे. मग सर्वच पदवी, पदवीधर, पदविका प्राप्त करणाऱ्यांना नोकरी मिळतेच असेही नाही. त्यांच्यात वेगळ्या काही कौशल्यांची अपेक्षा केली जाते. पदवी व्यतिरिक्त आणखी वेगळे कौशल्य असेल तर ती उमेदवाराची जमेची बाजू असते. ‘स्किल्ड इंडिया’ची संकल्पना तीच आहे. पारंपरिक विद्याशाखांमधील कला, वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी, मेडिकल अशा विद्याशाखांमध्येही वेगळे कौशल्य आता शोधले जाते. मराठीचा पदवीधर असेल तर ठीक. सोबतच लिखाण, वाचन असेल तर चांगले. शुद्धलेखनाची माहिती असेल तर उत्तम आणि इंग्रजीही येत असेल तर सोन्याहून पिवळं. अशा उमेदवारांना वर्तमानपत्रांमध्ये, प्रकाशन संस्थांमध्ये मुद्रित शोधक किंवा इतर प्रकारच्या कामे मिळण्याची शक्यता वाढते. ती त्यांच्या वेगवेगळ्या कौशल्यामुळे.

हल्ली असे कौशल्य शिकवणारे अभ्यासक्रम, नेहमीपेक्षा वेगळे किंवा हवे तर आडमार्गी अभ्यासक्रम म्हणा, सामान्य मुलांना आणि संस्थांना फारच फायदेशीर ठरू लागले आहेत. ९० टक्क्यांच्या पुढची पिढी किंवा एखाद्याला ९० टक्के गुण असणे हल्ली फारसे कौतुकास्पद राहिले नाही. शेकडय़ाने अशी टक्केवारी प्राप्त करणारी मुले भेटतात. त्यामुळे पूर्वीसारखे अप्रूप वाटण्याची गरज नाही. पण, बरेच ९० टक्के किंवा त्याउपर गुण असलेल्यांच्या कोडकौतुकात सामान्य बुद्धिमत्ता असलेला, पण कष्टाळू, प्रामाणिक, मेहनत घेण्यास कधीही तत्पर असलेल्या मुलांकडे नकळत दुर्लक्षच होते. पण, जगणे त्यांनाही आलेच ना! चारचौघांसारखे जीवनाचे व्याप त्यांनाही सांभाळावे लागतात. जगण्यासाठी पैसा हवाच असतो. हा पैसा काहीतरी काम केल्याशिवाय कसा मिळणार. काम मिळायला चांगले शिक्षण हवे, चांगले गुण आणि पदवी हवी हे ओघाने आलेच. पण यातील काहीही नसेल त्यांची पंचाईतच! पण, अशा पास किंवा काठावर पास असलेल्यांचे फारसे अडताना दिसत नाही. हे या आडमार्गी अभ्यासक्रमांमुळेच. मेहनत घेण्याची इच्छा असेल तर अनेक मार्ग त्यांना उपलब्ध होतात. विद्यापीठे अशाही मुलांच्या शिक्षणाची काळजी वाहताना दिसतात.

असे आडमार्गी अभ्यासक्रम मेडिकल, इंजिनिअरिंग, सायन्स या परवलीच्या शब्दाखाली झाकले जातात. पण त्यातच चांगला रोजगार उपलब्ध असल्याचे लक्षात येते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठांमध्ये असे रोजगारभिमुख आडमार्गी अभ्यासक्रम आजमितीस उपलब्ध आहेत. फारसे ऐकिवात नसणारे आणि सामान्यत: दुर्लक्षित असूनही १०० टक्के नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणारे काही अभ्यासक्रम विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय आहेत. कमी दिवसांचे अभ्यासक्रम नागपुरातल्या नागपुरातही रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देतात. नागपूर विद्यापीठाच्या निरंतर प्रौढ शिक्षण आणि विस्तार विभागाद्वारे चालवले जातात. यातील काही अभ्यासक्रम हमखास नोकरी उपलब्ध करणारे आहेत. ऑफिस मॅनेजमेंट, बँकिंग आणि आर्थिक सेवा, फंक्शनल अरेबिक, व्यक्तिमत्त्व विकास आणि संवाद कौशल्य, स्टॅटिस्टिकल मेथड, संशोधन पद्धती, बालशिक्षिका प्रमाणपत्र अभ्यासक्रम, रुग्णालय सहाय्यक, ऑप्थाल्मिक असिस्टंट, क्राफ्ट टीचर, डायलिसीस टेक्निशियन असिस्टंट आणि अकाउंटिंग प्रॅक्टिस आणि टॅक्सेशन इत्यादी अभ्यासक्रमांची नमुनेदाखल नावे सांगता येतील.

जेमतेम काही महिन्यांचे हे अभ्यासक्रम आहेत. काही अभ्यासक्रमांना नववी पास चालते तर काहींना एम.ए. असावे लागते तरच प्रवेशाची वाट मोकळी होते. बालशिक्षक प्रमाणपत्र किंवा क्राफ्ट टीचरचा अनुक्रमे नऊ आणि सहा महिन्यांचा अभ्यासक्रम आहे. अंगणवाडी किंवा कुठल्याही एखाद्या कॉन्व्हेंटमध्ये पाच-सात हजारांची नोकरी मिळवणे त्यातून सहज शक्य होते. शिवाय प्रवेश शुल्कही कमी असल्याने आर्थिक स्थिती नाजूक असणाऱ्यांच्या ते पथ्यावर पडते. डायलिसिस टेक्निशियन असिस्टंट आणि ऑप्थाल्मिक असिस्टंटची गरज रुग्णालयांना पडली. त्यांनी तसे प्रस्ताव विद्यापीठाकडे सादर केले. त्यातून सहा ते नऊ महिन्यांचे हे अभ्यासक्रम तयार करून विद्यार्थ्यांना त्याचा उपयोग होतो आहे. पद्मश्री डॉ. विकास महात्मे, वर्धा मार्गावरील डॉ. उखळकर यांच्या रुग्णालयांमध्ये कितीतरी विद्यार्थ्यांनी याच अभ्यासक्रमाच्या माध्यमातून नोकऱ्या मिळवल्या आहेत. ऑफिस मॅनेजमेंट हा असाच एक मागणी असलेला अभ्यासक्रम कामठीतील कॅन्टॉनमेंटमध्ये सुरू करण्यात आला आहे. तेथील ब्रिगेडियरने विद्यापीठाशी करार करून अभ्यासक्रम सुरू करवून घेतला.

सहा, आठ किंवा नऊ महिन्यांचे अभ्यासक्रम केल्यानंतर ४ हजारांपासून १० हजारांपर्यंत रोजगार उपलब्ध करणारे अभ्यासक्रम पूर्ण करून नागपूर, अकोला, भंडारा, चंद्रपूर या ठिकाणीही विद्यार्थ्यांनी नोकऱ्या मिळवल्या आहेत. केवळ नागपूर विद्यापीठच नव्हे तर ‘इग्न’ूमध्येही असे रोजगारभिमुख अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. इग्नूचे विद्यमाने विभागीय संचालक डॉ. पी. शिवस्वरुप हे दरवर्षीच नवनवीन प्रयोग करीत असतात. कारागृहातील कैदी, अपंग, गडचिरोलीतील आदिवासी महिलांसाठी त्यांनी पाठय़क्रम तयार केले आहेत. नुकतेच अनुसूचित जाती व जमातीच्या मुलांसाठी त्यांनी नवीन योजना सुरू केली आहे. वय वर्षे १८ ते ५० वर्षांपर्यंतचे लोक इग्नूमध्ये प्रवेश घेतात.

लोकांच्या गरजा ओळखून त्यांना अधिक कौशल्याभिमुख करण्यासाठी इग्नूच्यावतीने दरवर्षी नवनवीन अभ्यासक्रम तयार केले जातात. गृह आधारित देखभाल कार्यक्रम (होम बेस्ड प्रोग्रॅम) इग्नूच्या नागपूर केंद्राने तयार केला. त्यासाठी गडचिरोलीतील  आदिवासींनी प्रवेश घेतला. तसेच गडचिरोलीच्या महिला पोलिसांनीही त्यासाठी नोंदणी केली आहे. या अभ्यासक्रमाचा काहींना निश्चित फायदा झाला असून महिन्याला चार-पाच हजारांचे उत्पन्न त्यातून निश्चित झाले. ज्या प्रौढ विद्यार्थ्यांनी आधी असलेल्या नोकरीतच आणखी कौशल्य मिळावे म्हणून अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यांना आज नाशिक येथे नोकरी मिळून १५ हजारांचे वेतन मिळत असल्याची माहिती डॉ. शिवस्वरूप यांनी दिली.

याशिवाय प्रत्येक माणसाच्या जीवनाशी विमा निगडित असतो. शिवाय जेव्हा वेळ मिळेल तेव्हा विम्याचा व्यवसाय करता येतो. त्यातून उत्पन्नही चांगले मिळते. त्यामुळे विमा प्रतिनिधीं संबंधीचे शिक्षणही इग्नूद्वारे दिले जात आहे. याशिवाय हवाई सुंदरीसंबंधीचा अभ्यासक्रमही इग्नूच्यावतीने सुरू करण्यात आला आहे. असे हे नेहमीपेक्षा हटके अभ्यासक्रम आज समाजातील अनेक कुटुंबांसाठी आधार ठरत आहेत.

jyoti.tirpude@expressindia.com