News Flash

‘प्रयोग’ शाळा : शिक्षणासाठी काय पण!

किशोर पाटील यांनी १९९२मध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक म्हणून कामाला सुरुवात केली.

‘प्रयोग’ शाळा : शिक्षणासाठी काय पण!
(संग्रहित छायाचित्र)

स्वाती केतकर- पंडित

आपल्या विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण, शाळेचा हक्क  मिळायला हवा, यासाठी झटणारे एक शिक्षक म्हणजे  किशोर पंढरीनाथ पाटील. शाळा डिजिटल करण्यापासून  ते तिचे रंगरुप बदलून ती विद्यार्थीस्नेही करेपर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी ते उत्साहाने सहभाग घेतात.

किशोर पाटील यांनी १९९२मध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक म्हणून कामाला सुरुवात केली. त्यांची पहिली शाळा होती, धुळे तालुक्यातील जि.प. कन्याशाळा लामकानी. या शाळेत किशोरसरांनी आपले लक्ष शिष्यवृत्ती परीक्षांवर केंद्रित केले. ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी खास मार्गदर्शनपर वर्ग सुरू केले. या मेहनतीला फळ आले आणि १९९५- १९९६ आणि १९९७ अशी सलग ३ र्वष त्यांच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवले.

यानंतर दोन वर्षांनी किशोर यांची बदली झाली, धुळे तालुक्यातील रामनगर या शाळेवर. ही एकशिक्षकी, प्राथमिक शाळा होती. आदिवासी वस्तीतली ही शाळा झाडाखाली भरायची. वस्ती म्हणजे केवळ ६-७ झोपडय़ा होत्या. तिथे जायला रस्ता नव्हता. वीज अजूनही नाही. पहिल्यांदा पटसंख्या होती, अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतकी म्हणजे ६. या विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्काचे शिक्षण आणि शाळा मिळालीच पाहिजे, यासाठी किशोरसरांनी प्रयत्न सुरू केले. वस्तीतल्या प्रत्येक घरी जाऊन जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शाळेत आणण्याचे काम सुरू केले. स्थानिक लोकप्रतिनिधींशी संवाद साधून त्यांना शाळेची गरज पटवून दिली. यातूनच स्थानिक आमदारांनी आपल्या निधीतून शाळेला एक खोली बांधून दिली. त्यासोबत लोकसहभागातून स्वच्छतागृह आणि हातपंपही शाळेकडे आला. एव्हाना शाळेची पटसंख्या वाढून ती १६वर गेली होती. शाळेच्या किमान गरजा भागल्या होत्या. यापुढची लढाई होती, ती अभ्यासाशी दोस्ती करण्याची. या विद्यार्थ्यांची भाषा होती, भिलोरी. ही भिल्लांची भाषा. किशोरसरांची मातृभाषा अहिराणी आणि ही भिल्लोरी भाषा एकमेकींच्या बऱ्याच जवळच्या. त्यामुळे त्यांनी पटकन विद्यार्थ्यांची भाषा आत्मसात करत त्यातून शिकवायला सुरुवात केली. कधीही शाळेत न फिरकणारी मुलेही आवडीने शाळेत येऊ लागली. सरांच्या या शाळेतला एक  माजी विद्यार्थी कलाशाखेतून पदवीधर झाला आहे, तर आणखी एकजण चक्क पीएचडी होऊन प्राध्यापक म्हणून नोकरीला लागला आहे. आता या वस्तीच्या लोकसंख्येत आणि विचारांतही फरक पडला आहे. ६-७झोपडय़ांची आता ३०-३५ घरे झाली आहेत. विद्यार्थ्यांची एकूण उपस्थिती आणि प्रगती पाहून या शाळेला शासनाने आणखी एक शिक्षक मंजूर केला आहे. त्यामुळे आता ही शाळा द्विशिक्षकी शाळा झाली आहे. एकूणच किशोरसरांनी लावलेले परिवर्तनाचे रोपटे आता तिथे चांगलेच मूळ धरू पाहत आहे. या शाळेनंतर थोडा काळ किशोर यांनी सर्वशिक्षण अभियानातही विशेष जबाबदारी बजावली.

यानंतर २०१३मध्ये त्यांची बदली झाली, साक्री तालुक्यातील जि.प. शाळा घाणेगाव येथे. इथेसुद्धा उपस्थिती फारशी नव्हती. नेहमीप्रमाणेच किशोरसरांनी उपस्थिती वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. पालकसभा घेतल्या, पालकांच्या भेटी घेतल्या. त्यांच्यामध्ये शिक्षणासाठी जनजागृती सुरू केली. याचा परिणाम हळूहळू शाळेतील उपस्थितीवर दिसू लागला. आपल्या मुलांना शाळेत पाठवणेही पालकांना तितकेच महत्त्वाचे वाटू लागले. याचबरोबर किशोरसरांनी गावकऱ्यांच्या आणि सहकारी शिक्षकांच्या, विद्यार्थ्यांच्या मदतीने शाळेचे अंतरंग आणि बाह्य़रंगही बदलण्याचा प्रयत्न केला. भिंतींवरचे निळे, मातकट तेच ते रंग जाऊन तिथे चित्रे आली, शाळा खरोखरच हसतीखेळती झाली.

यानंतर डिजिटल शिक्षणाचे वारे वाहू लागले आणि किशोरसर आणि त्यांचे २ सहकारी यांनी डिजिटल शिक्षणाचा धडाकाच लावला.  सुरुवातीला हे सगळे काय आहे, हे विद्यार्थ्यांना समजत नसे. त्यासाठीचा अभ्यासक्रमही शिक्षकांना मिळालेला नव्हता. मग हे डिजिटल माध्यम समजावण्यासाठी सरांनी शक्कल लढवली. एखाद्याचे पाढे उत्तम पाठ असतील, एखाद्याला चांगल्या कविता येत असतील, एखादा चांगले गाणे म्हणत असेल तर त्या गोष्टी मोबाइलमध्ये शूट करून पडद्यावर दाखवल्या जायच्या. आपण स्वत: अशा प्रकारे पडद्यावर झळकू शकतो, याचे विद्यार्थ्यांना प्रचंड कुतुहल वाटू लागले. त्यातूनच मग तसे झळकण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करू लागला. पाढे, कविता, व्याख्या आपोआपच पाठ झाल्या. याचबरोबर ज्ञानरचनावादावर आधारित विषयनिहाय वर्गखोल्या तयार झाल्या. त्यामध्ये विषयानुरूप शैक्षणिक साहित्य होते. या साहित्यातील जवळपास ७५ टक्के साहित्य हे सरांनी हातानेच तयार केलेले आहे. त्यामध्ये फ्लॅशकार्ड, शब्दपट्टय़ा, गोष्टींचे चार्ट, गणिताच्या साहित्याचा समावेश आहे. डिजिटल माध्यमाचा अतिशय कल्पक वापर किशोरसरांनी करून घेतला. या शाळेमध्ये वर्ग चौथीपर्यंत पण शिक्षक तीनच अशी स्थिती होती. मग अनेकदा एखादा वर्ग बिनशिक्षकाचा राही. वरच्या वर्गाना सांभाळणे सोपे जाई, पण लहान वर्गात मात्र गडबडगोंधळ उडे. यावर किशोरसरांनी तोडगा काढला. ते डिजिटल पडद्यावर एखादा अभ्यास पहिलीच्या वर्गाला देत आणि तो करवून घेण्याची जबाबदारी चौथीच्या वर्गातील एखाद्या विद्यार्थ्यांकडे देत. हे विद्यार्थी अगदी आनंदाने पहिलीचा वर्ग सांभाळत. डिजिटल शाळेसाठी इन्व्हर्टर आणि वायफाय सुविधाही लोकसहभागातून मिळाली.

या शाळेकडे ४ एकर जमीन होती. पण सगळी पडीक. त्यावर बाभळीचं रान वाट्टेल तसे उगवलेले. १९५४ सालापासून शाळा उघडली होती, पण २०१३पर्यंत ही जमीन नुसतीच पडीक होती. येथे किशोरसरांनी जमीन साफ करून घेतली. तब्बल ४०० झाडे लावली. त्यामध्ये २० प्रकारची फुलझाडे होती. यासाठी स्वत: कष्ट तर केलेच, शिवाय प्रसंगी पदरचे पैसेही खर्च केले पण शाळेमध्ये हिरवाई फुलवली.

एकूणच डिजिटल शिक्षण, अध्ययनातील नावीन्य या सगळ्याचा परिपाक म्हणूनच की काय, धुळे जिल्ह्य़ातील पहिली आयएसओ मानांकनप्राप्त शाळा ठरली. त्याचसोबत ही जिल्ह्य़ातील पहिली वायफाय शाळाही ठरली. घाणेगावापासून काही अंतरावर मेंढपाळ समाजाची वस्ती होती. या वस्तीतील विद्यार्थ्यांना जाण्यायेण्यासाठी ही शाळा लांब पडत असे. तेव्हा किशोरसरांच्याच खटपटीने त्या ठिकाणी वेगळी जि.प. शाळा देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. त्याला तेथील लोकप्रतिनिधी आणि गावकऱ्यांनीही पाठिंबा दिला आणि आज तेथे शाळा मंजूर झाली. सुमारे ९० विद्यार्थी तेथे शिक्षण घेत आहेत. याचबरोबर ज्या घाणेगावात शिक्षकांची केवळ ४ पदे मंजूर होती, तिथे ८ पदे मंजूर होऊन ते शिक्षक कार्यरत आहेत.

किशोरसरांच्या या सगळ्या धडपडीची शासनानेही दखल घेतली. २०१६मध्ये जिल्हा आदर्श शिक्षक तर २०१७मध्ये राज्यातील आदर्श शिक्षक पुरस्कार त्यांना मिळाला. कामाची दखल घेतल्याने किशोरसरांचा हुरूप आणखी वाढला आहे. नुकतीच त्यांची बदली, धुळे तालुक्यातीलच चिंचवार या गावी झाली आहे. या  शाळेत गोपाल नावाचा एक मुलगा सुमारे दीड महिना गैरहजर होता. किशोरसरांनी अनेक खेपा घातल्या तरी त्यांना पालक काही भेटले नाही. केवळ पडके बंद घर दिसत असे. एके दिवशी मात्र त्यांनी पालकांना गाठलेच. तेव्हा कळले की, घरी अठरा विश्वे दारिद्रय़ आहे. शाळेत येऊ शकेल इतपतही बरे कपडे गोपालकडे नाहीत. मग तो बिचारा शाळेत कसा येणार? गुरुजींनी गोपालला कपडे मिळवून दिले आणि शासनातर्फे सर्व मदत मिळवून देऊ अशी हमीही त्याच्या पालकांना दिली. गोपाल आता पुन्हा शाळेत येऊ लागला आहे. गोपालसारख्याच अनेकांना पुन्हा शाळेची गोडी लावण्यासाठी किशोरसरही  उत्साहाने कामाला लागले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 5, 2018 4:50 am

Web Title: article about kishor patil work
Next Stories
1 यूपीएससीची तयारी : सामाजिक समस्या
2 शिक्षणध्यास : भारतियर विद्यापीठ, कोईम्बतूर
3 यशाचे प्रवेशद्वार : कॅटचे  महत्त्व
Just Now!
X