‘इंद्रधनुष्य’ केवळ सांस्कृतिक महोत्सवच नव्हे तर स्पर्धकाला त्याचा स्वत:चा आविष्कार, कौशल्य सादर करून प्रतिस्पध्र्याचं आव्हानही पेलावं लागतं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठानं आयोजित केलेल्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ सांस्कृतिक महोत्सव आठवणीत राहावा असा नेत्रदीपक झाला. महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या पुढाकारानं हा महोत्सव २००३पासून नेमानं आयोजित केला जात आहे. नागपूर विद्यापीठाद्वारे यापूर्वी २००५ मध्ये द्वितीय इंद्रधनुष्य आयोजित करण्यात आला होता. यंदाचा महोत्सव याच मालिकेतील १३वा आहे.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने आयोजित केलेल्या ‘इंद्रधनुष्य’ या सांस्कृतिक महोत्सवाला न भूतो न भविष्यते असा मोठा प्रतिसाद लाभला. विद्यार्थी आले, नाचले, बोलले, बक्षिसे पटकावली आणि गेले, केवळ असा यांत्रिकपणा या इव्हेंटमध्ये नव्हता. त्यांनी चर्चा केली, एका तालासुरात रिजाय केले. इतर विद्यापीठांचे इव्हेंट शिटय़ा वाजवून डोक्यावर घेतले आणि कधी नव्हे त्या नागपूरच्या गुलाबी थंडीत कला सादर करून खुशीत पारितोषिके पटकावली. यानिमित्त नागपुरात दाखल झालेला प्रत्येक विद्यापीठाच्या कलावंताने ‘आठवणीतील दिवस’ अशी नोंद स्वत:च्या डोक्यात करून घेतली. कारण ‘इंद्रधनुष्य’च्या जेवणावळीसाठी लागणाऱ्या फोडणीच्या तेलापासून ते समारोपीय कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवसाच्या दुपारच्या जेवणातील मेनुपर्यंत नियमावली ठरवण्यात आली होती. कुलपती कार्यालयातून आलेल्या निरीक्षकांनीही नागपूरच्या पंचतारांकित आयोजनाचे कौतुक केले.
मोठा आणि सलग कॅम्पसचा अभाव ही नागपूर विद्यापीठासमोरील सर्वात मोठी समस्या आहे. पॉकेटस्मध्ये हे विद्यापीठ विखुरले आहे. प्रशासकीय वास्तू, परीक्षा भवन, विद्यापीठाचे विभाग, वसतिगृहे, ग्रंथालय, सभागृह, विश्रामगृह एका सलग तुकडय़ातच नाहीतच. त्याच्या प्रत्येकामधून नागपूर शहराला जोडणारे उभे आडवे साठ-साठ फुटांचे रस्ते आहेत. त्यामुळंच ‘इंद्रधनुष्य’चं धनुष्य पेलनं विद्यापीठासमोर आव्हानच होतं. त्यासाठी वसंतराव देशपांडे सभागृहाच्या विरुद्ध असलेलं आमदार निवास रिकामे असणं गरजेचं होतं. सर्वानाच कल्पना आहे की इंद्रधनुष्य पाच ते नऊ नोव्हेंबरला असतं. पण पाच नोव्हेंबरला दिवाळीचा पहिला दिवस होता. त्यामुळं पुढे ढकलण्याशिवाय पर्याय नव्हता. पुढं म्हणजे अगदी पुढच्या डिसेंबरमध्ये शक्य नव्हतं. कारण हिवाळी अधिवेशन! आमदारांसाठी आमदार निवास आरक्षित असल्यानं इंद्रधनुष्य दोन-अडीच महिने लांबल्याचं सत्य येथे आलेल्या कलावंतांना उमगलं. कारण तोपर्यंत त्यांच्या मनात ‘इंद्रधनुष्य’ आणि आमदार निवासचा संबंधच काय? असा प्रश्न होता.
वसंतराव देशपांडे सभागृहात इव्हेंट झाल्यावर लगेच आमदार निवासात आराम किंवा मग पुढच्या इव्हेंटची तयारी करणं सोपं. नाहीतर चहापान किंवा मग परिसरात टिंगलटवाळ्यांना पुरेसा वाव होताच. काही इव्हेंट विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात आणि काही भाऊसाहेब उपाख्य वि.भि. कोलते वाचनालयाच्या पूर्णचंद्र बुटी सभागृहात होते. तिथपर्यंत जाणं नवीन मुलांना जिकरीचं होतं. मात्र, हा देखील प्रश्न विद्यापीठानं आधीच निकाली लावला होता. टॅक्सी भरपूर लावल्या होत्या. रोजच्या दोन बसेस आमदार निवासपासून ते ज्या ठिकाणी इव्हेंट आहे त्या ठिकाणापर्यंत. तसेच इतर विद्यापीठांच्या विद्यार्थी कल्याणचे संचालक, विद्यार्थ्यांचे नातेवाईक, पंच यांना वेगवेगळ्या विश्रामगृह किंवा रविभवनहून ने-आण करण्यासाठी चार इनोव्हा तैनात होत्या. शिवाय २४ तास आपल्याकडे एक बस वजा रुग्णवाहिका विद्यार्थ्यांच्या तैनातीत ठेवण्यात आली होती. आमदार निवासमध्ये १६० खोल्या बुक केल्या होत्या. तरीही योग्यवेळी जेवण न केल्याने नृत्य करताना एक स्पर्धक खाली पडला आणि त्याला ऐनवेळी दाखल करावे लागले. एवढा एक अपवाद वगळता बाकी सारे स्मूथ दिसत होते.
एवढी जय्यत तयारी विद्यापीठाच्या बाजूनं दिसत असताना स्पर्धकही काही कमी नव्हते. एकूण २४ कलाप्रकारांमध्ये ते पारंगत होते. त्यात संगीताच्या आठ, नृत्यप्रकारातील दोन, साहित्य विषयक तीन, नाटय़ प्रकारातील चार, तर ललित कलेच्या विविध अंगांचे प्रदर्शन घडवणाऱ्या सात विभिन्न स्पर्धामध्ये चुणूक दाखवणे मोठं आव्हानच. काही हौसे काही नवसे तर काही निष्णांत असल्यानं सहज वावरत होते. शास्त्रीय गायन, स्पॉट पेंटिंग, शास्त्रीय वाद्य संगीत, एकल तालवाद्य, कोलाज, गीत गायन, भित्तीचित्र, वक्तृत्व, नाटय़छटा, मूकअभिनय, प्रश्नोत्तरी, लोकसंगीत, छायाचित्रण, नकला, पाश्चात्त्य संगीत (सामूहिक), रांगोळी इत्यादी कलास्पर्धाचा आविष्कार होणार होता आणि हे आव्हान २३ ते २५ जानेवारी या तीन दिवसात पेलायचं होतं. दीक्षांत सभागृह, आमदार निवासातील सभागृह, वसंतराव देशपांडे सभागृह आणि पूर्णचंद्र बुटी हॉल सकाळी नऊ वाजतापासून ते रात्रीपर्यंत श्रोत्यांच्या मनोरंजनात गुंग होतं.
‘इंद्रधनुष्य’ एक सांस्कृतिक महोत्सव. राज्यस्तरीय स्पर्धेचा अंतिम टप्पा असला तरी त्यात असा द्वेष किंवा एकमेकांप्रती असुया नव्हती. जिंकण्याची ईर्षां होती पण, प्रतिस्पध्र्याच्या कलेला दादही होती. विद्यार्थी कलावंतांच्या चेहऱ्यावर, आवाजात, देहबोलीत, कुचल्यांच्या फटकाऱ्यात, वाद्यातून निघालेल्या सुरात, गळ्यातून उतरणाऱ्या स्वरात एक टवटवी होती. आपलं विद्यापीठ विसरून इतरांच्या कलाकृतींना नाचून, शिट्टय़ा वाजवून हा युवावर्ग उत्स्फूर्तपणे डोक्यावर घेत होता. कला सादर करताना इतकी सहजता होती की, एक स्पर्धक एकाचवेळी दोन वाद्य वाजवित होती. ते झाल्यावर तिनं डोक्यावर पदर घेतला आणि ती जी काही लावणीला भिडली की आख्खं सभागृह बेधुंद होऊन तिच्या तालाशी ताल मिळवून नाचू लागलं. या हृदयीचे त्या हृदयी असतं ना अगदी तसंच. खूप शिकायला मिळाल्याचं काहींना वाटलं तर अजून खूप शिकायचं बाकी आहे, असल्याचा साक्षात्कारही स्पर्धकांना झाला. मात्र काहीं स्पर्धकांना आणखी चांगले आणि जास्त संख्येनं स्पर्धक हवे होते.
लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ सोडलं तर १९ विद्यापीठांच्या ७६० विद्यार्थ्यांनी उपराजधानी तरुण झाल्यासारखी वावरत होती. कोल्हापूर विद्यापीठाची चमू तर १९ जानेवारीलाच नागपुरात पोहोचली. त्यांना विद्यार्थी भवनात जेवणाशिवाय सर्व सोयी नि:शुल्क दिल्या.