News Flash

कला नियोजन आणि संधी

कलाप्रेमी विद्यार्थ्यांसाठी कला नियोजनासारख्या क्षेत्रातही करिअरच्या विपुल संधी आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

निखिल पुरोहित

कलेची आवड असलेल्यांसाठी कलेची निर्मिती इतकेच काही करिअर नाही. कलाप्रेमी विद्यार्थ्यांसाठी कला नियोजनासारख्या क्षेत्रातही करिअरच्या विपुल संधी आहेत.

कला नियोजन ही संकल्पना निरनिराळ्या संस्थांच्या माध्यमातून चालत आलेली परंपरा आहे. विसाव्या शतकापासून या विषयात औपचारिक दखल घेऊन विद्यापीठांमधून पदवी अभ्यासक्रमांना युरोप, अमेरिकेत व लंडन येथे सुरुवात झाली. इतिहासात कला नियोजन हे अनेक पातळींवर आणि सुप्तरीत्या आणि बहुतेक वेळी इतर सांस्कृतिक व्यवहारात समरस असल्याने त्याचा नेमके इतिहास मांडणे अवघड आहे. तरी १९७०नंतर जागतिक स्तरावर दृश्य आणि रंगमंचावरील कलांचा समाजावरील परिणाम ओळखून त्याचे व्यावसायिक, आíथक आणि सांस्कृतिक लाभ घेण्यासाठी या क्षेत्रातील शैक्षणिक अभ्यासक्रमाची सुरुवात झाल्याचे कळते.

कला नियोजन हे व्यावसायिक गरजेतून तयार झाले, ज्यामुळे अपेक्षित कलात्मक परिणाम अगर बदल (समाज आणि कलेत) घडवून आणण्यासाठी, त्या परिणामांचा प्रभाव मोजण्यासाठी आणि निरीक्षणातून पुढील धोरणे तयार करण्यासाठी उपयुक्त साधने प्राप्त होतात. नियोजन आणि नियोजकाचे कार्य दृककला नियोजनाच्या एका उदाहरणातून पाहू या. सध्या कोची येथे आयोजित करण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय कोची मुजिरीस बिएनालेसारख्या मोठय़ा कला प्रदर्शनाच्या उदाहरणातून नियोजनाचे टप्पे, गुंता आणि व्यवहार समजून घेऊ. पहिल्या लेखात नमूद गुणांखेरीज नियोजनासाठी संयोजक दष्टी हे महत्त्वाचे. प्रदर्शनपूर्व तयारीत प्रदर्शनाची भूमिका – कन्सेप्ट व हेतू, प्रदर्शन स्थळ, आवश्यक आíथक पाठबळ आणि उपलब्धता, कलाकृती किंवा सहभागी होणाऱ्या कलाकारांची निवड, निवड प्रक्रियेचे निकष, स्थानिक राजकीय, सांस्कृतिक धोरणांचा अंदाज घेऊन प्रदर्शनाच्या प्रभाव आणि परिणामांचा अंदाज बाळगणे प्रदर्शनाच्या यशासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.

प्रदर्शन वास्तवात आणण्यासाठी गरजेची क्रिया ज्याला लॉजिस्टिक्स म्हणतात असे कार्य म्हणजे प्रत्यक्ष कलाकृतींचा संग्रह असतो. तो त्या त्या कलाकार किंवा संग्राहकांकडून मागवणे, प्रदर्शन दालनात मांडणीचा आराखडा तयार करणे, कलाकृतींचे सुरक्षित वाहतूक, कलाकृतींचा विमा, आवश्यक सरकारी आणि खासगी परवाने, दालनात असणारी विद्युत आणि प्रकाशव्यवस्था, व्हिडीओ किंवा साऊंड मांडणी – कलाकृतींसाठी विशिष्ट वातावरण निर्मितीची, त्यासाठी टीव्ही/ प्रोजेक्टर, योग्य ध्वनिप्रकाश योजना, दालनात दर्शकांना कलाकृतींच्या निरीक्षणासाठी उपलब्ध मार्ग व फलक अशा सर्व बाबींचा नियोजकांच्या संघाला तयारी करणे अभिप्रेत आहे. याव्यतिरिक्त अनपेक्षित अडचणी आणि आव्हानांसाठी अनुभवी आणि चतुर नियोजकांचा संघ असणे, आवश्यक आहे.

प्रदर्शन काळात कलाकृतींच्या संरक्षणासाठी (इजा होणे, चोरी होणे, नसíगक आपत्ती) योग्य ते उपाय करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण ज्या कलाकृतींना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ख्याती आहे त्यांचे कलात्मक आणि आíथक मूल्य प्रचंड असते. योग्य काळजी घेतली न गेल्याने कलाकृतीचे नुकसान तर होईलच त्याबरोबरच नियोजकांच्या विश्वासार्हतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होते.

प्रदर्शनाचे यश बहुसंख्य दर्शकांच्या सहभागात आहे. त्यासाठी उपयुक्त असे प्रचार – समाज माध्यमे, वर्तमानपत्र, वृत्तवाहिन्या, संकेतस्थळांवर पुरेशी माहिती, सातत्याचे जाहिरात हे आवश्यक घटक आहेत. याहीपेक्षा दर्शकांना गुंतवून ठेवण्यासाठी विविध कार्यशाळा, फिल्म प्रदर्शन, चर्चासत्र, कलाकारांसोबत वॉक थ्रू अशा कार्यक्रमांचे नियोजन करणे, ही प्रदर्शनाव्यतिरिक्त करण्याची कामे आहेत. सहभागासाठी विद्यार्थी, कला-विद्यार्थी, उत्सुक आणि हौशी कलाकार, सामान्य वर्ग, विशेष गरज असणारे नागरिक अशा सर्वाचा विचार केल्याने खऱ्या अर्थाने प्रदर्शनाचे सार्थक होते.

वर दिलेली सर्व माहिती एका आदर्श कला नियोजनाचे अगर प्रदर्शनाचे अविभाज्य घटक आहेत. पण वास्तवात असे चित्र तयार होण्यासाठी अत्यंत धाडसी वृत्ती पाहिजे. त्या सोबत सक्षम कार्यप्रणाली आणि सूज्ञ, तत्पर आणि चिकित्सक असे सहकारीदेखील पाहिजेत. अर्थात हे सर्व कोणत्याही नियोजनात लागू पडणारे घटक आहेत. कलेत मात्र या सर्व गुणांसमवेत कला संबोधनासाठी नेमके विषय आणि आशय हेरण्याची क्षमता सर्वाधिक महत्त्वाची. सामाजिकदृष्टय़ा नाजूक विषय हाताळताना विषयाची प्रदर्शनातून मांडणी अशा रीतीने करावे लागते, ज्यामुळे दर्शक-समाजाला विचार करण्यास प्रेरित करेल.

आधुनिक दृश्य कला ही भारतीय सांस्कृतिक जीवनात सलग न आल्याने समकालीन दृक भाषा समजणे अवघड आणि आपल्या आजच्या जीवनाशी विसंगतदेखील आहे. ही विसंगती युरोपातून भारतात आलेल्या नूतन कला प्रवाहांच्या परिणामाने निर्माण झालेले आहे. त्याशिवाय जलद गतीने बदलणाऱ्या समाजव्यवस्था आणि तंत्रज्ञान यामुळे संभ्रमाचे वातावरण कला नियोजकांपुढे असलेले प्रमुख आव्हान आहे. कलाकृतींतील सौंदर्यानुभव, आणि महत्त्व कमी न करता त्यातला आशय बहुसंख्याकांपर्यंत पोहोचवणे अत्यंत कसोटीचे आहे. सांकल्पनिक आव्हानांशिवाय राजकीय आणि आíथक आव्हानेही या संपूर्ण प्रक्रियेला विराम लावणारे ठरू शकतात. आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रदर्शन आयोजित करताना सामील असलेल्या देशांच्या आपसातील सांस्कृतिक धोरणे, प्रदर्शन साध्य होण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या शासकीय आणि बिगरशासकीय संस्था यांच्यामधील संवाद, अर्थसाहाय्य पुरवणारे प्रायोजक व मिळणाऱ्या धनराशीचे नियोजन, जमा-खर्च या तेवढय़ाच आव्हानात्मक बाबी आहेत. आयोजकांची विश्वसनीयता सिद्ध झाल्याखेरीज प्रायोजकांचे आणि शासकीय पाठबळ मिळणे कठीण आहे.

आतापर्यंत मांडलेल्या विषयात मोठय़ा पातळीवर होणाऱ्या प्रदर्शनाच्या उलाढालींचा विचार आपण केला. यातल्या बहुतेक बाबी सर्व दृश्यकला आणि रंगमंचीय कलांच्या नियोजन आराखडय़ात थोडय़ाफार फरकाने सारख्याच असतात. नियोजन म्हटल्यावर ऑन फील्ड आणि डेस्कटॉप वर्क दोन्ही कमी-जास्त प्रमाणात असतात. अनेक प्रकारच्या लोकांशी संवाद साधणे, भेटीगाठी घेणे, ऑफिसमधून ई-मेल संपर्क, कार्य निर्वाहासाठी आखलेली कामे आणि दिलेल्या मुदती, अनुदान प्रस्ताव लिहिणे, ग्रांट लेखन, घडामोडींचे दस्तावेजीकरण (डॉक्युमेंटेशन), फोटोग्राफी, रिपोर्ट तयार करणे, जमा-खर्च राखणे, वेळच्या वेळी प्रसारमाध्यमातून उपक्रमांची बातमी देणे, त्यासाठी आकर्षक पोस्टर बनविणे या व इतर अनेक कामे सामील असतात. अर्थात सगळं काही एकच व्यक्ती करणे अपेक्षित नसून अनुभव, ज्ञान, आवड आणि चिकाटी या आधारांवर नियोजकांवर जबाबदारी सोपवली जाते. काही छोटय़ा संस्थांमध्ये ही अनेक कामे दोन किंवा तीन व्यक्ती सांभाळत असतात.

कला नियोजन क्षेत्रातील शिक्षण जगभरातील विद्यापीठांमध्ये, खासगी संस्थांमधून पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांतून उपलब्ध आहेत. आर्ट्स मॅनेजमेंट, क्युरॅटोरिअल स्टडीज, हेरिटेज मॅनॅजमेन्ट, लिबरल आर्ट्स स्टडीज, मानव्य शास्त्र, वस्तुसंग्रहालयाचे शास्त्र – म्युझिऑलॉजी, बीबीए, एमबीए अशा निरनिराळ्या अभ्यासक्रमांतून कला नियोजनाचे प्रशिक्षण सुरू आहे. काही आंतरराष्ट्रीय लिलावगृहांनी घरांनी कलावस्तूंच्या व्यवहाराच्या प्रशिक्षण अभ्यासक्रमालाही काही वर्षांपूर्वीच सुरुवात केली आहे. भारतात मुंबई आणि बडोदा विद्यापीठाचे म्युझिऑलॉजी अ‍ॅण्ड कन्झव्‍‌र्हेशन, सिंबॉयसिसमधील लिबरल आर्ट्स, मास कम्युनिकेशन, टिळक महाराष्ट्र विद्यापीठातील इंडॉलॉजी, हेरिटेज टूरिजम, लखनौ येथील राष्ट्रीय सांस्कृतिक संपदा संरक्षण अनुसंधानशाला येथील कार्यशाळा, बेंगळुरू येथील सृष्टी या कला आणि डिझाइन संस्थेतील विविध अभ्यासक्रम, असे अनेक प्रकारचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. त्याशिवाय मुंबईतील मोहिले पारीख केंद्र, दिल्ली येथील फाऊंडेशन फॉर इंडियन कंटेम्पररी आर्ट्स, इंडिया फाऊंडेशन फॉर आर्ट्स, स्पिक मॅके, काही कला दालने अशा विविध खासगी संस्थांमधून कार्यशाळा, संशोधन अनुदान या माध्यमातून कला नियोजन शिकणाऱ्या आणि कार्य करणाऱ्या जिज्ञासूंना ज्ञान आणि स्थानही मिळत आहे.

(लेखक चित्रकार आणि कला नियोजक, अभ्यासक आहेत.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 25, 2018 3:43 am

Web Title: article about art planning and opportunities
Next Stories
1 करिअर वार्ता : शिक्षणासाठी लॉटरीचा आधार
2 एमपीएससी मंत्र : मुख्य परीक्षेनंतर..
3 किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना
Just Now!
X